समर्पणमय जीवनाचा प्रेरणादायी प्रवास

    17-Jun-2026
Total Views |
Rashtriya Swayamsevak Sangh
 
कै. काशीनाथ नारायण चव्हाण हे अशा संघनिष्ठ, कर्तव्यपरायण आणि तपस्वी कार्यकर्त्यांपैकी एक होते ज्यांचे संपूर्ण जीवनच संघकार्याशी एकरूप झाले होते. संघकार्य हेच त्यांचे जीवनधर्म होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर अखंड परिश्रम घेतले.
 
कै. काशीनाथ नारायण चव्हाण हे नाव संघकार्याच्या इतिहासात समर्पण, साधेपणा आणि अखंड कार्यनिष्ठेचे प्रतीक म्हणून आदराने घेतले जाईल. संघकार्याला जीवनाचे ध्येय मानून आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या या संघतपस्व्याने आपल्या कर्तृत्वाने आणि जीवनमूल्यांनी असंख्य स्वयंसेवकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.
 
काशीनाथ चव्हाण यांचे संपूर्ण जीवन संघकार्याभोवतीच फिरत होते. सकाळी नोकरी, दिवसभर संसाराची जबाबदारी आणि त्यानंतर उरलेला प्रत्येक क्षण संघासाठी अर्पण करणे, हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. हिंदुस्तान लिव्हर लॅबमध्ये नोकरी करून ते सायकलवरून शाखा, बैठका, संपर्क आणि संघटन विस्ताराचे कार्य करत असत. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या या दिनक्रमाबद्दल कोणतीही तक्रार किंवा थकव्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसली नाही. उलट ते नेहमी म्हणत असत, “कामात बदल हाच खरा आराम आहे.” या एका वाक्यात त्यांची जीवनदृष्टी सामावलेली होती. प्रभादेवी शाखा, कीर्ती प्रभात शाखा आणि कीर्ती सायं शाखा या विविध शाखांमध्ये त्यांनी सातत्याने काम केले. अनेक वर्षे वरळी नगर हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र राहिले. संघाने दिलेले कोणतेही दायित्व त्यांनी निःशब्दपणे स्वीकारले आणि ते पूर्ण क्षमतेने पार पाडले. जणू शाखा हेच त्यांचे घर आणि स्वयंसेवक हेच त्यांचे कुटुंब होते.
 
शाखेवरील त्यांचे प्रेम विलक्षण होते. शाखावेशात संघस्थानावर उपस्थित राहणे हा त्यांचा नित्यक्रम होता. नियमितपणे ५० दंड प्रहार मारून स्वतःची शारीरिक साधना ते जपत असत. वय वाढत गेले, जबाबदाऱ्या वाढल्या, तरी शाखेशी असलेले त्यांचे नाते कधीही सैल झाले नाही. शाखा ही त्यांच्यासाठी केवळ कार्यक्रम नव्हता, तर जीवन जगण्याची पद्धत होती. बाल आणि तरुण स्वयंसेवकांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते. मुलांशी सहज मिसळण्याची आणि त्यांच्यात आत्मीयतेने संस्कार रुजवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. शाखेवर ते बाल स्वयंसेवकांना संघगीते शिकवत असत. त्या काळात झेरॉक्स मशीन किंवा छपाईची सहज सुविधा उपलब्ध नव्हती. तरीही प्रत्येक गीत स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याच्या अनेक प्रती तयार करून ते मुलांना देत असत. त्यामुळे शाखेतील अनेक बाल स्वयंसेवकांना सात-आठ संघगीते मुखोद्गत झाली होती. ही केवळ गीतांची शिकवण नव्हती; ती राष्ट्रभक्ती, संघभावना आणि संस्कारांची शिदोरी होती.
 
संघाच्या शिबिरांमध्ये त्यांच्या भजनांचा विशेष प्रभाव पडत असे. ते जेव्हा भजन गात, तेव्हा स्वयंसेवक अक्षरशः तल्लीन होऊन ऐकत. त्यांच्या आवाजात केवळ सूर नव्हते, तर त्यामागे श्रद्धा, समर्पण आणि साधनेचे सामर्थ्य होते. त्यामुळे त्यांच्या भजनांनी अनेकांच्या मनात संघकार्याबद्दलची निष्ठा अधिक दृढ केली. त्यांच्या स्वभावातील साधेपणा आणि संयम हे विशेष उल्लेखनीय होते. राग हा त्यांच्या स्वभावात नव्हताच. एखाद्या वेळी राग आला तरी ते फक्त एवढेच म्हणत, “भल्या गृहस्था, तुला कळत कसे नाही...” एवढ्यावरच ते थांबत. कठोर शब्दांचा वापर न करता समोरच्याला योग्य मार्ग दाखवण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आणि आपुलकी निर्माण झाली होती.
 
त्यांच्या कार्यप्रवासात अनेक खंदे स्वयंसेवक सहकारी म्हणून लाभले. गंगाधर कवळी, बाळू मराठे, बाबाजी देसाई, दत्ता बारसकर, अशोक मोरे यांसारख्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी संघकार्याची मजबूत परंपरा उभी केली. परंतु या सर्व कार्यामागे त्यांच्या पत्नीची सहनशीलता आणि कुटुंबीयांचे सहकार्य हा महत्त्वाचा आधार होता. संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी माणसे घडविण्याचे आणि संघकार्य वाढविण्याचे कार्य अखंडपणे चालू ठेवले.
 
आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांची कार्यतत्परता कमी झाली नाही. त्यांनी मुलींच्या शाखेचे नेतृत्व स्वीकारून नवीन पिढीपर्यंत संघसंस्कार पोहोचविण्याचे कार्य केले. वय, आरोग्य किंवा वैयक्तिक अडचणी यांना त्यांनी कधीही कार्याच्या आड येऊ दिले नाही. काशीनाथ नारायण चव्हाण यांचे जीवन हे संघाच्या व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण या तत्त्वज्ञानाचे जिवंत उदाहरण होते. त्यांनी मोठी पदे भूषवली नाहीत, प्रसिद्धीचा कधी मोह धरला नाही, परंतु आपल्या शांत, सातत्यपूर्ण आणि समर्पित कार्यातून त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले.
 
त्यांच्या जीवनातून संघनिष्ठा, कर्तव्यपरायणता, साधेपणा आणि निरपेक्ष सेवाभाव यांचे दर्शन घडते. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी घडवलेले स्वयंसेवक, त्यांनी शिकवलेली संघगीते, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी दाखवलेला सेवामार्ग हीच त्यांची खरी स्मृती आहे.