युद्ध थांबले, तरी जलवाहतुक पूर्वपदावर येण्यास होणार विलंब; अडकलेल्या जहाजांना कराराच्या शाश्वततेची चिंता.

    17-Jun-2026
Total Views |
Strait of Hormuz)
 
नवी दिल्ली : (Strait of Hormuz) अमेरिका आणि इराणमधील करारानंतर पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची चिन्हे निर्माण झाली असून, होर्मुत्झ समुद्रधुनी खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरीही, या संघर्षामुळे विस्कळीत झालेला जागतिक तेल पुरवठा लगेच सुरळीत होणार नसून, त्यास काही अवधी जाणार असल्याचे समोर आले आहे.
 
जवळपास गेले चार महिने सुरु असलेल्या इराण अमेरिका युद्धामुळे, जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. मात्र, या दोन देशात झालेल्या शांतता करारामुळे तेल पुरवठ्याचे समुद्री मार्ग खुले झाले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काहीसा अवधी जाण्याची चिन्हे आहेत. संघषापूर्वी या समुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात तेल वाहतुक होत असे. मात्र, संघर्षामुळे आज बरीच जहाजे याच समुद्रधुनीच्या आसपास अडकून पडली आहेत.
 
तर, निर्यातीचे मार्ग बंद झाल्याने या समुद्री मार्गातील जहाजांची कोंडीदेखील झाल्याचे दिसून येते आहे. तसेच, मध्यंतरीच्या काळात जहाजांना दोन्ही गटांकडून लक्ष्य करण्यात आल्याने, जोवर दोन्ही देशातील कराराची खात्री पटत नाही तोवर धोका पत्करण्यास जहाज कंपन्याही तयार नसल्याचे समोर आले आहे.
 
सध्याच्या घडीला जवळपास 500 पेक्षा अधिक जहाजे पर्शियनच्या आखातात अडकली असून, सध्या इराणकडून समुद्रात पेरण्यात आलेले सुरुंग जहाजांसमोरील एक मोठा अडथळा ठरत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील करारानंतर हे सुरुंग हटवण्याचे कार्य सुरु असून, त्याला सहा महिन्यांचा अवधी लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, तोवर वाहतुक सुरु न करण्याचा निर्णयही अनेक कंपन्यांनी जाहीर केला आहे.
 
तसेच, होर्मुत्झ समुद्रधुनीमधून प्रवास करणार्‍या जहाजांवर टोल लावण्याबाबत इराण ठाम असून, अमेरिकेने याला नकार दिला आहे. मात्र, करारातील अटींबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. ही सामुद्रधुनी टोलमुक्त असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले असले, तरीही इराणने याला दुजोरा दिलेला नाही. अमेरिका आणि युरोपियन युनियनने इराणी सैन्याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले असून, अमेरिकेने इराणच्या टोल गोळा करण्यार्‍या संस्थेवर निर्बंध लादले आहेत. जोपर्यंत या निर्बंधांमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत पैसे भरणार्‍या कंपन्यांना दंडाला सामोरे जावे लागण्याचीही भीतीही सतावते आहे.
 
तसेच, वाहतुक मंदावलेल्या तेल साठवण करण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता. ही क्षमताही संपल्याने, तेल उत्पादक कंपन्यांना तेलाचे उत्पादन थांबवावे लागले होते. ही प्रक्रिया पुन्हा सुरु करणे आव्हानात्मक असल्याने, त्यासाठी काही अवधी जाण्याची शक्यता तेल उत्पादक कंपन्यांकडून वर्तवली जात आहे.
 
होर्त्मुझ जलमार्गाच्या सुरक्षेवरचे मळभ कायम!
 
इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धामुळे होर्त्मुझ जलमार्गाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे, अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी या मार्गाची सुरक्षा निश्चित होईपर्यंत जहाजे उभी करण्याच्या निर्णयाचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. अनेक युरोपीय देशांनी युद्ध सुरु असतानाच याबाबतचा प्रस्ताव अमेरिकेला दिला होता. त्यामुळे युद्धाचे ढग जरी दूर झाले असले, तरी जलमार्गाच्या वाहतुकीवरील मळभ कायम आहे.(Strait of Hormuz)