मान्सूनमध्ये ‘शून्य जीवितहानी’चे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी काम करावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महापालिकेला एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याचे निर्देश

    17-Jun-2026
Total Views |
Eknath Shinde
 
मुंबई : (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेत सर्व नागरी आणि आपत्कालीन यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून ‘शून्य जीवितहानी’ हे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश दिले. हे निर्देश त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत दिले.
 
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. त्यांनी संबंधित विभागांना प्रलंबित नाला सफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे, भूमिगत जलसाठा टाक्या व फ्लड गेट्स पूर्णपणे कार्यरत ठेवण्याचे, भूस्खलनप्रवण भागांमध्ये संरक्षण जाळ्या बसविण्याचे तसेच मोठ्या जाहिरात फलकांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिले.
 
शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या धर्तीवर स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल उभारण्याचे निर्देश दिले.
 
या आढावा बैठकीस पालिका , मुंबई पोलीस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, भारतीय हवामान विभाग (आयएमडी), भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, एनडीआरएफ, एमएमआरडीए, म्हाडा आणि बेस्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आयएमडीकडून जून महिन्यातील हवामानाचा अंदाज जाणून घेण्यात आला. हवामान विभागाने जून महिन्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता सध्या कमी असल्याचे सांगितले.
 
उपमुख्यमंत्र्यांनी बेस्ट आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एमएसआरटीसी) संभाव्य पाणी साचण्याच्या परिस्थितीत पर्यायी वाहतूक व्यवस्थेची आगाऊ योजना तयार ठेवण्याचे निर्देश दिले. (Eknath Shinde)
 
तसेच झाडे पडण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देत झोपडपट्टी भागातील जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याचे, जलजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे, ‘आपला दवाखाना’ केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे आणि मेट्रो स्थानकांवर पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
बैठकीत बीएमसी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, मुंबईत १२५ पर्जन्यमापक (रेन गेज) बसविण्यात आले असून जून ते सप्टेंबरदरम्यान ४.५ मीटरपेक्षा अधिक उंच भरतीचे (हाय टाइड) २४ दिवस येण्याची शक्यता आहे. पाणी साचण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये उच्च क्षमतेचे डी-वॉटरिंग पंप तसेच ६५ मिनी पंपिंग केंद्रे उभारण्यात आली आहेत. याशिवाय यंदा प्रथमच केंद्रीय नियंत्रण कक्षातून पंपिंग केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
 
पालिका अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, मान्सून आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत १,००० प्रशिक्षित ‘आपदा मित्र’ स्वयंसेवक, एनडीआरएफच्या तीन तुकड्या आणि भारतीय नौदलाच्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. (Eknath Shinde)