इवल्याशा देशाने जगज्जेत्याला रोखले

    17-Jun-2026   
Total Views |
 
Cape Verde Stops Spain
 
कौन कहता हैं कि आसमां में सुराख हो नहीं सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों... दुष्यंत कुमार यांच्या या शायरीची आठवण स्पेन विरुद्ध केप व्हर्डेची मॅच पाहताना आली. जेमतेम ४ लाख, ९१ हजार, २३३ लोकसंख्येचा हा देश; पण त्यांनी माजी जगज्जेत्या आणि जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकवर असणार्‍या स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखले.
 
केप व्हर्डे देशाच्या लोखसंख्येच्या साडेतीनपट, तर एकट्या आपल्या दक्षिण मुंबई खासदारांच्या मतदार संघाची १४ लाख, ७४ हजार, ४०५ इतकी लोकसंख्या आहे. आणि हो, याउलट स्पेनची लोकसंख्या जवळपास ४ कोटी, ९६ लाख इतकी आहे. आता बोला...
तर, या केप व्हर्डे नावाच्या देशाला सहज चिरडता येईल, या भावनेने स्पेन मैदानात उतरले. पण केप व्हर्डेच्या खेळाडूंच्या जिद्दीपुढे स्पेन पुरते निष्प्रभ झाले. केप व्हर्डेने स्पेनला ०-० अशा गोलशून्य बरोबरीत रोखले. सामन्याचा गोलफलक जरी मॅच बरोबरीत झाल्याचे दर्शवत असला, तरी नैतिकदृष्ट्या हा स्पेनचा पराभव होता.
 
स्पेन हा विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानला जात होता. मात्र, केप व्हर्डेच्या भक्कम आणि शिस्तबद्ध बचावात्मक रणनीतीसमोर स्पेनची आक्रमणफळी निष्प्रभ ठरली. स्पेनचा आघाडीचा स्ट्रायकर मिकेल ओयार्झाबाल याच्याकडून ‘गोल्डन बूट’साठी जोरदार दावेदारी अपेक्षित होती. मात्र, त्याच्यासह संपूर्ण स्पॅनिश आक्रमणफळीला एकही गोल करता आला नाही. स्पेनचा युवा सुपरस्टार लामिन यामाल अखेरच्या २० मिनिटांत मैदानात उतरला; पण तोही आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
 
२०२६ विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत केप व्हर्डेचा ६४वा क्रमांक होता. स्पर्धेत सहभागी आफ्रिकन संघांमध्ये ते दुसर्‍या क्रमांकाचे सर्वांत कमी मानांकन असलेले राष्ट्र होते. त्यांच्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फक्त घाना (७३वा) होता. दुसरीकडे, स्पेनचा जागतिक क्रमांक तिसरा होता. याआधी काही काळ ते अव्वल स्थानी होते; मात्र यंदा अर्जेंटिना आणि फ्रान्सने त्यांना मागे टाकले.
 
केप व्हर्डेचा ४० वर्षीय गोलरक्षक व्होझिन्हा हा सामन्याचा खरा नायक ठरला. स्पेनने अपेक्षेप्रमाणे संपूर्ण सामन्यात चेंडूवरील वर्चस्व राखले आणि एकूण २७ फटके मारले. त्यांपैकी सात फटके लक्ष्यावर होते. गोलरक्षक व्होझिन्हाने लक्ष्यावर आलेले सर्व सात फटके यशस्वीपणे रोखले; त्यांपैकी काही बचाव तर अत्यंत नेत्रदीपक होते. केवळ गोलरक्षकच नव्हे, तर केप व्हर्डेच्या संपूर्ण बचावफळीचेही तितकेच कौतुक करावे लागेल.
 
गंमत पाहा, या मॅचच्या आधी केप व्हर्डचा गोलरक्षक व्होझिन्हाचे ‘इन्स्टाग्राम’वर फक्त ५० हजार फॉलोअर्स होते. या मॅचनंतर त्याच्या फॉलोअर्सची संख्या झाली ६० लाख! सोशल मीडियावरचा तो सेंसेशन ठरला आहे. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आकाशही भेदता येते, हेच केप व्हर्डेने दाखवून दिले आहे. फक्त माहितीसाठी चार लाखांच्या केप व्हर्डे देशापुढे भारताची लोकसंख्या दीडशे कोटी पार आहे आणि जागतिक फुटबॉल क्रमावारीत आपला क्रमांक लागतो १३९.