मुंबई : (Bhagwant Mann) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना सोमवारी अकाल तख्ताचे जत्थेदार ज्ञानी कुलदीप सिंह गडगज्ज यांनी धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी घोषित केले होते. हा निर्णय एका कथित व्हायरल व्हिडिओच्या आधारे घेण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री मान यांनी शीख गुरूंच्या छायाचित्रांवर मद्य शिंपडल्याचा आरोप करण्यात आला आहे. अकाल तख्ताने त्यांना ‘गुरूद्रोही’ आणि ‘खालसा पंथविरोधी’ ठरवत शीख समाजाला त्यांच्याशी सामाजिक व धार्मिक संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे.
भगवंत मान यांनी या व्हिडिओशी आपला काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओतील व्यक्तीची शरीरयष्टी आणि इतर बाबी त्यांच्याशी जुळत नाही. धार्मिक संस्थांमधील उच्च पदांवर असलेले काही लोक त्यांच्या राजकीय आकांच्या इशाऱ्यावर केवळ माझी बदनामी करण्यासाठी प्रचार मोहीम राबवत आहेत.
भगवंत मान यांचे असे म्हणणे आहे की, ते रु साहिबांच्या शिकवणीचा विचार करून निर्णय घेतात. पंजाबमधील शेती आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी ते काम करतायत. त्यांचे हे निर्णय काही लोकांना रुचत नसल्यामुळे धर्माचा वापर करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भाजपचे पंजाब सरकारमधील शीख अधिकारी, मंत्र्यांना आवाहन
भाजप नेते केवल सिंह ढिल्लों यांनीही मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केली. पंजाब सरकारमधील शीख अधिकारी आणि मंत्र्यांना आवाहन करताना त्यांनी अकाल तख्ताच्या निर्देशांचे पालन करून मुख्यमंत्री मान यांच्याशी भेटणे टाळावे, असे म्हटले.
'तो' एआय जनरेटेड नाही
अकाल तख्ताचे जत्थेदार ज्ञानी कुलदीप सिंह गडगज्ज यांनी सोमवारी अमृतसर येथे ‘फसील’ (अकाल तख्ताचे व्यासपीठ) वरून भगवंत मान यांच्याविरोधात आदेश जारी केला होता. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची दोन स्वतंत्र फॉरेन्सिक प्रयोगशाळांनी तपासणी केली असून तो व्हिडिओ मूळ असल्याची पुष्टी केली आहे. तसेच तो व्हिडिओ संपादित केलेला नसून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार करण्यात आलेला नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले आहे.(Bhagwant Mann)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक