बेस्ट कर्मचाऱ्यांचा एल्गार; १८ जूननंतर संपाचा मोठा इशारा

    17-Jun-2026
Total Views |
BEST Employees
 
मुंबई : (BEST Employees) बेस्ट उपक्रमातील विविध कामगार संघटनांनी स्थापन केलेल्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाला प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. १८ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सर्व कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.
 
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेत विलीन करणे, सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांची थकीत देणी एकरकमी अदा करणे, २०१६ पासून प्रलंबित असलेला वेतन करार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार लागू करणे तसेच परिवहन आणि वीज विभागातील खासगीकरण व कंत्राटी पद्धत बंद करणे यांचा समावेश आहे.
 
कामगार संघटनांचे म्हणणे आहे की, बेस्टची आर्थिक आणि प्रशासकीय जबाबदारी पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेवर असतानाही कर्मचाऱ्यांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी आणि वेतन कराराचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
 
समितीने बेस्टच्या मालकीच्या ५००० नव्या बसांची खरेदी करण्याची तसेच आवश्यक मनुष्यबळाची भरती तातडीने करण्याची मागणीही केली आहे. लीज आणि कंत्राटी तत्त्वावरील बस व्यवस्थेमुळे बेस्टची मूळ सार्वजनिक वाहतूक सेवा कमकुवत झाली असून त्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
 
यासंदर्भात समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर, महानगरपालिका आयुक्त आणि बेस्ट प्रशासनाला पत्र पाठवून मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. तसेच १८ जूनपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेस्ट कर्मचारी संपावर जातील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकार व प्रशासनाची असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.(BEST Employees)