ब्रिटनमध्ये 16 वर्षांखालील समाज माध्यमवापरावर बंदी; भविष्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे पंतप्रधान स्टार्मर यांचे मत

    16-Jun-2026
Total Views |
Britain Social Media
 
लंडन : (Britain Social Media) लहान मुलांच्या वाढत्या मोबाईल वापराने जगातील पालक त्रस्त असतानाच, ब्रिटनने क्रांतीकारी निर्णय घेत 16 वर्षाखालील मुलांच्य समाज माध्यम वापरावर बंदी घातली आहे. हा निर्णय घेणे कठीण असला, तरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो घेणे महत्त्वाचे असल्याचे मत ब्रिटनचे पंतप्रधन कीम स्टार्मर यांनी व्यक्त केले आहे.
 
सध्या लहान मुलांच्या समाज माध्यमांवरील वाढत्या उपस्थितीची चर्चा सर्वत्र असून, कित्येक देश यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशावेळी ब्रिटनने 16 वर्षाखालील मुलांच्य समाज माध्यम वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील या नव्या नियमानुसार 16 वर्षांखालील मुलांसाठी गेंमिंग आणि लाईव्ह स्ट्रिमिंग सेवांचा वापरही पूर्णपणे बंद असणार आहे. या निर्णयाची घोषणा जरी आता केली असली, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात पुढील वर्षापासून केली जाणार आहे.
 
हा निर्णय घेणे तसे कठीण असले, तरीही मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असाच निर्णय असल्याचे पंतप्रधान स्टार्मर यांनी म्हटले आहे. तसेच, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा प्रभाव सध्या वाढत असून, त्यांच्या विरोधात पाऊल उचलणे ही देखील त्यांच्या सरकारची प्राथमिकता असल्याचेही स्टार्मर म्हणाले.
 
भविष्यात या निर्णयाविरोधात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या जरी उभ्या राहिल्या, तरी सरकार या निर्णयापासून मागे हटणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ऑनलाईन सुरक्षेचा मुद्दा सध्याच्या घडीला जगातील कळीचा मुद्दा झाला असून, ब्रिटनचे सरकार देशातील पालकांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचेही स्टार्मर यांनी म्हटले आहे.
 
लहानग्यांच्या सुरक्षेसाठी जग प्रयत्नशील
 
तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलांच्या संरक्षणासाठी जगाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून, याआधी ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया आणि मलेशिया देशातही ब्रिटनसारखा निर्णय घेण्यात आला आहे. तर, युरोपीय महासंघातील काही देशांनी 15 वर्षाखालील मुलांच्या समाज माध्यम वापरावर बंदी आणली आहे. जगातील अन्य देश अशीच धोरणनिर्मिती करण्याबाबत आग्रही असल्याचेही समोर येत आहे.(Britain, Social Media)