स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दहा दया याचिका दाखल केल्या, मात्र ब्रिटिशांप्रति कधीही निष्ठा व्यक्त केली नाही’! पणतू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात सादर केला दावा
16-Jun-2026
Total Views |
पुणे : (Satyaki Savarkar) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांकडे दहा दया याचिका दाखल केल्या होत्या, हे सत्य असले तरी त्या याचिकांमध्ये त्यांनी ब्रिटिश सत्तेबद्दल निष्ठा व्यक्त केली नव्हती, असा दावा सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात केला आहे. सावरकरांविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
सावरकरांनी अंदमानातील सेल्युलर तुरुंगात असताना ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केल्या होत्या, याबाबत वाद निर्माण होत असतो. मात्र, या याचिका स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यासाठी आणि तुरुंगातून बाहेर पडून राष्ट्रीय कार्य करण्यासाठी करण्यात आल्या होत्या, असे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात सांगितले आहे.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या बाजूनुसार, दयायाचिका दाखल करणे आणि ब्रिटिश सत्तेला निष्ठा व्यक्त करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सावरकरांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून सुटकेसाठी अर्ज केले, परंतु त्यांनी ब्रिटिश राजवटीप्रती निष्ठा किंवा समर्पण व्यक्त केल्याचा दावा ऐतिहासिक नोंदींमधून सिद्ध होत नाही, असे सांगण्यात आले. सावरकरांच्या दया याचिकांचा मुद्दा अनेक वर्षांपासून राजकीय आणि ऐतिहासिक चर्चेचा विषय राहिला आहे.
काही राजकीय पक्ष आणि इतिहासकार या याचिकांचा उल्लेख करून सावरकरांवर टीका करतात, तर त्यांच्या समर्थकांच्या मते त्या काळातील परिस्थिती आणि स्वातंत्र्यलढ्याची रणनीती लक्षात घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. या प्रकरणी न्यायालयात दोन्ही बाजूंकडून ऐतिहासिक दस्तऐवज आणि पुरावे सादर केले जात असून, सावरकरांच्या दया याचिकांबाबतचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Satyaki Savarkar)