श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार 'संस्कृतशिवचरित्र'चे प्रकाशन
16-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Sanskrit Shivacharitra) संस्कृतभारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहासावर आधारित 'राष्ट्रपुरुषः छत्रपतिः श्रीशिवाजीमहाराजः' या विशेष 'संस्कृतशिवचरित्र' ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा येत्या शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सदाशिव पेठेतील पेरूगेट भावे स्कूलच्या प्र.ल. गावडे सभागृहात संध्याकाळी ठीक ६:०० वाजता हा सोहळा संपन्न होईल.
या ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लाभणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष मा. आमदार महेश दादा लांडगे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून संस्कृतभारतीचे अखिल भारतीय प्रकाशनप्रमुख आणि 'संभाषणसन्देश' पत्रिकेचे सहसंपादक डॉ. सचिन कठाळे हे मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्कृतभारतीचे पश्चिम-मध्य-क्षेत्राध्यक्ष प्रा. प्रसाद जोशी हे भूषवणार असून, ग्रंथाचे लेखक पिंपरी चिंचवड संस्कृतभारतीचे जनपद अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे हे देखील या प्रसंगी उपस्थित राहतील.प्रकाशीत होणारा 'राष्ट्रपुरुषः छत्रपतिः श्रीशिवाजीमहाराजः' हा ग्रंथ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कृत भाषेत लिहिलेल्या गेलेल्या १२ प्रमुख ग्रंथांच्या आधारावर हा नवीन ग्रंथ सिद्ध करण्यात आला आहे.
अतिशय सरळ आणि सोप्या संस्कृत भाषेत लिहिलेले हे शिवरायांचे चरित्र असून यामध्ये १७ अध्याय, उपसंहार आणि संदर्भग्रंथांची सूची समाविष्ट आहे. वाचकांच्या सुलभतेसाठी ११३ तळटीपा, ३० रेखाचित्रे, ३ नकाशे आणि २३२ पृष्ठांचा हा माहितीपूर्ण ग्रंथ ऐतिहासिक आणि भाषाप्रेमींसाठी एक अनमोल ठेवा ठरेल. सदर कार्यक्रमाला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(Sanskrit Shivacharitra)