“समरसतेची संकल्पना आपल्या संतपरंपरेत अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक अर्थाने व्यक्त झालेली दिसते. विशेषतः संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगवाङ्मयात समरसतेचे तत्त्व जीवनमूल्य म्हणून अधोरेखित झालेले आढळते. त्यांनी समाजाला बाह्य भेदांच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या अधिष्ठानावर एकत्र येण्याचा संदेश दिला.पाण्यात साखर टाकली की ती विरघळून जाते; तिचे स्वतंत्र अस्तित्व डोळ्यांना दिसत नाही, त्याचप्रमाणे समाजातील भेदभावाचे स्वरूप अनेकदा अदृश्य असते.
तो उघडपणे दिसत नसला, तरी विचारांत, वर्तनात, संधींच्या वाटपात आणि सामाजिक व्यवहारांत त्याचे अस्तित्व जाणवत राहते. म्हणून केवळ भेदभाव दिसत नाही, म्हणून तो संपला असे मानणे योग्य ठरणार नाही.खऱ्या अर्थाने समरस समाज घडवायचा असेल, तर जातीपातींच्या सर्व कृत्रिम भिंतींचे उच्चाटन झाले पाहिजे.” असे प्रतिपादन अखिल भारतीय प्रवासाच्या निमित्ताने पंढरपूर येथे आलेले अखिल भारतीय समरसता गती विधीचे संयोजक शाम प्रसादजी यांनी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या समरसता बैठकीमध्ये केले. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संयोजक मुकुंद आफळे ,सहसंयोजक विलास लांडगे पंढरपूर जिल्हा राष्ट्रिय स्वंयसेवक संघाचे कार्यवाह प्रतापसिंह टकले, पंढरपूर जिल्हा समरसता संयोजक जगदीश बाबर, प्रांत मंडळ सदस्य डॉ. धनंजय भिसे,गुरु दोडिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते.पुढे शामप्रसाद म्हणाले “समाजात जातीच्या आधारावर निर्माण झालेली दरी मिटली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे "तो कोणत्या जातीचा आहे?" या नजरेने नव्हे, तर "तो माझा बांधव आहे" या भावनेने पाहण्याची संस्कृती विकसित झाली पाहिजे.बंधुता, समता आणि परस्पर सन्मान या मूल्यांवर उभा राहिलेला समाजच समरसतेचा खरा समाज ठरतो.
एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, परस्परांविषयी आदर बाळगणे, पूर्वग्रहांना दूर सारणे आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान देणे, हीच समरसतेची वाट आहे.समरसता ही केवळ भाषणांत उच्चारायची संकल्पना नसून ती आचरणातून साकार करायची जीवनदृष्टी आहे. म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकाने, प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक पिढीने समरसतेचे बीज आपल्या विचारांत आणि कृतीत रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. कारण समरस समाजाची निर्मिती ही एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे; आणि माणुसकीच्या गोडव्याने ओथंबलेला समाज हाच खऱ्या प्रगतीचा पाया आहे.
“अखिल भारतीय प्रवासादरम्यान श्री. शामप्रसाद यांनी पंढरपूर येथे संत गाडगे महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या स्मृती जपणाऱ्या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. संत गाडगे महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला पाठबळ देण्याच्या भावनेतून उपलब्ध करून दिलेल्या वसतिगृह व शाळेच्या वास्तूचे त्यांनी आदरपूर्वक अवलोकन केले. सामाजिक परिवर्तन, शिक्षण आणि वंचितांच्या उन्नतीसाठी उभ्या राहिलेल्या या वास्तू आजही समता आणि मानवसेवेच्या विचारांची साक्ष देत उभ्या आहेत असा आदरपूर्वक उल्लेख केला.
त्यानंतर त्यांनी पंढरपूरच्या पावन भूमीत श्री विठ्ठल-रुक्मिणी भगवंताचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा आदी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश त्यांना अनुभवता आला.चंद्रभागेच्या तीरावर उभ्या असलेल्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मानवकल्याण, समता आणि बंधुभावाच्या मूल्यांना मनोमन अभिवादन केले. वारकरी परंपरेतील भक्तिभाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा अंतर्मनात संवाद घडवून आणणारा हा अनुभव ठरला.
विठ्ठलाच्या कृपाशीर्वादाने आणि संतांच्या कार्यप्रेरणेने समृद्ध झालेल्या या पंढरपूर भेटीनंतर श्री. शामप्रसाद यांचा सर्व कार्यकर्त्यांना उत्साह देणारा प्रवास झाला.