मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) "संघाकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि संघ काही जनतेपासून दूर राहून काम करत नाही. संघ आपल्या सर्व उपक्रमांचे संचालन उघडपणे करतो", असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे केलेली संघाच्या नोंदणीची मागणी फेटाळून लावली आहे. केरळम् मधील त्रिशूर येथे रविवारी आयोजित संघाच्या शताब्दी संपर्क कार्यक्रमातील सभेनंतर प्रश्नोत्तरांच्या वेळी ते बोलत होते.
संबंधित प्रश्नावर उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले, अनेक अपंजीकृत संस्था आणि उपक्रम सुरू आहेत. संघ मात्र काहीही लपवत नाही. आम्ही उघडपणे कार्य करतो. लोकांना आमंत्रित करतो आणि आम्ही काय करतो हे त्यांना सांगतो. संघाच्या नोंदणीची मागणी ही राजकीय हेतूने केली जात आहे. अशा प्रकारचे डावपेच वापरले जात आहेत. आम्हाला त्याची सवय झाली आहे. संघाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या १०-१५ वर्षांतच आम्हाला अशा गोष्टींना सामोरे जावे लागले होते. उलट असे काही घडले नाही, तर काहीतरी चुकते आहे असे वाटू लागते.”
पुढे ते म्हणाले, हिंदू धर्माची नोंदणी झालेली नाही. अनेक गोष्टींची नोंदणी नसते. ज्यांना सरकारकडून निधी हवा असतो, त्यांना नोंदणी करणे आवश्यक असते. ते योग्यच आहे. मात्र सरकारला संघाचे अस्तित्व माहीत आहे. ब्रिटिशकालीन काळात स्थापन झालेला संघ सार्वजनिक चर्चेतून आणि सामाजिक सहमतीतून विकसित झाला आहे. (Rashtriya Swayamsevak Sangh)
सरकारला संघाच्या अस्तित्वाची पूर्ण माहिती होती
सरसंघचालक यावेळी म्हणाले की, यापूर्वी संघावर दोन वेळा बंदी घातली होती. त्यापैकी एक बंदी न्यायालयीन आदेशानंतर आणि दुसरी सत्याग्रहानंतर हटवण्यात आली. याचा अर्थ सरकारला संघाच्या अस्तित्वाची पूर्ण माहिती होती. १९५० मध्ये संघाने आपली लिखित घटना सरकारकडे सादर केली होती. मात्र मान्यता मिळण्यासाठी संघाने नोंदणी करणे आवश्यक आहे, असे कोणत्याही अधिकाऱ्याने कधीही सांगितले नव्हते.
काय म्हणाले होते प्रियांक खरगे ?
प्रियांक खरगे यांनी म्हटले होते की, संघ देश-विदेशातून देणग्या गोळा करतो आणि त्याच्या कार्यकर्त्यांना सरकारी सुरक्षा देखील दिली जाते. लोकशाही व्यवस्थेत कोणतीही संस्था कायदा आणि उत्तरदायित्वापेक्षा मोठी असू शकत नाही. संघाने अहंकार बाजूला ठेवून कायद्याचे पालन करावे. संघाने आपली अधिकृत नोंदणी करावी आणि निधी उभारणी, उत्पन्न, खर्च तसेच मालमत्तेचे स्रोत यांची माहिती सार्वजनिक करावी.(Rashtriya Swayamsevak Sangh)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक