विचारनिष्ठ कार्यकर्तृत्वाचा दीपस्तंभ

    16-Jun-2026
Total Views |
Rashtriya Swayamsevak Sangh
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण आयुष्य समाजकार्य, संघटन उभारणी आणि राष्ट्रहितासाठी समर्पित करणाऱ्या कै. रामराव तथा पोपटराव हिरे यांचे नाव नाशिकमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. विचारांशी असलेली निष्ठा, कार्यकर्त्यांवरील प्रेम, साधी राहणी आणि संघर्षमय जीवनयात्रा यांमुळे त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.
 
पोपटराव हिरे यांचा जन्म २० ऑगस्ट १९३६ रोजी नाशिक नाशिकच्या मालेगाव मधील निमगाव येथे झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांची छाप पडली. ते संघाचे स्वयंसेवक म्हणून घडले आणि संघकार्याच्या माध्यमातून राष्ट्रसेवा हेच जीवनाचे ध्येय त्यांनी स्वीकारले. काळी टोपी, गुरुशर्ट आणि धोतर हा त्यांचा नेहमीचा साधा पेहराव होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणताही दिखाऊपणा नव्हता. प्रसन्न चेहरा, आपुलकीची वागणूक आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे ते सर्वांच्या आदराचे केंद्र बनले होते. स्वतःच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता; मात्र त्या सर्व संबंधांचा उपयोग त्यांनी समाजकार्य आणि संघटन बळकटीसाठी केला.
 
जनसंघाच्या प्रारंभीच्या काळात विरोधी पक्षांची राजकीय ताकद अत्यल्प होती. सत्ताधारी पक्षाचा प्रभाव सर्वदूर होता. अशा परिस्थितीत विचारांशी एकनिष्ठ राहून जनसंघाचे काम करणे हे मोठे आव्हान होते. नाशिक जिल्ह्यात हिरे घराण्याचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव असतानाही पोपटराव हिरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघाची वाट निवडली. त्यांनी सत्ता, प्रतिष्ठा किंवा वैयक्तिक लाभ यांचा विचार न करता विचारांच्या आधारावर राजकीय कार्य सुरू केले.
 
पक्ष विस्तारासाठी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील तालुका, खेडी आणि दुर्गम भाग अक्षरशः पिंजून काढले. प्रवासातील कष्ट, आर्थिक अडचणी किंवा प्रतिकूल वातावरण यांची पर्वा न करता त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली. संघाच्या सामाजिक विस्तारात आणि जनसंघाच्या पायाभरणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. संघर्षमय काळातही त्यांनी आपल्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही. पोपटराव हिरे यांची संघविचारांवर अढळ श्रद्धा होती. त्यांनी संघाची मूल्ये आणि राष्ट्रनिष्ठेची शिकवण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दिली. त्याच संस्कारांमधून त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढी सार्वजनिक जीवनात सक्रिय झाली. सून सीमा हिरे यांनी नगरसेविका आणि पुढे आमदार म्हणून कार्य केले, तर महेश हिरे आणि योगेश हिरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यात सहभाग घेतला.
 
त्यांचे घर हे संघ परिवारातील कार्यकर्ते, नेते आणि समाजसेवक यांच्यासाठी कायम खुले असायचे. अनेक कार्यकर्त्यांना ते घरच्यासारखे वाटत असे. संघ परिवारातील विविध घटकांना जोडण्याचे आणि एकत्र आणण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे निवासस्थान हे केवळ घर नसून विचारांचे आणि कार्यकर्त्यांच्या संवादाचे केंद्र बनले होते.
 
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्षांचे मोठे नुकसान झाले. पराभव निश्चित असल्याची जाणीव असतानाही पक्षविस्तार आणि विचारप्रसारासाठी निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी दाखवली. आज भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उभा आहे, त्याच्या पायाभरणीत पोपटराव हिरे यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांचे योगदान विसरता येणार नाही.
 
कै. दादासाहेब वडनगरे आणि पोपटराव हिरे यांच्या स्नेहसंबंधातून आणि वैचारिक बांधिलकीतून ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना झाली. दादासाहेबांच्या पश्चात संस्थेची धुरा पोपटराव हिरे यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने मोठी प्रगती केली. आज ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा आणि वसतिगृहे ही त्यांच्या दूरदृष्टीची आणि शिक्षणावरील निष्ठेची साक्ष देतात.
 
सामान्य माणसाच्या अडचणी सोडवणे, समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणे आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हा त्यांचा जीवनमंत्र होता. हीच शिकवण त्यांनी आपल्या कुटुंबीयांना आणि नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना दिली. त्यांच्या स्मरणार्थ आजही त्यांच्या कुटुंबीयांकडून विचारप्रसारासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. प्रख्यात वक्ते विवेक घळसासी यांच्या व्याख्यानांमुळे ही परंपरा अधिक समृद्ध झाली आहे. कोविडच्या कठीण काळातही ही व्याख्यानमाला ऑनलाइन माध्यमातून सुरू ठेवण्यात आली. यावरून पोपटराव हिरे यांनी रुजवलेल्या वैचारिक परंपरेची ताकद दिसून येते.
 
१४ जुलै २००९ रोजी नाशिक येथे या विचारनिष्ठ, कार्यकर्त्यांवर प्रेम करणाऱ्या आणि संघटन उभारणीसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या नेत्याचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र त्यांनी दिलेले संस्कार, उभारलेली कार्यकर्त्यांची पिढी, निर्माण केलेल्या संस्था आणि जपलेली मूल्ये यांमधून त्यांचे कार्य आजही जिवंत आहे. कै. रामराव (पोपटराव) हिरे हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नव्हते; ते विचारांचे उपासक, संघटनाचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी समाजसेवक आणि कार्यकर्त्यांच्या मनातील खरे मार्गदर्शक होते.