जिना चढताना गुडघ्यात येणारी कळ, खुचतून उठताना जाणवणाऱ्या असह्य वेदना, काही काळ बसून राहिल्यानंतर पाय आखडल्याची भावना आणि चालताना प्रत्येक पावलागणिक सांध्यांतून होणारी कुरकुर... सांधेदुखीचा त्रास असलेल्या लाखो लोकांचे हे दैनंदिन आयुष्य. विशेष चिंतेची बाब म्हणजे, पूर्वी वृद्धापकाळाशी जोडल्या जाणाऱ्या या समस्या आता तरुणांमध्येही वाढताना दिसत आहेत. ही समस्या नेमकी काय, त्याचे कारक घटक आणि उपाययोजनांच्या आधारे या समस्येचा मागोवा घेणारा हा लेख...
एकेकाळी गुडघेदुखी, सांधे आखडणे किंवा जिना चढताना होणारा त्रास ही लक्षणे वाढत्या वयाशी जोडली जात होती. साठीनंतर सुरू होणारी ही समस्या आता तिशीतील तरुणांच्या आयुष्यात डोकावू लागली आहे. अलीकडील अभ्यासातून समोर आलेली ही बाब केवळ सांधेदुखीचीच नाही, तर आधुनिक जीवनशैलीच्या शरीरावर होत असलेल्या परिणामांचेही द्योतक आहे. त्यामुळे ‘ऑस्टिओ-आर्थ्रायटिस’कडे केवळ वृद्धत्वाची अपरिहार्य प्रक्रिया म्हणून पाहण्याचा असलेला दृष्टिकोन बदलण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
‘ऑस्टिओ-आर्थ्रायटिस’ हा केवळ सांधे झिजण्याचा आजार नसून, तर तो संपूर्ण सांध्यावर परिणाम करणारा एक विकार आहे. सांध्यांतील कार्टिलेज, त्याखालील हाडे, सांध्याभोवतीचे स्नायू, लिगामेंट्स आणि सांध्यातील द्रव यांमध्ये एकाचवेळी बदल घडू लागतात. ‘कार्टिलेज’ हा शरीरातील अत्यंत विशेष प्रकारचा ऊतक असून, त्यामध्ये रक्तवाहिन्या नसतात. त्यामुळे एकदा का त्याची हानी सुरू झाली की, त्याची भरपाई शरीराला सहजपणे करता येत नाही. जसजसा ‘कार्टिलेज’ पातळ होतो, तसतसा हाडांवरील दाबही वाढतो. परिणामी, हाडांच्या कडांवर अतिरिक्त वाढ, अर्थात ‘ऑस्टिओफाईट्स’ निर्माण होते, सांध्यात सूज वाढते आणि हालचालींच्या वेळी वेदना होऊ लागतात. त्यामुळे रुग्णाला त्रास होतो.
यामागील जैविक प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची आहे. पूर्वी हा आजार नैसर्गिक झिजेमुळे होतो, असे मानले जात होते. मात्र, आता संशोधनातून असे दिसून आले आहे की, शरीरातील दीर्घकालीन सूज ज्यास ‘क्रॉनिक लो-ग्रेड इन्फ्लेमेशन’ म्हणतात, हीदेखील यात महत्त्वाची भूमिका बजावते. लठ्ठ व्यक्तींमध्ये चरबीच्या पेशी काही रासायनिक घटक स्रवतात. हे घटक सांध्यांमध्ये सूज निर्माण करण्याचे कार्य करतात. त्यातूनच कार्टिलेजच्या पेशींना प्रचंड नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ‘ऑस्टिओ-आर्थ्रायटिस’ हा केवळ हाडांचा किंवा सांध्यांचाच नव्हे, तर चयापचयाशी संबंधित आजार म्हणूनही पाहिला जाऊ लागला आहे.
तरुणांमध्ये हा आजार वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे, स्थूलपणाची वाढती समस्या. शरीराचे वजन वाढल्यास गुडघ्यांवर पडणारा भार अनेक पटींनी वाढतो. सामान्यतः चालताना गुडघ्यांवर शरीराच्या वजनाच्या तीन ते चार पट दाब पडत असतो. त्यामुळे केवळ पाच-दहा किलो अतिरिक्त वजनही, दीर्घ काळात सांध्यांची झीज होण्याचे प्रमुख कारक होऊ शकते.
दुसरे कारण म्हणजे, बदललेली जीवनशैली. दिवसभर संगणकासमोर बसून काम करणे, वाहनांवरचे वाढते अवलंबित्व आणि शारीरिक श्रमांचे कमी झालेले प्रमाण यामुळे स्नायूंची ताकद घटते. गुडघ्याभोवतीचे ‘क्वाड्रिसेप्स’ आणि ‘हॅमस्ट्रिंग’ स्नायू कमकुवत झाल्यास, सांध्यांवरील भार संतुलित राहात नाही. परिणामी, ‘कार्टिलेज’वर अतिरिक्त ताण निर्माण होतो.
तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, क्रीडा आणि व्यायामाशी संबंधित दुखापती. आज ‘फिटनेस संस्कृती’ वाढत असली, तरी अनेकदा योग्य प्रशिक्षणाशिवाय केलेला व्यायाम किंवा खेळांमधील गंभीर दुखापती भविष्यातील ‘ऑस्टिओ-आर्थ्रायटिस’चे बीज रोवतात. गुडघ्यातील ‘अँटेरिअर क्रुशिएट लिगामेंट’ अर्थात ‘एसीएल’ फाटणे किंवा वारंवार होणाऱ्या सांध्यांच्या आघातांमुळे झीज मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते.
‘ऑस्टिओ-आर्थ्रायटिस’ची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षितच होतात. सकाळी काही मिनिटे सांधे आखडणे, बसून उठताना वेदना होणे, जिना चढताना त्रास होणे किंवा गुडघ्यात किरकिर आवाज येणे, ही त्याची प्रारंभिक चिन्हे असू शकतात. आधुनिक वैद्यकशास्त्रात आता ‘एमआरआय’, ‘बायोमार्कर्स’ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने रोगाचे लवकर निदान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण, एकदा ‘कार्टिलेज’ची झीज मोठ्या प्रमाणात झाली की, ती पूर्ववत करणे अत्यंत कठीण ठरते.
उपचारांच्या बाबतीतही पारंपरिक दृष्टिकोन बदलत आहे. पूव वेदनाशामक औषधे आणि शस्त्रक्रिया हेच या समस्येवरील प्रमुख पर्याय मानले जात होते. आता वजन नियंत्रण, स्नायू बळकट करणारे व्यायाम, फिजिओथेरपी, आहारातील सुधारणा आणि रुग्णाच्या वैशिष्ट्यांनुसार उपचार यांना प्राधान्य दिले जाते. यालाच ‘पर्सनलाईज्ड मेडिसिन’ असेही म्हटले जाते. भविष्यात जनुकीय आणि जैवरासायनिक माहितीच्या आधारे, प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र उपचारपद्धती तयार करण्यावर सध्या संशोधन सुरू आहे.
एकूणच, ‘ऑस्टिओ-आर्थ्रायटिस’ हा आता वाढत्या वयाचा नव्हे, तर बदलत्या जीवनशैलीचाही आजार बनत आहे. तिशीत दिसणारी गुडघेदुखी ही साधी वेदना नसून, शरीरातील सुरू झालेल्या जैविक बदलांची सूचना असू शकते. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, वेळेवर निदान, वजन नियंत्रण आणि नियमित शारीरिक हालचाली यांना प्राधान्य देणे, हीच पुढील काळातील सांध्यांच्या आरोग्याची गुरुकिल्ली ठरणार आहे.
(प्रतिनिधी)