नवी मुंबई आणि गुवाहाटी विमानतळांना जागतिक गौरव; प्रिक्स व्हर्साय २०२६च्या यादीत स्थान

"प्रिक्स व्हर्साय वर्ल्ड्स मोस्ट ब्यूटीफुल एअरपोर्ट्स २०२६’च्या यादीत समाविष्ट

Total Views |
Navi Mumbai Airport
 
मुंबई : (Navi Mumbai Airport) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटी येथील लोकप्रिया गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 ने जागतिक स्तरावर मान्यता मिळवली आहे. या दोन्ही विमानतळांचा समावेश प्रतिष्ठेच्या ‘प्रिक्स व्हर्साय वर्ल्ड्स मोस्ट ब्यूटीफुल एअरपोर्ट्स 2026’ यादीत करण्यात आला आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने ही माहिती दिली.
 
दरम्यान, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) ही अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असून, भारतातील प्रमुख विमानतळांच्या विकास, संचालन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. जागतिक यादीत समाविष्ट झालेल्या दोन्ही विमानतळाची जबाबदारी या कंपनीकडे आहे. वास्तुकला, नावीन्य, शाश्वतता, सांस्कृतिक ओळख आणि प्रवासी अनुभव या निकषांवर आधारित हा जागतिक सन्मान दिला जातो. त्यामुळे भारतीय विमानतळांच्या दर्जेदार आणि आधुनिक विकासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मोठी पावती मानली जात आहे. (Navi Mumbai Airport)
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 ची रचना कमळाच्या फुलापासून प्रेरित आहे. वास्तुरचना, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कलात्मकतेची सांगड यामुळे विशेष दखल घेण्यात आली आहे. भारताच्या आधुनिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकांक्षांचे प्रतीक म्हणून या विमानतळाकडे पाहिले जात आहे.
 
तर गुवाहाटी विमानतळाच्या टर्मिनल-2 मध्ये ईशान्य भारतातील जैवविविधतेचे प्रतीक असलेल्या ‘बांबू ऑर्किड’ संकल्पनेवर आधारित रचना साकारण्यात आली आहे. पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम डिझाइनमुळे या टर्मिनलला जागतिक मान्यता मिळाली आहे.
 
पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात दरवर्षी दिला जाणारा प्रिक्स व्हर्साय पुरस्कार हा वास्तुकला आणि डिझाइन क्षेत्रातील प्रतिष्ठित सन्मान मानला जातो. यंदाच्या यादीत चीनमधील ग्वांगझोऊ, जर्मनीतील फ्रँकफर्ट, कंबोडियातील कंडाल स्टुएंग तसेच अमेरिकेतील पिट्सबर्ग आणि सॅन दिएगो विमानतळांचाही समावेश आहे. या गौरवामुळे भारतातील विमानतळ पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी ओळख मिळाली असून पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. (Navi Mumbai Airport)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.