महाकुंभासाठी रामेश्वर नाईक यांच्यावर विशेष जबाबदारी

    16-Jun-2026   
Total Views |
Nashik Kumbh Mela
 
मुंबई : (Nashik Kumbh Mela) पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने राज्य शासनाने रामेश्वर नाईक यांची कुंभमेळा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.
 
रामेश्वर नाईक हे सध्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे कुंभमेळा समन्वयकपदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देश-विदेशातील लाखो भाविक, साधू-महंत, नागा साधू आणि विविध आखाड्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
 
शासकीय आदेशानुसार, कुंभमेळा प्राधिकरण, विविध आखाडे, स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि राज्य शासनाच्या विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधणे, उद्भवणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करणे आणि संपूर्ण नियोजनात सुसूत्रता राखणे, ही जबाबदारी रामेश्वर नाईक यांच्यावर असणार आहे.
 
सध्या राज्य शासनाकडून पायाभूत सुविधा, रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्थापन आणि शाही स्नानाच्या नियोजनाचा आढावा घेतला जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर रामेश्वर नाईक हे कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक व त्र्यंबकेश्वर प्रशासन तसेच प्रमुख आखाड्यांच्या साधू-महंतांसोबत बैठका घेऊन तयारीच्या कामांचा आढावा घेणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध यंत्रणांमधील समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका ते पार पाडणार आहेत.(Nashik Kumbh Mela)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.