मुंबई महानगर प्रदेशासाठी एकात्मिक बस वाहतूक व्यवस्था

अंमलबजावणीसाठी तांत्रिक व अभ्यास गटाची स्थापना

Total Views |
Mumbai Metropolitan Region
 
मुंबई : (Mumbai Metropolitan Region) मुंबई महानगर प्रदेशातील बस वाहतूक सेवा अधिक सुसंगत, प्रवासी-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर विकास विभागाने एकात्मिक बस वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक गट आणि अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.
 
एकात्मिक बस नेटवर्कची गरज का?
 
नीती आयोगाच्या G-HUB (Growth Hub) संकल्पने अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशाची पायलट सिटी-रिजन म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरमधील विविध बस परिवहन संस्थांमध्ये समन्वय वाढवून प्रवाशांना अखंड आणि सुलभ सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
तांत्रिक गटाची प्रमुख जबाबदारी
 
बेस्ट, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि पनवेल परिवहन व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या तांत्रिक गटाला बस मार्गांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना, विविध परिवहन संस्थांच्या वेळापत्रकामध्ये समन्वय, तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, बस डेपो, टर्मिनल्स व इतर पायाभूत सुविधांची भागीदारी, आंतरशहरी व बहु-प्राधिकरण क्षेत्रातील प्रवासासाठी एकसमान भाडे धोरणाची शिफारस, महसूल वाटपाची रूपरेषा तयार करणे या बाबींचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या तांत्रिक गटाने दि. १५ जुलै २०२६ पर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे.
 
अभ्यास गट काय करणार?
 
बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर आणि पनवेल महानगरपालिकांच्या आयुक्तांचा समावेश आहे. हा अभ्यास गट सर्व परिवहन संस्थांसाठी एकसमान व सुसूत्र भाडे रचना तयार करणे, प्रवाशांच्या खर्चात बचत होण्यासाठी ‘टेलिस्कोपिक भाडे’ प्रणालीचा विचार, सामायिक तिकीट प्रणालीतील महसूल वाटपाचे सूत्र निश्चित करणे आणि आंतर-प्राधिकरण बससेवांसाठी समन्वय यंत्रणा विकसित करणे या बाबींचा अभ्यास करेल. या अभ्यास गटाने दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत शासनाकडे अंतिम प्रस्ताव सादर करायचा आहे.
 
प्रवाशांना काय फायदा होणार?
 
या उपक्रमामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध बस सेवांमधील समन्वय वाढण्याची अपेक्षा आहे. एकसमान तिकीट प्रणाली, सुधारित वेळापत्रके, कमी प्रतीक्षा वेळ, सुलभ आंतरशहरी प्रवास आणि तंत्रज्ञानाधारित सेवा यामुळे लाखो प्रवाशांना अधिक सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होऊ शकते. (Mumbai Metropolitan Region)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.