मुंबई : (Digital Entry Pass) आगामी पावसाळी अधिवेशन सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्धरित्या पार पडावे या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे, त्याचप्रमाणे डिजिटल प्रवेशपास व्यवस्था सुरु करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानभवन येथे पूर्वतयारीसंदर्भात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, सचिव-२ मेघना तळेकर इटकेलवार, सचिव-३ डॉ. विलास आठवले, सचिव-४ शिवदर्शन साठ्ये यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, वाहनतळ व्यवस्था, अधिवेशन कालावधीतील अनुभवी डॉक्टरांची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, उपहारगृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा, उपहारगृहातील स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी, विधानभवन परिसरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, अखंडित पाणीपुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा, रेल्वे आरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्था या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रवेश नियंत्रण कडक ठेवा
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, “पावसाची शक्यता लक्षात घेता सुरक्षित मंडप, सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात कर्मचाऱ्यांसाठी अन्न पाकिटे, स्वच्छ आणि सुसज्ज उपहारगृह याबाबत अत्यंतीक दक्षता घेण्यात यावी. अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली असून प्रवेश नियंत्रण कडक ठेवावे, वाहनतळ व्यवस्था उचित असावी तसेच सुरक्षा, स्वच्छता व आपत्कालीन सेवा पूर्णतः सज्ज ठेवाव्यात.”(Digital Entry Pass)
खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासावी
ते पुढे म्हणाले की, “पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसा बंदोबस्त ठेवावा, सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, सार्वजनिक बांधकाम विभागाने सभा मंडप व पूरक कामे तात्काळ पूर्ण करावीत, विद्युत विभागाने अखंडित सेवा सुनिश्चित करावी तसेच उपहारगृह अधिवेशन काळात अधिक वेळ सुरू ठेवून खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. रेल्वे विभागाने दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या प्रवासाची सुविधा अग्रक्रमाने उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे वार्तांकनासाठी येणाऱ्या पत्रकारांसाठी मंडप आणि आवश्यक सुविधा सुनिश्चित कराव्यात.”(Digital Entry Pass)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....