मराठी नामफलक सक्तीची पालिकेची धडक मोहीम; १,१२४ दुकानदारांवर कारवाई
16-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Municipal Corporation) मुंबई महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेतील नामफलक सक्तीने लावण्याच्या नियमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेचा पहिला टप्पा शुक्रवारी (१३ जून) पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात पालिकेने केलेल्या व्यापक तपासणीत ३५ हजार ४२८ आस्थापनांची पाहणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार १२४ व्यावसायिकांवर ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमा’अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या धोरणानुसार मुंबईत मराठी भाषेला प्राधान्य मिळावे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने पालिकेने १४ मे ते १२ जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. उपमहापौर, विधी समिती अध्यक्षा तसेच उपायुक्त (विशेष) यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या विशेष पथकांनी शहरातील प्रमुख रस्ते, महत्त्वाचे मार्ग आणि व्यापारीदृष्ट्या गजबजलेल्या परिसरांतील आस्थापनांची तपासणी केली. या दरम्यान ज्या दुकानांवर मराठी भाषेतील नामफलक नव्हते, त्यांची नोंद घेऊन संबंधितांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, तपासणी करण्यात आलेल्या ३५ हजार ४२८ आस्थापनांपैकी ३४ हजार ३०४ आस्थापनांवर नियमानुसार मराठी नामफलक आढळून आले. त्यामुळे मुंबईतील बहुतांश व्यापारी आणि व्यावसायिकांनी नियमांचे पालन केल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोहिमेमुळे व्यापारी वर्गात मराठी नामफलकांविषयी जागरूकता वाढली असून, अनेकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन केल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या मोहिमेदरम्यान केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता जनजागृतीलाही प्राधान्य देण्यात आले. पहिल्या टप्प्यातील मोहीम पूर्ण झाली असली तरी काही व्यापारी अद्याप नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून पुढील काळातही अचानक धाडसत्रे आणि तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.(Mumbai Municipal Corporation)