मुंबई : (Vehicle Registration) राज्यातील वाढती वाहनसंख्या, नागरिकांची वाढती गरज आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेता राज्य सरकराने नवीन प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये स्थापन करण्यासाठी निकष निश्चित केले आहेत. परिवहन विभागाने यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने सादर केलेला अहवाल शासनाकडे पाठविला असून त्यामधील शिफारसींना तत्त्वतः मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील दुर्गम व वाढत्या शहरी भागांतील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन तपासणी, कर भरणा आणि इतर सेवांसाठी दूरच्या कार्यालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. नवीन कार्यालय स्थापन करण्यासाठी वाहनसंख्या, लोकसंख्या, महसूल, भौगोलिक अंतर आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यांसारखे स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात किमान चार तालुके, पाच लाखांहून अधिक वाहने, सात लाखांहून अधिक लोकसंख्या आणि वार्षिक 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल असणे आवश्यक राहणार आहे.
याशिवाय, विद्यमान परिवहन कार्यालयापासून 50 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पूर्ण कार्यालयाची आवश्यकता नसेल, तेथे नागरिकांच्या सोयीसाठी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र आणि स्वयंचलित वाहन चालक चाचणी केंद्र उभारण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.(Vehicle Registration)
रोजगारनिर्मितीलाही चालना
नवीन प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांच्या स्थापनेमुळे प्रशासनिक सुविधा वाढण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा केंद्रांमुळे परिवहन व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.
“राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत सेवा मिळणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाहनसंख्येत झालेली मोठी वाढ लक्षात घेता परिवहन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. नवीन कार्यालयांमुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल.”
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री (Vehicle Registration)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.