बंदर क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी वेगाने प्रयत्न; राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम - मंत्री नितेश राणे

Total Views |
Nitesh Rane
 
मुंबई : (Nitesh Rane) सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी संबंधित विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात यावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. विद्यमान आयटीआय इमारतींमध्येच विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जाणार असून, अद्ययावत व उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
 
राज्यातील बंदरे क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने बंदरे विभागाशी निगडित आयटीआय कौशल्य विकास व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक अधिसूचना जारी करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
 
बैठकीत निवडक आयटीआय संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सागरी व किनारी भागांमधील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्यावर विशेष भर देण्यात आला.
 
विशेषतः शिप बिल्डिंग, पोर्ट ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, मरीन मेकॅनिक्स, कोस्टल मॅनेजमेंट आणि सागरी सुरक्षा यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वाढवण बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा विचार करून उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक युवकांना प्राधान्याने प्रशिक्षण देऊन त्यांना बंदर क्षेत्रातील रोजगारासाठी सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
 
बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक , राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सहसचिव विकास ढाकणे , कौशल्य विभागाचे सल्लागार चिन्मय शेटे व इंद्रराज राणे ,रूरल एनहान्सर्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयडे,वॅगन्स लार्निंग लिमिटेडचे उदय शेट्टी,अश्विन कसलीवाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.(Nitesh Rane)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.