वनतारामधील उपचारानंतर ‘माधुरी’ हत्तीण कोल्हापुरात परतणार; वर्षभराच्या उपचारांना यश
16-Jun-2026
Total Views |
कोल्हापूर : (Madhuri Elephant) गेल्या वर्षभरापासून गुजरातमधील Vantara येथे उपचार घेत असलेली ‘माधुरी’ ही लाडकी हत्तीण आता पूर्णपणे बरी झाली असून लवकरच कोल्हापूरमधील आपल्या निवासस्थानी परतणार आहे. तिच्या प्रकृतीत झालेली उल्लेखनीय सुधारणा आणि यशस्वी पुनर्वसनामुळे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
एक वर्षापूर्वी माधुरीला विशेष वैद्यकीय उपचार आणि सातत्यपूर्ण देखभालीची गरज असल्याने वनतारामध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्या उपचारासाठी पशुवैद्यक, प्राणी साभाळणारे, आहारतज्ज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ यांच्या पथकाने एकत्रितपणे काम केले. तिच्या आरोग्यापासून आहारापर्यंत आणि मानसिक स्वास्थ्यापासून दैनंदिन देखभालीपर्यंत प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.
उपचारादरम्यान माधुरीला शांत, सुरक्षित आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे तिच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत गेली. कालांतराने तिने आपली ताकद आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवला. तिच्या प्रकृतीतील बदल पाहून तज्ज्ञांनी तिला आता आपल्या मूळ ठिकाणी परतण्यास योग्य असल्याचे मान्य केले आहे. वनतारामधील तज्ज्ञांच्या मते, माधुरीची यशस्वी उपचारयात्रा ही समर्पित वन्यजीव संवर्धन आणि पुनर्वसन कार्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
माधुपरी हत्तीण आधी ज्या ठिकाणी होती, त्या नांदणी मठात तिला आणण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येते आहे. माधुरीसाठी आवश्यक सुविधा,सुरक्षा पुनर्वसनाच्या ठिकाणी पुरवण्यासाठी वनताराची टीम मठाच्या सहाकार्याने कार्यरत आहे. यासाठी वनताराची टीम दोन दिवस नांदणी येथे तळ ठोकून होती.
माधुरी हत्तीणीला विशेष आरोग्य सुविधा आणि देखभालीसाठी २८ जुलै २०२५ रोजी गुजरात येथील वनतारा प्रकल्पात नेण्यात आले होते. यानंतर कोल्हापूरसह महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात आंदोलने देखील झाली होती. हा वाद कोर्टातही गेलेला. माधुरीला परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. (Madhuri Elephant)