देवभूमीत जहाल फुटबॉलप्रेमींना खामेनीचा पुळका!

    16-Jun-2026   
Total Views |

सध्या सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकादरम्यानही देशातील अनेक धर्मांधांना खेळातही धर्म शोधण्याची खुमखुमी आली. या विश्वचषकावर आरोप करीत धर्मांधांनी इराण, पॅलेस्टाईन यांच्या समर्थनार्थ घोषणा देणारी फलकबाजी केरळममध्ये केली. भारत-पाकिस्तानच्या बाबतीत ‌‘खेळात धर्म शोधू नका‌’ असे गळे काढणारे आज मात्र मौन धारण करुन आहेत.

गेल्या दि. 11 जूनपासून विश्वचषकाचे फुटबॉल सामने सुरू झाले. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये हे सामने खेळविले जात आहेत. अमेरिकेतील 11, मेक्सिकोमधील तीन आणि कॅनडामधील दोन शहरांमध्ये, या विश्वचषकासाठीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झाले असून, या स्पर्धेची जगात सर्वत्र उत्सुकता आहे. जगभरातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमी या खेळाचा आनंद लुटत आहेत. पण, या ‌‘फिफा‌’ सामन्यांचे निमित्त साधून काही कडवे, धर्मांध आपलेच घोडे पुढे दामटवण्याचाही प्रयत्न करत आहेत. असे कडवे, जहाल अन्य देशांप्रमाणे भारतातही आहेत. ‌‘फिफा‌’ सामन्याचे निमित्त करून, केरळम्‌‍ राज्यातील काही धर्मांध लोकांना इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी, इराण आणि पॅलेस्टाईन यांचे भरते आले आहे. अमेरिका-इस्रायल यांचे इराण आणि पॅलेस्टाईन यांच्यासमवेत युद्ध सुरू असून, ते युद्ध येत्या शुक्रवारी थांबण्याची दाट चिन्हे आहेत. पण, काहीही निमित्त करून इराण, खामेनी आणि पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित करून, त्याकडे इतरांचे लक्ष वेधायचे असा प्रयत्न काही जहाल, धर्मांध गट करीत असतात. केरळम्‌‍ राज्यात असाच प्रकार घडला.

बंदी घालण्यात आलेल्या ‌‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया‌’ या संघटनेकडून शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्याचे काम, कन्नूरच्या नारथ भागात चालत असे. त्याच भागात इराण, खामेनी आणि पॅलेस्टाईन यांचा उदो उदो करणारे फलक लागले आहेत. निमित्त काय, तर ‌‘फिफा‌’ विश्वचषक सामने! केरळम्‌‍ राज्यात फुटबालप्रेमी खूप आहेत. अशा चाहत्यांचे आवडते संघ आणि खेळाडूही आहेत. लिओनील मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यावर प्रेम करणारे अनेक चाहतेही, या राज्यात आहेत. असे संघ आणि खेळाडू यांना पाठिंबा दर्शविणारे फलक राज्यभर दिसतात. पण, यावेळी कन्नूर जिल्ह्यात जरा वेगळे चित्र दिसले. इराणचे समर्थन करणारे फलक या जिल्ह्यात आढळून आले. इराणचा संघ एवढा महत्त्वाचा नसला, तरी त्याकडे लक्ष वेधायचा प्रयत्न काही जहाल गटांनी केला आहे. या जहाल गटांनी जे फलक लावले, त्यावर खेळाडूंऐवजी इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे चित्र होते. त्याच्याच जोडीला ‌‘फ्री पॅलेस्टाईन‌’ अशी घोषणाही लिहिली होती.

या स्पर्धांचे निमित्त करून, आपला धार्मिक आणि राजकीय अजेंडा राबविण्याचा हा प्रकार निश्चितच संतापजनक होता. ‌‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया‌’ या संघटनेचा प्रभाव ज्या भागात होता, तेथेच असे फलक लावण्यात आले होते. केरळम्‌ची जनता आतापर्यंत ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी यांची चाहती राहिली आहे. यावेळी अचानक त्यामध्ये इराण कोठून आला? अयातुल्ला खामेनी आणि फुटबॉल यांचा काय संबंध, अशा चर्चा समाजमाध्यमांवर होऊ लागल्या आहेत. खामेनी कोच आहेत की खेळाडू? असे प्रश्नही विचारले जाऊ लागले आहेत. या स्पर्धेसाठी कतार आणि सौदी अरब यांचे संघ पात्र ठरले. पण, त्यांच्या समर्थनार्थ कोठेही असे फलक लागले नाहीत. खरे म्हणजे या दोन देशांमध्ये ‌‘मल्याळी‌’ समाज मोठ्या संख्येने आहे. ‌‘फिफा‌’ स्पर्धेचे निमित्त करून, धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या अशा प्रयत्नांमागे कोण आहेत, याचा तपास पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे. पण, ‌‘फिफा‌’ स्पर्धेचे निमित्त करून काही धर्मांध गटांकडून असे जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

‌‘भीम आम‌’ आणि चर्च यांचे साटेलोटे?

मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यामध्ये ‌‘भीम आम‌’चा नेता मुकेश आझाद याच्यावर त्या भागातील ‌‘बरेला‌’ आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठीचे उपक्रम आयोजित केल्याचे आरोप केले जात असून, त्यावरून राजकीय आणि समाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, हा राजकीय हल्ल्याचा प्रकार असल्याचा आरोप ‌‘भीम आम‌’ने केला आहे. पण, या भागात धर्मांतराचे जाळे सक्रिय असल्याचे स्थानिक जनतेचे म्हणणे आहे. मुकेश आझाद हा सिहोर जिल्हा ‌‘भीम आम‌’चा अध्यक्ष आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात ‌‘बरेला‌’ आदिवासींच्या बैठका आयोजित करून, त्या समाजातील लोकांना ख्रिस्ती बनविण्याचे प्रयत्न मुकेश आझाद याच्याकडून केले जात असल्याचाही स्थानिकांचा आरोप आहे. या सर्व प्रकाराने, तेथील विविध आदिवासी समाजांमध्ये तणावाचेच वातावरण आहे. सिहोर जिल्ह्यातील बनिया खेड्यामध्ये, मुकेश आझाद आणि त्याचे सहकारी रात्री उशिरा स्थानिक आदिवासींना गोळा करून धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचा आरोप होत आहे.

हा प्रकार कळल्यानंतर त्या भागात हाणामारीच्या घटनाही घडल्या. या भागात ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या हालचाली वाढत असल्याबद्दल, बरेला आदिवासी समाजाच्या सदस्यांनी तीव्र चिंताही व्यक्त केली आहे. या भागात ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रभाव वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या परंपरागत प्रथा, पद्धती बंद कराव्यात आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावा, यासाठी या आदिवासी समाजाचे मन वळविण्याचे प्रयत्न केले होत आहेत.

गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यातील काही भागात लोकसंख्यात्मक आणि धार्मिक बदल झाल्याचेही दिसून आल्याचा दावा, स्थानिक नागरिकांचा आहे. आमच्या समाजाच्या लोकांना प्रलोभन दाखवून किंवा त्यांच्यावर दबाव टाकून, त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा आदिवासी समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. धर्मांतर करण्यासाठी चर्चशी संबंधित पैशांचा वापर केला जात आहे, असा स्थनिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. मात्र, धर्मांतराच्या कोणत्याही कृतीशी आपला काहीही संबंध नसल्याचे मुकेश आझाद यांनी म्हटले आहे. आपल्या राजकीय विरोधकांकडून ठरवून आपणास लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही मुकेश आझाद यांनी केला आहे. उफाळलेला हा वाद आणि त्यानंतर झालेला संघर्ष लक्षात घेऊन प्रशासनाने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. धर्मांतराच्या वृत्तास पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नाही. असे असले तरी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, परिस्थितीकडे पोलीस यंत्रणेचे बारकाईने लक्ष आहे.

बांगलादेशात हिंदूविरोधी मोर्चा!

बांगलादेशमधील ‌‘इस्लामी छात्र शिबीर‌’ आणि ‌‘हेफजत-इ-इस्लाम‌’ या जहाल संघटनांच्या सदस्यांनी, अलीकडेच राजधानी ढाका येथे मोर्चा काढला. बांगलादेशमधील गायबंधा जिल्ह्यात प्रभू रामचंद्रांच्या भव्य मूर्तीचे जे बांधकाम केले जात आहे, ते पाडून टाकावे अशी मागणी या मोर्चातील सहभागींकडून करण्यात आली. मोर्चामध्ये सहभागी झालेले रामाची प्रतिमा असलेल्या फलकाची विटंबना करीत होते. गेल्या आठवड्यात शुक्रवार, दि. 12 जून रोजी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उल्लेख केलेल्या दोन संघटनांचे कार्यकर्ते, या मोर्चात सहभागी झाले. गायबंधा जिल्ह्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती उभी करू नये, अशी या निदर्शकांची मागणी होती. सध्या बांधकाम सुरू असलेला हा प्रकल्प थांबविण्यात यावा आणि रामाची प्रतिमा पाडून टाकावी, अशी मागणीही या निदर्शकांनी केली. या रामाच्या मूर्तीस अनेक जहाल मुस्लीम गट विरोध करीत आहेत. या प्रकल्पाविरुद्ध ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रचार मोहिमाही राबविल्या आहेत. तर, काही जहाल मौलवींनी राममूत पाडून टाकण्याचे आवाहनही केले आहे. ‌‘जर प्रशासनाने काही कृती केली नाही, तर मुस्लीम हा विषय आपल्या हातात घेतील,‌’ अशी धमकीही, काही धर्मांध लोकांनी दिली आहे. मुस्लीम समाजाचा विरोध आणि निर्माण केला गेलेला तणाव लक्षात घेऊन, सदर प्रकल्पाची उभारणी करणाऱ्यांनी ते कार्य तूर्त थांबविले आहे. बांगलादेशमधील मुस्लीम समाजास, तेथील अल्पसंख्य हिंदू समाजाविरुद्ध कशा प्रकारे भडकविले जात आहे, तसेच त्या देशात हिंदू देव-देवतांचा कसा अवमान केला जात आहे, त्याचे हे ताजे उदाहरण!

9869020732





दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.