धारणीय वेग; वाक्‌‍ आवेग (भाग १७)

Total Views |


काया वाचा मन एकविध करी|
एक देह धरी नित्य सुख॥
संत गोरा कुंभार अभंगांत सांगतात की, आपल्या शरीराला (काया), वाणीला (वाचा) आणि मनाला एकाग्र करून एकनिष्ठ व्हा. जेव्हा हे तिन्ही एकरूप होतात, तेव्हाच मानवी देहाला खऱ्या आणि नित्य (शाश्वत) सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे केवळ शरीर आणि मनच नाही, तर उत्तम मानवी स्वास्थ्यासाठी वाणीवरील नियंत्रणही तितकेच महत्त्वाचे. यालाच आयुर्वेदात ‌‘वाक्‌‍ आवेग‌’ असे म्हटले आहे. तेव्हा, नेमके हे ‌‘वाक्‌‍ आवेग‌’ कोणते? त्यांचे नियंत्रण का महत्त्वाचे आहे? यासंबंधीची माहिती देणारा आजचा हा लेख...


धारणीय वेग‌’मध्ये विविध मानसिक भावनांच्या विचारांचे आपण आधीच्या काही लेखांमधून विवेचन केले. ‌‘मानस भाग‌’
(Mental Urges) यांना नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे, जेव्हा ते नकारात्मक आणि विद्ध्वंसक वृत्तीचे आहेत. सगळ्याच भावभावना या नकारात्मक नसतात. पण, चांगले भावही परिवर्तित होऊन कधी नकारात्मक भाव होतात, हे त्या व्यक्तीलाही चटकन कळत नाही. जेव्हा इतरांच्या आनंदात, यशात, प्रगतीमध्ये आपणदेखील आनंदी आणि समाधानी होतो, तेव्हाच मन आणि त्यातील भाव हे सकारात्मक राहतात.

प्रत्येकाने स्वतःच्या वाढीसाठी, प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे, सातत्याने कष्ट करावे. आपण यशस्वी होतोच आणि त्या यशात आनंदी व समाधानीदेखील होतो. या यशात घरदार, मित्रपरिवार सगळे सहभागी होतात आणि यश अधिक जाणवते. पण, नकारात्मक भावनांमुळे नात्यांमध्ये दुरावा उत्पन्न होतो, कटुता येते, साशंकता येते. एकमेकांवरचा विश्वास कमी होतो आणि कालांतराने ते नातेच उरत नाही. प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, ती म्हणजे, एका चुकीच्या निर्णयामुळे, एका चुकीमुळे कोणतीही व्यक्ती संपूर्ण चुकलेली आहे, असे होत नाही. नातेसंबंध जिथे महत्त्वाचे आहेत, तिथे चुका झाल्या, तरी माफी करून, गैरसमज दूर करून, नाते जपण्याचा प्रयत्न करावा. याने जो आनंद, समाधान, तृप्ती मिळते, ही कायमस्वरूपाची असते.

धारणीय वेग मुख्यत्वे करून मानसिक आवेग असतात. पण, आयुर्वेदात धारणीय वेगांमध्ये वाक्‌‍ (वाचा-Verbal) आवेग (Urges)बद्दलदेखील सांगितले आहे. तसेच काही शारीरिक (Physical Urges) आवेगदेखील वर्णन केले आहेत, जे धारणीय स्वरूपाचे आहेत. आपण आज या दोन प्रकारातील धारणीय वेगांबद्दल जाणून घेऊया.

धारणीय वेग म्हणजे त्या प्रवृत्ती (Urges) ज्यांचे प्रगटीकरण थांबावावे, रोखावे. त्यांची उत्पत्तीस, प्रवाह थांबवावा. चरकाचार्यांनी मुख्यत्वे करून चार वाक्‌‍ धारणीय वेग सांगितले आहेत. ते म्हणजे, परुषस्य अतिमात्रा (म्हणजेच, अत्यंत कठोर-रुक्ष वचन-बोली) इतरांना जिव्हारी लागेल, टोचेल, कुणाला रडू येईल, इतक्या टोकाची कठोर वाणी असणे, रुक्ष वचन म्हणजे ज्यांत समोरच्या व्यक्तीच्या मनाचा, परिस्थितीचा, सभोवतालाचा विचार न करता थेट खड्या शब्दांत ऐकविणे. (मग त्या व्यक्तीची चूक असो वा नसो.) आनंदाची बातमी सांगणाऱ्यालाच फटकारणे किंवा यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त न करता, त्या व्यक्तीतील चुका, कमीपणा दाखविणे, घालून-पाडून बोलणे, असे बोलणे जेणेकरून समोरच्या व्यक्तीची मान शरमेने झुकून जाईल, आनंदाच्या क्षणावरही विरजण लागल्यासारखे होऊन जाईल. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार न करता, कठोर, कोरडे, उपहासात्मक आणि मनाला लागणारे शब्द बोलणे, यामध्ये दरवेळेस बोलणाऱ्या व्यक्तीची चुकीची-वाईट भावना नसते; पण बोलण्याची पद्धतही असू शकते. जेव्हा बरोबर बोलणेसुद्धा टोमणे मारल्यासारखे बोलले जाते, तेव्हा त्याचा त्रासच होतो. मग कठोर बोलणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहिले जाते. त्यांचा सहवास टाळला जाऊ लागतो आणि मग ही व्यक्ती एकटी पडू शकते. बोलताना मधुर वाणी असणे महत्त्वाचे आहे. सांगताना, समजावताना प्रेमळ बोल बोलल्यास ते लवकर आत्मसात होतात, लवकर पटते आणि तसे आचरणातही उतरवले जाते. याविपरीत कठोर-रुक्ष शब्द, अप्रिय वचन कितीही फायद्याचे सल्ले का असेना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लोकांना असते. असे होऊ नये, म्हणूनच परुष वाक्‌‍ (कठोर वाचा) टाळावी. या वाक्‌‍ वेगाचे धारण (Control) करावे.

दुसरे धारणीय वाक्‌‍ वेग म्हणजे ‌‘सूचकस्य.‌’ याचा साध्या बोलीभाषेतील अर्थ म्हणजे ‌‘चुगलखोरी‌’ होय. एखाद्या व्यक्तीने अगदी मनातले सांगितले, जवळचे मानून सांगितले, तर ती गोष्ट आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवावी, त्याची इतरांपुढे वाच्यता करू नये. सुख-दुःखाचे काही क्षण असतात. त्या क्षणांमध्ये प्रत्येकाला दरवेळेस सामील केले जात नाही. काही जवळच्या व्यक्तीसमोरच मन मोकळे बोलले जाते. मनातील इच्छा, आकांक्षा, भीती, इतरांनी दिलेल्या जखमा, दुःख, निराशा, अपयश इ. कुणाबरोबर तरी शेअर करावेसे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्या व्यक्तीने ऐकल्यानंतर स्वतःपुरते ते मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे. पण, काहींना इकडची गोष्ट तिकडे सांगायची सवय असते. बातमी खोलातून काढून-ऐकून ती पसरविणे, चुगली करणे, पाठीमागून (त्या व्यक्तीच्या गैरहजेरीत) सांगणे, मीठ-मसाला लावून वाढवून सांगणे अशी काहींना सवय असते. हे करणे टाळावे. चुकीची बातमी पसरविणे, अफवा उडविणे हे चुकीचे आहे. तसेच खासगी-गुप्त गोष्टी विश्वासात घेऊन सांगितल्यास त्याचा बोभाटा करू नये, चार-चौघांमध्ये ती व्यक्त करू नये, पसरवू नये. अशा चुगलीखोर वृत्तीला ‌‘सूचकस्य‌’ असे म्हटले आहे. एखाद्याने भरवशाने सांगितलेली गोष्ट अशी उघड्यावर, चव्हाट्यावर जर आली, तर त्या व्यक्तीची बदनामी होऊ शकते, नाचक्की होऊ शकते. एखादे गुपित जर असे फोडले, तर त्या व्यक्तीला नुकसानही होऊ शकते. काही वेळेस जीवितहानीपर्यंतही परिस्थिती जाऊ शकते. तेव्हा, असा स्वभाव टाळावा आणि असा स्वभाव असलाच, तर कुणाची गुप्त-खासगी गोष्टी ऐकू नये. समोरच्या व्यक्तीला वेळीच थांबवावे.

तिसरी वाक्‌‍ धारणीय वेग म्हणजे ‌‘अनृत.‌’ याला मराठीमध्ये ‌‘खोटे बोलणे‌’ असे म्हटले जाते. लहानपणापासून ‌‘नेहमी खरे बोलावे‌’ हा पाठ आपण शिकत असतो. पण, काहींना अतिशयोक्तीची सवय असते किंवा असलेली गोष्ट आहे तशी न सांगत, विरुद्ध/विपरीत सांगणे, असेही काही व्यक्ती वागतात-करतात. परीक्षेत नापास झाल्यावर आपण उत्तीर्ण झालो, हे सांगणे व ते तसे गुण पत्रिकेत बदलणे, हे तसे बघता छोटे दिसू शकते. पण, जशी छोटी चोरी पकडली गेली नाही, तर चोर अधिक धाडस करुन मोठा डल्ला मारतो. तसेच काहीसे या परिस्थितीत ही घडते.

आधी स्वतःला वाचविण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लपविणे किंवा खोट सांगणे आणि मग ती प्रतिमा जपण्यासाठी अजून खोटं बोलत राहणे, असे हळूहळू होऊ लागते. ‌’Habitual liar' ज्याला सदैव खोटं बोलण्याची सवय लागून जाते, त्यांचीदेखील सुरुवात आधी छोट्या छोट्या चुका लपविण्यासाठी बोललेलं खोटं असेच सुरू होते आणि कालांतराने मोठे घोटाळे चोऱ्या लूटमार इ. कृती करण्यास प्रवृत्ती वाढू लागते. वेळेतच आवर घालणे (Nip in the bud) हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या पाल्याला आई-वडिलांनी शिस्त लावणे, संस्कार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. मोठे होऊन उत्तम नागरिक होण्यासाठी उत्तम व्यक्ती असणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या सवयींच्या आहारी न जाता वेळीच त्यावर बंदी आणणे, चुकीच्या गोष्टींना शिक्षा करणे, समजाविणे इ. सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण, एकदा जर विश्वास त्या व्यक्तीवरचा उडला, तर पुन्हा विश्वासार्ह होणे अत्यंत कठीण असते.
(क्रमशः)

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
[email protected]






वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द.