जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमुळे (Cardiovascular Diseases - CVDs) दरवर्षी सुमारे 1.8 कोटी लोकांचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी वयातच अधिक प्रमाणात आढळून येतो. आंतरराष्ट्रीय पुरुष आरोग्य सप्ताहानिमित्त पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण का जास्त आहे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती पावले उचलता येऊ शकतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक का असतो?
हृदयविकाराच्या वाढत्या धोक्यामागे आनुवंशिकता, जैविक घटक आणि जीवनशैली यांचा मोठा वाटा असतो. पुरुषांमध्ये धूम्रपान, अतिमद्यपान, असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांसारख्या सवयी अधिक प्रमाणात आढळतात. या सवयी हृदयविकाराचा धोका वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
याशिवाय, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्या अनेकदा दुर्लक्षित राहतात किंवा त्यांचे वेळेत निदान होत नाही. परिणामी, हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो.
दुर्लक्ष करू नयेत अशी चेतावणीची लक्षणे
हृदयविकाराची लक्षणे नेहमीच स्पष्ट स्वरूपात दिसून येतात असे नाही. छातीत दुखणे हे सर्वात परिचित लक्षण असले तरी इतर काही महत्त्वाच्या लक्षणांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
यामध्ये पुढील लक्षणांचा समावेश होतो :
• दैनंदिन कामे करताना किंवा विश्रांती घेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होणे
• जबडा, मान, खांदे, पाठ किंवा हातांमध्ये वेदना जाणवणे
• सतत थकवा जाणवणे किंवा अचानक अनाकलनीय थकवा येणे
• हृदयाचे ठोके वेगाने धडधडणे किंवा धडधड जाणवणे
• चक्कर येणे
• घोटे, पाय किंवा पावलांमध्ये सूज येणे
अनेक पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी ही लक्षणे दिसून येऊ शकतात.
हृदयासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार
सकारात्मक बाब म्हणजे, जीवनशैलीत योग्य बदल करून अनेक हृदयविकार टाळता येऊ शकतात.
प्रौढ व्यक्तींनी आठवड्याला किमान 150 मिनिटे शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. एरोबिक व्यायामासोबत स्नायू बळकट करणारे व्यायामही नियमितपणे करावेत.
तसेच, फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, सुकामेवा आणि मासे यांचा समावेश असलेला संतुलित आहार हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. मीठ, साखर, तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व
तणाव कमी करण्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. दीर्घकाळ टिकणारा तणाव रक्तदाब वाढवू शकतो, झोपेच्या समस्या निर्माण करू शकतो आणि चुकीच्या आहाराच्या सवयींना कारणीभूत ठरू शकतो. या सर्व गोष्टी हृदयविकाराचा धोका वाढवतात.
योग, ध्यानधारणा, माइंडफुलनेस आणि पुरेशी विश्रांती यांसारख्या उपायांमुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखता येते.
नियमित आरोग्य तपासणी आवश्यक
नियमित आरोग्य तपासणी करणे हे हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी, रक्तातील साखरेचे प्रमाण, वजन आणि शरीरातील चरबीचे प्रमाण यांची वेळोवेळी तपासणी केल्यास संभाव्य धोके लवकर ओळखता येतात.
पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. योग्य वेळी घेतलेली काळजी हृदयविकाराचा धोका कमी करून निरोगी आणि सक्रिय जीवन जगण्यास मदत करू शकते.
डॉ. अरविंद बडिगेर Technical Director BDR Pharmaceuticals