मुंबई : (Dharavi, Digital Twin) धारावीचा आता एक डिजिटल ट्विन (डिजिटल प्रतिरूप) तयार करण्यात आला आहे. अत्यंत दाट लोकवस्ती असलेली धारावी येत्या दहा वर्षांत बहुमजली इमारतींच्या स्वरूपात विकसित होणार आहे. पुनर्वसनासाठीच्या इमारतींसोबतच आलिशान टॉवर्स आणि कॉर्पोरेट कार्यालयेही उभी राहतील. सध्याच्या धारावीची सर्व माहिती या डिजिटल ट्विनमध्ये जतन केली जाणार असून, गरज पडल्यास ती माहिती सहजपणे पाहता आणि अभ्यासता येईल.
नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “डिजिटल ट्विन हे आजच्या धारावीचे अचूक प्रतिरूप आहे. काही मोजके भाग वगळता संपूर्ण धारावीचे सविस्तर मॅपिंग करण्यात आले आहे. हे मॅपिंग एखाद्या होलोग्राम सारखे आहे. ते उघडल्यावर संबंधित युनिटची रचना, त्यातील रहिवासी आणि इतर सर्व तपशील पाहता येतात.” अधिकाऱ्यांच्या मते, डिजिटल ट्विनचा वापर सध्या डीआरपी-एसआरएकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आणि झोपडपट्टी रहिवाशांच्या पात्रतेची अंतिम यादी (Annexure II) तयार करण्यासाठी केला जात आहे.
धारावीतील प्रत्येक कुटुंबाची माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने संकलित व जतन केली आहे. डीआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. या विशेष उद्देश वाहनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे डिजिटल मॅपिंग केवळ ऐतिहासिक किंवा संग्रहित नोंदींसाठी नसून, रहिवाशांना मोफत किंवा भाडेआधारित घरांसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व न्यायालयीन प्रकरणांची माहिती नोंदवण्यासाठी वापरले जात आहे.
सर्व्हेक्षण माहिती संकलन
सुरुवातीला ड्रोनच्या मदतीने संपूर्ण 621 एकर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे धारावीतील सुमारे 1.25 लाख युनिट्स ओळखता आली. त्यानंतर LiDAR तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्ष गल्ल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.प्रत्येक गल्लीत सरासरी 150 झोपड्या/युनिट्स असल्याचे दिसून आले. यानंतर धारावीचा डिजिटल नकाशा तयार करण्यात आला. त्यावर प्रत्येक युनिटचे त्रिमितीय (3D) मॉडेल तयार करून त्याचा आकार, मालकी हक्क, रहिवाशांनी सादर केलेली कागदपत्रे इत्यादी माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली गेली. ही सर्व माहिती एका अॅपमध्ये संग्रहित करण्यात आली. (Dharavi, Digital Twin)
85,000 युनिट्सची कागदपत्रे पडताळणी पूर्ण
सर्वेक्षकांनी रहिवाशांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपीज गोळा केल्या असून त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 95,000 युनिट्सचे प्रत्यक्ष आणि डिजिटल सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यापैकी 85,000 युनिट्सची कागदपत्रे पडताळून झाली आहेत. मात्र कुंभारवाडा, शंकर कवाडे चाळ, गोपाळ विलास पालवाडी, एनडीजी कंपाऊंड्स, लहुजी भिमजी चाळ आणि नवाब नगर या भागांतील सर्वेक्षण अद्याप पूर्ण व्हायचे आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.