कुलाब्यात सिंगापूरच्या धर्तीवर हॉकर्स झोन; पर्यटन आणि महसूलवाढीच्या दृष्टीने मकरंद नार्वेकर यांचे आयुक्तांना पत्र
16-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Municipal Corporation) कुलाबा कॉजवे परिसरात सिंगापूरच्या धर्तीवर नियोजनबद्ध हॉकर्स झोन उभारण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्याची मागणी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.पर्यटन आणि महसूलवाढीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असे नार्वेकर यांचे म्हणणे आहे
कुलाबा कॉजवे परिसरातील फेरीवाला व्यवसाय अधिक शिस्तबद्ध आणि आधुनिक करण्यासाठी पात्र फेरीवाल्यांसाठी एकसमान स्वरूपाचे स्टॉल उभारण्याचा प्रस्ताव नार्वेकर यांनी मांडला आहे. या स्टॉलची मालकी महापालिकेकडे राहावी आणि ते नोंदणीकृत फेरीवाल्यांना भाड्याने द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली आहे. सिंगापूरमधील यशस्वी हॉकर्स सेंटरच्या धर्तीवर हा उपक्रम राबविल्यास फेरीवाला व्यवसायाला संघटित स्वरूप मिळेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण सुरू असताना शहरातील फेरीवाला व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याची ही योग्य वेळ असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या २०१४ मधील सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे ९९ हजार ४३५ फेरीवाले आहेत. त्यांना निश्चित जागांवर व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिल्यास बेकायदा अतिक्रमणांनाही आळा बसेल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच स्टॉल भाड्यातून मिळणारा महसूल स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि देखभाल यांसारख्या नागरी सुविधांवर खर्च करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुलाबा कॉजवे परिसरात पादचारी हालचाली अधिक सुलभ करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. एकसमान आणि आकर्षक खाद्यपदार्थ स्टॉल उभारल्यास कुलाबा परिसर सिंगापूरच्या प्रसिद्ध ‘साते स्ट्रीट’प्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो. त्यामुळे दक्षिण मुंबईतील पर्यटनाला चालना मिळण्यासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.(Mumbai Municipal Corporation)