चंद्रपूर : (Pratibha Dhanorkar) चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पक्षाने महापौरपद मिळवण्याची आयती संधी गमावल्यानंतरही हा वाद शमण्याचे नाव घेत नाही. खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून धानोरकर गटातर्फे पक्षाचा पालिकेतील गटनेता बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतील एकूण ६६ जागांपैकी काँग्रेसचे सर्वाधिक २७ नगरसेवक आणि काँग्रेस समर्थित जनविकास आघाडीचे ३ असे एकूण ३० नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसला महापालिकेत सत्ता स्थापन करणे सहज शक्य होते. परंतू, खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्या हातातून सत्ता गेली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर नगरसेवक पळवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरीष्ठांच्या मध्यस्तीने हा वाद निवळला. मात्र, या गृहकलहामुळे संख्याबळ असूनही चंद्रपूरात भाजपच्या महापौर विराजमान झाल्या.
या सगळ्यानंतर आता पुन्हा एकदा ववडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या वादाने डोके वर काढले आहे. चंद्रपूरमध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची वडेट्टीवार आणि धानोरकर अशा दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. यातील धानोरकर गटाचे १६ नगरसेवक वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांच्याविरोधात एकवटले असून गटनेता बदलण्याची मागणी घेऊन मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. यावर आता काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, चंद्रपूर काँग्रेसमधील या अंतर्गत कलहामुळे आगामी काळात पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Pratibha Dhanorkar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....