परिस्थितीपुढे हतबल होऊन शरणागती न पत्करता, परिस्थितीवर मात करून समाजकल्याणासाठी कार्य करणाऱ्या नवी मुंबईच्या ऊर्मिला तबीब. त्यांच्या कार्यविचारांचा मागोवा घेणारा हा लेख...
मुंबईत राहणारे ऊर्मिला अणि श्रीकांत तबीब हे अत्यंत समाजशील दाम्पत्य. सामाजिक बांधिलकीतून आणि अत्यंत ध्येयनिष्ठ विचारांमुळेच ते ‘विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी’शी जोडले गेले. केंद्राच्या माध्यमातूनच हे दोघे तामिळनाडूच्या एका छोट्या खेड्यातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी, व्यवस्थापनासाठी आले होते. वसतिगृहातील मुले खरोखरच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांतली मुले. या विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या मायेने संगोपन करण्यासाठी, त्यांना शिस्त लावण्यासाठी आणि नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी ऊर्मिला यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. एके दिवशी वसतिगृहातील एक मुलगा खराखरा केस खाजवत होता. प्रत्येक केसात भाराभर उवा-लिखा. यामुळे तो मुलगा सैरभैर आणि अगदी घायकुतीला आला होता. स्वयंपाकीणबाई म्हणाल्या, “अहो ताई, इथे सगळ्याच म्हणजे, 350 मुलांच्या डोक्यात उवा पडल्यात. काय करणार?” ऊर्मिला यांनी तीन नाभिकांना बोलावले. सकाळ ते संध्याकाळ असे अनेक दिवस बसून त्यांनी सगळ्या मुलांचे चकोट केले. ऊर्मिला यांनी नाभिकांना त्यांच्या श्रमाचे पैसे देऊ केले; तर त्यांनी ऊर्मिला यांच्या पायावर डोके ठेवले. ते म्हणाले, “अम्मा, तुम्ही मुंबईहून आमच्या तामिळनाडूमध्ये आमच्या दक्षिणेच्या मुलांच्या भल्यासाठी, देवाचं काम करता. आम्हाला पैसे नको.” मात्र, ऊर्मिला यांनी त्यांची समजूत घातली की, “पूर्ण पैसे नका घेऊ. पण, श्रमाचे थोडेतरी मूल्य घ्या.”
तर, तामिळनाडूमध्ये त्या शेकडो मुलांच्या भवितव्यासाठी अहोरात्र सेवाकार्य करताना ऊर्मिला यांच्यामधील सेवाभाव आणि करडी शिस्त कायम दक्ष असे. अनेक वर्षे तिथे कार्य केल्यानंतर त्यांच्या पतीच्या तब्येतीसाठी त्यांना पुन्हा मुंबईला परतावे लागले. पण, मुंबईला आल्यावरही त्यांनी ‘विवेकानंद केंद्रा’च्या माध्यमातून सेवाजागृती कार्य सुरू ठेवले. निराश, हताश युवकांचे समुपदेशन, मूल्यशिक्षण विषयावरचे परिसंवाद घेणे, अनेक गरजू मुलांना भवितव्य आणि शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे, परिसरातील गोरगरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन-साहाय्य करणे, शाळा निवडून त्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये धर्म-देशासंदर्भात सकारात्मक विचार रुजवणे, यासाठी त्या काम करत आहेत. अत्यंत सन्माननीय आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात त्यांना मान आहे. ‘शाळेतील शिक्षिका ते समर्पित सेवाभावी कार्यकर्ता’ या टप्प्यातला त्यांचा हा प्रवास उल्लेखनीय आहे.
ऊर्मिला या माहेरच्या उमा अवधूत पांडव. अवधूत आणि शकुंतला पांडव हे हैदराबादचे अत्यंत कर्मठ मराठी भाषक ब्राह्मण. त्यांना दोन अपत्ये. त्यांपैकी एक उमा म्हणजेच, ऊर्मिला. त्यांचे बालपण अत्यंत करड्या शिस्तीत गेले. घरात अस्पृश्यतेची विखारी पद्धत नसली, तरी सोवळेओवळे अगदी कडक. घरातील वातावरण इतके कडक की, ऊर्मिला आणि त्यांच्या बाबांचा समोरासमोर कधी संवाद झालाच नाही. यामध्ये एक गोष्ट दिलासादायक होती, त्यांच्या आईचे वडील हे त्यांना मराठी भाषेतली दर्जेदार पुस्तके वाचायला द्यायचे. त्यामुळे ऊर्मिला यांना पुस्तकांचे एक नवे जग दृष्टिपथात आले.
त्यांना वकील व्हायचे होते. पण, बारावी झाल्यानंतर बाबांनी त्यांच्यासाठी वरसंशोधन सुरू केले. पण, ऊर्मिला यांनी आईच्या बाबांना सांगितले की, “वकिलीचे शिक्षण घेत नाही. पण, मला पदवीपर्यंतचे तर शिक्षण पूर्ण करू द्या. बाबांना सांगा.” शेवटी, आजोबांनी अवधूत यांना समजावले. त्यामुळे ऊर्मिला यांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली. पण, पदवी परीक्षा संपताच त्यांचा विवाह श्रीकांत तबीब यांच्यासोबत झाला. तबीब कुटुंबात अत्यंत मोकळे, पुरोगामी वातावरण होते. पुढे ऊर्मिला यांना दोन अपत्ये झाली. काही वर्षांनी त्यांचे पती बाहेरगावी नोकरीसाठी गेले. याकाळात ऊर्मिला यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सगळे ठीक होते. पण, युद्ध सुरू झाले आणि सगळी कमाई सोडून श्रीकांत यांना भारतात परतावे लागले. त्यामुळे इथे घरची आर्थिक स्थिती खालावली.
ऊर्मिला यांचे माहेर आणि सासर अत्यंत संपन्न होते. अचानक आलेल्या या आर्थिक विवंचनेला कसे सामोरे जायचे? ऊर्मिला शिक्षका म्हणून शाळेत नोकरी करू लागल्या. सकाळी 7 ते 1 शाळा आणि दुपारी 2 ते 7 खासगी शिकवणी, असे करून त्यांनी घराची आर्थिक घडी बसवली. सात ते आठ वर्षे अत्यंत धकाधकीत गेली. पण, पुढे श्रीकांत यांचे पैसे मिळाले. आर्थिक परिस्थिती पुन्हा ताळ्यावर आली. याच काळात ‘विवेकानंद केंद्रा’चे विनायक गोखले आणि प्रवीण दाभोळकर यांच्याशी ऊर्मिला यांचा संपर्क झाला. त्यांच्या माध्यमातून ऊर्मिला पतीसोबत ‘विवेकानंद केंद्रा’च्या माध्यमातून तामिळनाडूच्या वसतिगृहात सेवाकार्यासाठी गेल्या. आज त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वामी विवेकानंदांच्या विचारांसाठी आणि समाजकल्याणासाठी समर्पित केले आहे. त्या म्हणतात, “स्वामी विवेकानंदांचे विचार देशाला मार्ग देणारे आहेत. त्यांच्या विचारांनुसार समाजामध्ये ध्येयशीलता निर्माण व्हावी, यासाठी सर्वतोपरी कार्य करणार आहे.” स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा समाजात रुजावी म्हणून कार्य करणाऱ्या ऊर्मिला तबीब यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
9594969638