
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून उबाठा
गटाच्या एकूण ९ लोकसभा खासदारांपैकी ६ जणांनी बंडाचे शस्त्र उपसले आहे. हे ६
खासदार दिल्लीला रवाना झाले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्याने या चर्चांना दुजोरा मिळाला
आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, "अपना सपना मनी… मनी!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटी
रुपयांचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!"
राऊत यांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः तातडीने
दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उबाठाचे ६
खासदारसुद्धा दिल्लीत सुरक्षित स्थळी पोहोचले असून लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन
करण्याच्या हालचाली सुरू आहेत. फुटलेले ६ खासदार बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष
ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गटाचे पत्र देण्याची शक्यता व्यक्त करण्यात
येत आहे.
ते ६ खासदार कोणते?
उबाठा गटाच्या या सहा खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील
आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश
आहे. तर, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार सध्या
उबाठा गटासोबत राहिल्याचे चित्र आहे.