युवाशक्तीच्या खांद्यावर ‘हरित जबाबदारी’

    15-Jun-2026
Total Views |

Mumbai Youth Climate Leadership
 
मुंबईसारख्या महानगरात वाढते तापमान, हरित क्षेत्रांचा र्‍हास आणि हवामानबदलाची तीव्र होत चाललेली आव्हाने यांचा सामना करण्यासाठी तरुण पिढी पुढे सरसावली आहे. ‘लायमेट अ‍ॅम्बेसडर्स ऑफ मुंबई’ या उपक्रमाच्या माध्यमातून १५० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पर्यावरण शिक्षण, जैवविविधता संवर्धन, नागरिक जनजागृती आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश देत एक प्रेरणादायी चळवळ उभी केली आहे. निसर्गभ्रमंती, सर्वेक्षण, पथनाट्ये, संवादसत्रे आणि विविध पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून या युवा दूतांनी हवामानबदलाच्या संकटावर उपाययोजनांची गरज अधोरेखित करत पर्यावरण संरक्षणाची नवी आशा निर्माण केली आहे.
 
वाढते तापमान आणि बदलत्या हवामानाच्या संकट काळात मुंबईतील तरुण पिढी आता केवळ चिंतेत न राहता, प्रत्यक्ष कृतीसाठी मैदानात उतरली आहे. ‘लायमेट अ‍ॅम्बेसडर्स ऑफ मुंबई’ (Climate Ambassadors of Mumbai) या उपक्रमांतर्गत फेब्रुवारी महिन्यापासून मुंबई आणि परिसरातील प्रमुख महाविद्यालयांमधील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचा एक अनोखा वस्तुपाठ सादर केला आहे.
या मोहिमेत महर्षि दयानंद महाविद्यालय, के. जे. सोमय्या महाविद्यालय, भास्कर वामन ठाकूर महाविद्यालय, एस. आय. इ. एस. महाविद्यालय, सेंट झेवियर्स महाविद्यालय, चंगू काना ठाकूर महाविद्यालय पनवेल, बी. एन. बांदोडकर महाविद्यालय, बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नामांकित संस्थांच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
 
या उपक्रमांतर्गत ‘ऑईको ईसेन्स’च्या निसर्गतज्ज्ञ डॉ. श्रेया भानप आणि गौरी गुरव यांनी विद्यार्थ्यांना वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील (राणीची बाग) दुर्मीळ वनस्पतींची आणि मुंबईतील समृद्ध जैवविविधतेची ओळख करून दिली. या प्रशिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी बागेत येणार्‍या पर्यटकांना मोफत ‘निसर्ग भ्रमण’ (Nature Trail) घडवून आणत त्यांची वाहवा मिळवली.
 
तसेच, जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम यांनी विद्यार्थ्यांना प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापन आणि प्राण्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी राबवल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. प्राण्यांचे जेवण कसे तयार होते, याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांनी अनुभवले. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गटांनी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे निरीक्षण केले. प्राण्यांचा पिंजर्‍यातील कंटाळा दूर करण्यासाठी अन्न लपवून ठेवणे, खेळणी तयार करणे किंवा गंधाच्या माध्यमातून त्यांचे उद्दीपन करणे यांसारखे नावीन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासले आणि त्यांचे सादरीकरण केले.
 
हवामानबदलासारखा गंभीर विषय सामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी ‘वन्यवाणी फाऊंडेशन’चे मकरंद सावंत यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक लोककला व नाट्यसादरीकरणाचे विशेष प्रशिक्षण दिले, तर काजल नाईक यांनी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संवादकौशल्ये आणि समानुभूती (Empathy) या विषयांवर मार्गदर्शन केले. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पर्यावरणपूरक जीवन कसे जगावे आणि हवामानबदलाचा आरोग्यावरील परिणाम रोखण्यासाठी आपला आहार कसा असावा, यावर ‘सृष्टीज्ञान’ संस्थेच्या संगीता खरात यांनी महत्त्वपूर्ण सत्र घेतले. यामध्ये पोषक आणि हवामानानुकूल अशा मिलेट्सच्या पाककृती आणि विविध कोशिंबिरींचे थेट प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
 
या संपूर्ण कालावधीत दि. २३ मार्च (जागतिक हवामान दिन), दि. २१ एप्रिल (वसुंधरा दिन), दि. २६ एप्रिल (जागतिक बीज दिन), दि. ३ मे (जागतिक बिबट्या दिन) आणि दि. २२ मे (जागतिक जैवविविधता दिन) असे पर्यावरणपूरक दिनविशेष उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी राणीच्या बागेत येणार्‍या एक हजाराहून अधिक नागरिकांशी ‘शहरी जैवविविधता’ या विषयावर थेट संवाद साधून एक विस्तृत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून मुंबईकरांनी एकच सूर आळवला की, शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलात आणि वाढत्या तापमानापासून दिलासा मिळवण्यासाठी शहरात जास्तीत जास्त हरित क्षेत्रांची अत्यंत गरज आहे.
 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ‘लायमेट अ‍ॅम्बेसॅडर्स’नी पर्यावरणविषयक विविध सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय येथे पर्यावरण संवर्धन आणि हवामानबदलाच्या आव्हानांवर प्रकाश टाकणार्‍या एका विशेष कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयीन युवक, पर्यावरणतज्ज्ञ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली.
 
कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वीरक्षक धर्मेश बराई, महर्षि दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रिया पारकर, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उपसंचलिका डॉ. कोमल राऊळ, ‘सृष्टीज्ञान’ संस्थेचे कार्यकारी संचालक प्रशांत शिंदे यांनी वृक्षारोपण करून उद्घाटन केले. त्यानंतर युवकांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून पर्यावरणरक्षणाचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडला. प्रथम हवामानबदलाचा परिणाम म्हणून येणारी पाणीटंचाई आणि त्याअनुषंगाने जलसंधारणाचे महत्त्व सांगणारे आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारा वन्यजीवांच्या अधिवासांचा र्‍हास यावर ‘जंगल की पुकार’ देणारी ही पथनाट्ये युवकांनी जोशात सादर केली.
 
यानंतर पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर धर्मेश बराई आणि पर्यावरण शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रिया पारकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने युवकांनी सादर केलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमांचे कौतुक केले. या प्रकल्पात विद्यार्थ्यांबरोबर राबवलेल्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. ‘सृष्टीज्ञान’ संस्थेच्या अथक प्रयत्नांमुळेच आज मुंबईचे हे तरुण ‘लायमेट अ‍ॅम्बेसडर्स’ पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत, यात शंका नाही.
 
संगीता खरात
(लेखिका ‘सृष्टीज्ञान’ संस्थेच्या सहसंचालिका आहेत.)
९९३०४०१३२९