विदर्भात महायुतीच्या विजयाची वाट सुकर

    15-Jun-2026   
Total Views |
Maharashtra Legislative Council Election
 
मुंबई : (Maharashtra Legislative Council Election) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, संघटनात्मक ताकद आणि तळागाळातील राजकीय प्रभाव या सगळ्याची खरी परीक्षा या निवडणुकीत होत असते. यानिमित्ताने विदर्भातील एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास महायुतीचे पारडे स्पष्टपणे जड असल्याचे दिसून येत आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगराध्यक्ष हे मतदार असतात. त्यामुळे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांपेक्षा स्थानिक पातळीवरील पक्षीय ताकद निर्णायक ठरते. विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये भाजपने गेल्या दशकात मजबूत संघटनात्मक जाळे उभे केले आहे. त्याचा थेट फायदा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे.
 
विधानपरिषदेच्या १७ पैकी ५ जागा विदर्भातील आहेत. यात अमरावती, भंडारा-गोंदिया, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि नागपूर (पोटनिवडणूक) या जागांचा समावेश आहे. यातील यवतमाळ आणि वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर या दोन ठिकाणी महायुतीचे उमदेवार बिनविरोध निवडून आले आहेत. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले आहेत. तर, यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनीही निवडणूकीतून माघार घेतल्याने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे दुसऱ्यांदा विजयी झालेत.
 
अमरावतीत नाट्यमय घडामोडी
 
अमरावती विधानपरिषदेत काँग्रेसमध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्याच पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. शिवाय अमरावतीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना पाठींबा देणार असल्याचेही बोलले गेले. मात्र, आता हर्षदीप देशमुख हे डिजिटल प्रचार करणार असल्याचे समजते. त्यामुळे या डिजिटल प्रचारातून मतदार त्यांना किती प्रतिसाद देते हे पाहणे औत्सुक्याचे असेल. दुसरीकडे, त्यांच्या विरोधात भाजपचे प्रवीण पोटे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. ते याआधीही विधानपरिषदेवर निवडून गेलेत. शिवाय त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे निश्चितच अमरावती विधानपरिषदेत प्रवीण पोटे यांचे पारडे जड दिसते.
 
पटोलेंच्या किल्ल्यात महायुतीचे पारडे जड
 
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपतर्फे अविनाश ब्राह्मणकर निवडणूकीच्या मैदानात असून मविआच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. तर, काँग्रेसच्या पाठिंब्याने नरेश ईश्वरकर हे निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात काँग्रेस नेते नाना पटोलेंव्यतिरिक्त दुसरे कुठलेही मोठे नाव दिसत नाही. याऊलट भाजपचे परिणय फुके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांचे वर्चस्व आजही कायम आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होणार असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Legislative Council Election)
 
नागपूरात भाजपचाच करीश्मा
 
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर रिक्त झालेल्या नागपूर विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीत भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अतुल लोंढे निवडणूक लढवणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजीव पोतदार जिल्ह्यात सक्रीय आहेत. याशिवाय, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांच्या करिश्म्यामुळे पोतदार यांचा विजय निश्चित मानला जातो.
 
विदर्भातील राजकारणात महायुतीचाचा प्रभाव हा केवळ विधानसभा जागांपुरता मर्यादित राहिलेला नाही. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका पातळीवरही महायुतीच्या घटक पक्षांचे सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. दुसरीकडे, विदर्भात काँग्रेसचा प्रभाव काही जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला असून उबाठा गट आणि शरद पवार गटाची ताकद तुलनेने कमकुवत स्थितीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, संघटनात्मक ताकद आणि विरोधकांतील मर्यादित प्रभाव या सर्व घटकांचा विचार करता विदर्भात महायुतीचीच सरशी होण्याची शक्यता अधिक आहे. (Maharashtra Legislative Council Election)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....