‘मातोश्री’वरील उबाठाच्या बैठकीला काही खासदार ‘नॉट रिचेबल’
४ खासदार प्रत्यक्ष, तर ५ खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा
15-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंनी रविवार, दि. १४ जून रोजी आपल्या पक्षाच्या खासदारांसाठीच्या बोलावलेल्या ‘मातोश्री’वरील बैठकीपूर्वी काही खासदार ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समोर आले. या बैठकीस उबाठाचे खा. संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे हे काही काळ ‘नॉट रिचेबल’ व बैठकीस अनुपस्थित होते. पण बैठकीस नसलेल्या खा. संजय जाधव यांनी परभणीच्या धोंडे कार्यक्रमास मात्र उपस्थिती लावली होती. मागील एका बैठकीसदेखील जाधव अनुपस्थित होते.
ओमराजे निंबाळकर हे आपल्या मुलाच्या तब्येतीच्या कारणाने अनुपस्थित होते, तर नागेश पाटील अष्टीकर व संजय देशमुख यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे व संजय दिना पाटील हे चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते.उबाठाचे एकूण नऊ खासदार आहेत.
नऊपैकी किती खासदार उपस्थित राहतात, याची जोरदार चर्चा होती. पण नऊपैकी पाच खासदार ऑनलाईन आणि चार खासदार प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित होते, असा दावा उबाठाने केला आहे. सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे, त्यानुसार उबाठाचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार, अशी चर्चा असताना, आजच्या बैठकीस महत्त्व प्राप्त झाले होते. (Uddhav Thackeray)
बैठकीस वेळाने पोहोचलेले खा. संजय दिना पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना नाराजी असल्याचे स्पष्ट केले आहे. संजय दिना पाटील म्हणाले की, "काम करताना तक्रार तर असतेच, अगदी घरी नवरा-बायकोमध्येपण तक्रारी असतात. जे व्हायचं आहे, ते होईलच. कोण समाधानी आहे की नाही, याबाबत मी कसं सांगणार? ज्याला तक्रार असेल, तो सार्वजनिकरीत्या थोडीच सांगणार? बैठकीला अनुपस्थित असलेले खासदार दोन ते तीन दिवसांत ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरेंची भेटच घेणार आहेत,” असेही सांगण्यात येत आहे. "पुढील महिन्यात पुन्हा खासदारांची बैठक घेतली जाणार आहे,” असेही सांगण्यात आले आहे.
या बैठकीवर प्रतिक्रीया देताना शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "कधी कार्यकर्त्यांसोबत न बोलणे आणि कधी त्यांच्या कामाला न येणे, हे उद्धव ठाकरेंचे वैशिष्ट्य आहे.” (Uddhav Thackeray)