अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रारंभीच्या काळात आपल्या कार्यतत्परतेने आणि संघटन कौशल्याने महत्त्वपूर्ण योगदान देणारे कै. शशिकांत गाडगीळ यांच्या संघसमर्पित जीवनप्रवासाचा मांडलेला लेखाजोखा...
दादरच्या शिवाजी उद्यान शाखेचे स्वयंसेवक म्हणून शशिकांत गाडगीळ यांची सुरुवात झाली. बालपणापासूनच संघाच्या संस्कारांमध्ये वाढलेल्या गाडगीळ यांच्यामध्ये राष्ट्रकार्याची तळमळ आणि संघटन उभारणीची क्षमता लहानपणापासून दिसून येत होती. पुढे त्यांनी मुंबईतील पोदार कॉमर्स महाविद्यालयात शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनात असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याशी जोडले गेले.
त्या काळात विद्यार्थी परिषदेचे कार्य विस्ताराच्या टप्प्यात होते. विविध उपक्रम, कार्यक्रम आणि संघटनात्मक कामे यशस्वी करण्यासाठी शशिकांत गाडगीळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या आत्मीय संबंधांमुळे अनेक उपक्रम यशस्वी झाले. सन १९५४ ते १९६० या कालावधीत गाडगीळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थी परिषदेचे कार्य केवळ मुंबईपुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये विस्तारले. त्याचबरोबर गुजरात आणि कर्नाटकातील काही महाविद्यालयांमध्येही परिषदेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
त्या काळात साधनसुविधा अत्यंत मर्यादित होत्या. प्रवास, संपर्क आणि संवादाची आधुनिक साधने उपलब्ध नसतानाही त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी आणि संघटन उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थी परिषदेच्या सुरुवातीच्या विस्तारात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. एम.कॉम. पदवी प्राप्त केल्यानंतर ज्ञानार्जनाची ओढ त्यांना परदेशात घेऊन गेली. सन १९६० मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी एम.बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि शैक्षणिक गुणवत्तेमुळे त्यांना न्यूयॉर्क येथील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली.
परदेशात स्थायिक झाल्यानंतरही त्यांच्या मनातील संघसंस्कार आणि भारताविषयीची आत्मीयता कायम राहिली. जरी आरोग्य, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे त्यांना पूर्वीप्रमाणे संघकार्य करता येत नव्हते, तरीही संघ परिवाराशी त्यांचा संपर्क अखंड राहिला. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांच्याकडे होत असत.
aविशेषतः त्यांचे जुने मित्र पद्मनाभ आचार्य, अरुण साठे, दिलीप परांजपे आणि इतर सहकारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आयुष्यभर टिकून राहिले. निवृत्तीनंतरही त्यांनी ज्ञानदानाची परंपरा कायम ठेवली. घरीच विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेऊन त्यांनी शिक्षणसेवा सुरू ठेवली. त्यांच्या पत्नी विद्या गाडगीळ या देखील उच्चशिक्षित असून दोघांनीही शिक्षण आणि संस्कार यांना जीवनाचे ध्येय मानले. शिक्षण हे केवळ व्यवसाय नसून समाजनिर्मितीचे साधन आहे, या विचाराने त्यांनी आयुष्य व्यतीत केले.
शशिकांत गाडगीळ यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे आणि मनमिळाऊ होते. नेहमी पायजमा आणि पांढरा शर्ट, तर विशेष प्रसंगी झब्बा, त्यावर जाकीट आणि कधीकधी फिकट पिवळ्या रंगाची टोपी असा त्यांचा वेश असे. त्यांच्या राहणीमानात कोणताही दिखाऊपणा नव्हता. लहानपणी झालेल्या पोलिओमुळे एका पायावर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना कायम विशेष बूट वापरावे लागत. मात्र या शारीरिक अडचणीला त्यांनी कधीही आपल्या कार्याच्या आड येऊ दिले नाही.
उलट जिद्द, सकारात्मकता आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी शिक्षण, संघटन आणि व्यावसायिक जीवनात उल्लेखनीय यश मिळवले.
कै. शशिकांत काशिनाथ गाडगीळ हे केवळ विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते किंवा प्राध्यापक नव्हते, तर ते एका पिढीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. संघटन उभारणी, राष्ट्रभक्ती, शिक्षणाविषयीची निष्ठा, मित्रांविषयीची आत्मीयता आणि साधेपणाने जगण्याची वृत्ती या गुणांमुळे ते अनेकांच्या मनात कायमचे घर करून गेले. आज त्यांच्या जुन्या मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या स्मृतींमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व जिवंत आहे. विद्यार्थी परिषदेच्या प्रारंभीच्या कार्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्या वाटचालीतील एक निष्ठावान, समर्पित आणि दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता म्हणून कै. शशिकांत गाडगीळ यांचे नाव आदराने स्मरणात राहील.