शिकण्याची जिद्द मनामध्ये बाळगत, समोर येणार्या प्रत्येक आव्हानाला धाडसाने सामोरे जात यशशिखरे पादाक्रांत करणार्या समृद्धी पाथरे हिच्याविषयी...
शिक्षणासाठी शहरात पाऊल ठेवल्यापासूनच, समृद्धी पाथरे हिच्या संघर्षाला सुरूवात झाली. प्रचंड इच्छा असूनही ‘मानसशास्त्र’ विषयात प्रवेश मिळाला नाही; तरीही तिने हार मानली नाही. तिने भूगोल विषयालाच आपला सखा मानून, त्याचा अभ्यास सुरू केला. तिने पदवी परीक्षेत भव्य यश संपादन केले आहे. तिची ही यशोगाथा ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला ऊर्जा देणारी आहे.
समृद्धीचा जन्म दि. ३ ऑक्टोबर २००५ रोजी नाते येथे झाला. समृद्धीचे मूळ गाव रायगडमधील महाडजवळचे नाते. तिचे सगळे बालपण गावातच गेले. समृद्धीचे वडील संदीप, आई समीक्षा आणि दोन मोठे भाऊ असे त्यांचे पाच जणांचे कुटुंब. समृद्धीचे वडील आता सेवानिवृत्त झाले असून, आई गृहिणी आहे. नाते गावातील अंगणवाडीमधूनच समृद्धीच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण तिने गावातील जिल्हा परिषद शाळेतच घेतले. शिक्षणाची गोडी लागण्याचे संस्कार, याच शाळेमध्ये तिच्यावर झाले. पुढे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण समृद्धीने, श्री सद्गुरू अनंत महाराज विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून घेतले. पुढे उच्च शिक्षणासाठी डोंबिवली येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातही समृद्धीने प्रवेश घेतला.
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या समृद्धीला, महाविद्यालयीन प्रवेशापासूनच संघर्ष करावा लागला. समृद्धीला ‘मानसशास्त्र’ या विषयात पदवीचे शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, तिला या विषयासाठी प्रवेश न मिळाल्याने, अखेर तिने ‘भूगोल’ या विषयात पदवी घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आवड आणि वस्तव यात सांगड घालणे, समृद्धीसाठी आव्हानात्मकच ठरले. मात्र, मुळातच शिक्षणाची आवड असलेल्या समृद्धीला ‘भूगोल’ हा विषयही आवडू लागला. पुढे या विषयाचा मन लावून अभ्यास करत, समृद्धीने पदवी परीक्षेत तब्बल ९४ टक्के गुण मिळविले. या यशामुळे समृद्धीला पेंढरकर महाविद्यालयातून पदवी परीक्षेत कला शाखेतून प्रथम येण्याचा मानही मिळला. समृद्धीचे हे यश नेत्रदिपक असेच! मात्र, असे नेत्रदिपक यश मिळवण्याची परंपराच समृद्धीने राखली आहे. समृद्धीचने याआधीही दहावीच्या परीक्षेत ९७.८ टक्के, तर बारावीच्या परिक्षेत ९०.६ टक्के गुण संपादन केले आहेत.
समृद्धीला लहानपणापासूनच विविध शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची विशेष आवड होती. विशेषतः वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादींमध्ये समृद्धी नेहमीच उत्साहाने सहभागी होत असे. एवढेच नव्हे, तर तिने या स्पर्धेत उत्तम यशही संपादन केले आहे. वक्तृत्व ही तिची नुसतीच आवड नसून तो तिचा छंददेखील आहे. इयत्ता पहिलीपासूनच तिने वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. समृद्धीने आजवर अनेक स्पर्धांमध्ये भव्य यश मिळविले आहे.
नवीन गोष्टी शिकत, स्वतःला विकसित करण्याकडेच समृद्धीचा नेहमी कल असतो. तिच्यासाठी प्रत्येक अनुभव म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची एक संधीच असते. समृद्धीने बारावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून घेतले. भाषेची अडचण, मर्यादित शैक्षणिक साधने, गावामधील अपुर्या सुविधा, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अशा एक ना अनेक अडचणींचा सामना समृद्धीला बालपणापासूनच करावा लागला. तरीही आपल्यातील शिकण्याची जिद्द आणि कुटुंबाचा पाठिंबा, यामुळेच समृद्धी सातत्याने यशाकडे मार्गक्रमण करत राहिली.
जेव्हा उच्च शिक्षणासाठी समृद्धीने डोंबिवलीची वाट धरली, त्यावेळी नवीन ठिकाणी स्थलांतर करून शिक्षण घेणे तिच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. आपण आलेल्या नवीन माहिती नसणे, ग्रामीण भागातून शहरामध्ये आल्यावर नवीन वातावरणाशी जुळवून घेणे, प्रवास, राहण्याची व्यवस्था, स्वतःची जबाबदारी, शिवाय शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे अशी अनेक मोठी आव्हाने त्यावेळी तिच्यसमोर उभी ठाकली होती. त्यातच कुटुंब गावात असल्यामुळे, तिला काही काळ अधिकच्या जबाबदार्या सांभाळूनच अभ्यास करावा लागत असे. मात्र, कठीण परिस्थिती असूनही ती सर्व गोष्टींना आत्मविश्वासाने सामोरे गेली. शिवाय, शिक्षणातही तिने उत्तुंग यश संपादन केले. समृद्धीने पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षामध्ये, ९४ टक्के गुणांसह ९.८५ ‘सीजीपीए’ मिळवून कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश समृद्धीच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे, जिद्दीचे आणि शिक्षणाप्रति असलेल्या समर्पणाचेच प्रतीक ठरते.
समृद्धी या यशाचे श्रेय तिचे आईवडील, पेंढरकर महाविद्यालयातील तिचे शिक्षक प्रा. शीतल ढोबळे, छबिलदास चौधरी आणि राज शेख यांना विनम्रतेने देते. तसेच या शैक्षणिक प्रवासात समृद्धीचे दोन्ही मोठे भाऊ संदेश आणि वृषाल यांचेदेखील तिला कायमच सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले आहे. चांगले शिक्षण घेऊन उत्तम करिअर घडविण्याच्या समृद्धीच्या प्रवासात, तिचे कुटुंबाची नेहमीच खंबीर साथ राहिल्याचे समृद्धी सांगते. एकेकाळी न आवडाणारा ‘भूगोल’ आता समृद्धीला आवडू लागला आहे. त्यामुळे तिने ‘भूगोल’ विषयातच ‘एमए’ करण्याचा निर्णयही तिने घेतला आहे. याबरोबरच स्पर्धापरीक्षांमध्येही यशाची परंपरा कायम ठेवण्याचे ध्येय समृद्धीने ठेवले आहे. त्यासाठी तिने अभ्यासही सुरू केला असून, याअमध्ये यशस्वी होण्याचा तिला विश्वास आहे. अशा या मेहनती आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या समृद्धी हिला, तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.