रामभाऊ भोगले मार्गावर कट्टे, दुहेरी-तिहेरी पार्किंगमुळे बेस्टच्या ६४ क्रमांकाच्या बसला अडथळा; वाहतूक कोंडी तीव्र

    15-Jun-2026
Total Views |
Mumbai Traffic
 
मुंबई : (Mumbai Traffic) फेरबंदर येथील रामभाऊ भोगले मार्गावर वर्धमान हॅबिटॅट इमारतीसमोर उभारण्यात आलेले कट्टे, त्यापुढे होणारे दुहेरी व तिहेरी पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बेस्टच्या ६४ क्रमांकाच्या बससेवेला बसत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
 
स्थानिकांच्या माहितीनुसार, ई विभाग कार्यालयासमोरील वर्धमान हॅबिटॅट इमारतीसमोर सुमारे चार ते साडेचार फूट रुंदीचे आणि आठ ते दहा इंच उंचीचे कट्टे बांधण्यात आले आहेत. या कट्ट्यांच्या पुढे नियमितपणे दुहेरी आणि तिहेरी पार्किंग होत असल्याने रामभाऊ भोगले मार्गावरील रस्त्याची उपलब्ध जागा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होऊन सतत वाहतूक कोंडी होत आहे.
 
विशेष म्हणजे याच ठिकाणी ई विभाग कार्यालयाशेजारी हा बेस्टच्या ६४ क्रमांकाच्या बसचा थांबा आहे. रस्त्यावर उपलब्ध जागा कमी झाल्याने बसला थांब्यावर व्यवस्थित उभे राहणे कठीण होत आहे. अनेकदा बसला वाहतुकीत अडकून थांबावे लागत असून प्रवाशांच्या चढ-उतारासाठीही अडचणी निर्माण आहे.
 
रामभाऊ भोगले मार्गावरील या समस्येत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे आणखी भर पडत आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेले फेरीवाले, दुहेरी-तिहेरी पार्किंग आणि कट्टे यामुळे रस्त्याची क्षमता कमी झाली असून सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी तीव्र स्वरूप धारण करत आहे.
 
हेही वाचा : मातोश्रीवरील उबाठाच्या बैठकीस काही खासदार नॉट रिचेबल,तर काही ऑनलाईन,काही ऑफलाईन
स्थानिक नागरिकांच्या मते, या परिसरात उघडपणे दुहेरी आणि तिहेरी पार्किंग होत असतानाही वाहतूक पोलिसांकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन सुरू असतानाही प्रभावी कारवाई होत नसणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व अचूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
या संदर्भात ई विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद कंकाळ यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित विभागाशी संपर्क साधण्यास त्यांनी सांगितले. तसेच संबंधित विभागाकडून कारवाई न झाल्यास पुन्हा माहिती द्यावी, ते काम आम्ही करू असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे रस्त्यावरील हे ब्लॉक निघणार का असा सवाल नागरिकांकडून वारंवार उपस्थित होत आहे.(Mumbai Traffic)