यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर व सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांना आपला तृणमूल काँग्रेस पक्ष टिकवण्यासाठी लढण्याची वेळ आलेली आहे. एकेकाळी दिल्लीचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ममतानी आता आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा असे बोलले जात आहे. पण पक्षातील बहुतांश खासदारांनी वेगळाच पवित्र घेतला असून,पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या २० बंडखोर खासदारांचा गट त्रिपुरातील नँशनलीस्ट सीटीझन पार्टीत सहभागी होणार असल्याचे बंडखोर गटाच्या खासदार नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर रविवारी जाहीर केले.
यावेळी तृणमूल पक्षातील फुटीवर शिक्कामोर्तब झाले. सभागृहात स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर इकडे महाराष्ट्रात उबाठाने ऑपरेशन टायगरची धास्ती घेतलेली दिसून आली. कारण पक्षाने रविवारी मातोश्रीवर बोलावलेल्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीस ९ पैकी ४ खासदार प्रत्यक्ष उपस्थीत होते तर बाकी ऑनलाईन हजर होते असे उबाठाकडून सांगण्यात आले. पडद्यामागे नेमकं काय घडतयं?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सत्तेचा कायापालट झाल्यानंतर आता पक्षातील शिल्लक आमदार व खासदार पण एनडीएच्या वाटेवर आहेत. यापूर्वी निवडून आलेल्या ८० आमदारांपैकी साठ आमदारांनी वेगळा गट स्थापन करून ऋतूब्रत बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून ही मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.हे ताजे असतानाच आता "पक्षाच्या निवडून आलेल्या खासदारांपैकी दोन तृतीयांश संख्याबळ आमच्याकडे आहे. आम्ही आमचा गट नँशनलीस्ट सिटीझन पार्टीत विलीन करत आहोत देशासाठी आम्ही काम करत असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जात आहोत."असे काकोली घोष दस्तीगार यांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री व पश्चिम बंगालची निवडणूक प्रभारी असलेल्या भूपेंद्र यादव यांच्या घरी झालेल्या बंडखोर खासदारांच्या बैठकीस ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सुदीप बंदोपाध्याय देखील उपस्थित होते. बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन झाले असले तरी त्यांनी मूळ तृणमूल काँग्रेस वरील दावा देखील सोडलेला नाही. पुढील महिन्यात आम्ही त्यावर दावा करू असे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी सांगितले आहे. तर तृणमूल काँग्रेसची महत्त्वाची निर्णयाची सूत्रे अभिषेक बॅनर्जी यांच्या हाती गेल्यावरच एखाद्या कंपनी प्रमाणे पक्ष चालवला गेला असा आरोप खासदार जगदीश चंद्र बर्मा यांनी केला आहे.
इकडे महाराष्ट्र राज्यात सुद्धा योगायोगाने त्याच दिवशी मातोश्री वरील बैठकीस किती खासदार येतात याची चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सूत्रे गेल्यानंतर सुद्धा सेनेत उभी फूट यापूर्वी देखील पाहायला मिळाली होती. राज्यात १९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन असून यानिमित्ताने गेले काही दिवस ऑपरेशन टायगर ची सुरू असलेली चर्चा. आणि उबाठा चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर बोलावलेली खासदारांची तातडीची बैठक याची चर्चा राज्यभर सुरू होती. उबाठामध्ये सध्या ९ खासदार आहेत त्यापैकी ७ खासदार एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वातील शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत आयोजित केलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या स्नेहभोजनाला उबाठाच्या काही खासदारांनी उपस्थिती लावली होती.
त्यामुळे रविवारच्या बैठकीस नऊ पैकी किती खासदार उपस्थित राहतात हे महत्त्वाचे होते.पण प्रत्यक्ष बैठकीस मात्र मातोश्रीवर चार खासदार हजर होते.अनुपस्थितीत खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा आजारी असल्याने तर भाऊसाहेब वाकचौरे यांची पत्नी आजारी असल्याने तसेच नागेश अष्टीकर यांच्या मुलाच्या निवडणुकीच्या प्रचारामुळे तर संजय देशमुख हे मुलीच्या लग्नाच्या बैठकीसाठी गडबडीत असल्यामुळे आणि संजय जाधव हे पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही प्रत्यक्ष उपस्थित नसलेले खासदार ऑनलाईन उपस्थित होते असे उबाठा कडून वारंवार सांगण्यात आले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे सकाळपासून संपर्कात नसल्याने त्यांच्या नोटरीचेबलची चर्चा देखील रंगली होती.