महाराष्ट्राने राजकीयदृष्ट्या संपवलेल्यांनी वाघाची भाषा करू नये – नवनाथ बन
15-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ वक्तव्यावर जोरदार टीका केली. "राऊत यांची वृत्ती गिधाडासारखी असून महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालणाऱ्या शक्तींमध्ये राऊतांचा क्रमांक वरचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आधीच नाकारले असून त्यांच्या पक्षाचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे."असा दावा बन यांनी सोमवार दि.१५ रोजी केला.
उद्धव ठाकरे यांच्या व्हर्च्युअल बैठकीवर टीका करत नवनाथ बन म्हणाले की, "अडीच वर्षे घरात बसून कारभार करणाऱ्या नेतृत्वाला आता त्यांच्या स्वतःच्या खासदारांनीही त्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. महाराष्ट्र हा माती, घाम आणि कष्टातून चालतो, व्हर्च्युअल माध्यमातून नाही. त्यामुळे भविष्यातही त्यांच्या पक्षातील नेते त्यांच्यापासून दूर जातील."(Navnath Ban)
तृणमूल काँग्रेसच्या घडामोडींवर बोलणाऱ्या संजय राऊतांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. "राऊत यांनी आधी स्वतःच्या पक्षातील खासदार आणि आमदार टिकवावेत. पश्चिम बंगालमध्ये जनतेने दहशतीच्या राजकारणाला नकार दिला असून टीएमसीमधील निर्णय त्यांचे नेते घेतील."असे बन म्हणाले.
नवनाथ बन यांनी दावा केला की, "उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार-खासदारांना भेटण्याची संधी नसल्याने पक्षातील नाराजी वाढत आहे. ज्यांना मातोश्रीचे दरवाजे बंद आहेत ते भविष्यात पक्षालाच बाहेरचा रस्ता दाखवतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी ४० आमदार गेले तेव्हाही संजय राऊतांना काही कळले नाही."
रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीका करत नवनाथ बन यांनी ते आंदोलन नसून प्रसिद्धीसाठी केलेली नौटंकी असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांची खरी चिंता असेल तर त्यांच्या कारखान्यांकडील थकबाकी आधी द्यावी, असे बन म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शेजारी राष्ट्रांशी संवादातून प्रश्न सोडवण्याची भूमिका मांडली होती. त्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देताना राऊत हे वारंवार पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. देशातील जनता राष्ट्रहिताच्या बाजूने उभी असल्याचेही बन यांनी सांगितले.(Navnath Ban)