पावसाळ्यात कचऱ्याचा अडथळा दूर करण्यासाठी तयारी ; कर्मचाऱ्यांसह ९,७०० प्लास्टिक लिफ्टर्स आणि फावडी खरेदी करणार
15-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Monsoon Preparation) पावसाळ्यात मुंबई शहराची स्वच्छता राखणे आणि कचरा व्यवस्थापन अधिक गतिमान करण्यासाठी महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत मुंबईतील विविध वॉर्डांसाठी ९ हजार ७०० जोड्या अत्याधुनिक प्लास्टिक लिफ्टर्स आणि फावडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता, वॉर्ड पातळीवरील सफाई कर्मचाऱ्यांना या आधुनिक साहित्यामुळे मोठे बळ मिळणार आहे. या कामासाठी पालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबवली आहे.
पावसाळ्यात मुंबईत कचऱ्यामुळे पाण्याचे नाले आणि गटारे तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. अशा वेळी साचलेला ओला कचरा आणि गाळ तातडीने काढणे आवश्यक असते. या नव्या निर्णयामुळे पावसाळ्याच्या दिवसांत वॉर्ड पातळीवर कचरा उपसण्याची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. दोन महिन्यांच्या मर्यादित कालावधीत हा पुरवठा केला जात असल्याने, मुसळधार पावसाच्या काळातही मुंबईतील कचरा व्यवस्थापन चोख ठेवण्यास आणि पाणी साचण्याच्या समस्या रोखण्यास याची मोठी मदत होईल.(Mumbai Monsoon Preparation)
मुंबईच्या गल्लीबोळांतील आणि रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी सध्या सफाई कर्मचाऱ्यांना जुन्या लोखंडी साधनांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. नव्या प्लास्टिक लिफ्टर्स आणि फावड्यांमुळे कर्मचाऱ्यांचा कचऱ्याशी थेट संपर्क येणार नाही. हे साहित्य वजनाने हलके आणि हाताळण्यास सोपे असल्याने कचरा उपसण्याचा वेग वाढेल आणि कर्मचाऱ्यांचे श्रमही वाचणार आहेत.
या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू झालेली ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदारांची आर्थिक पडताळणीही पूर्ण झाली आहे. पालिकेने या साहित्याच्या गुणवत्तेबाबत कडक अटी घातल्या असून, पुरवठा केल्या जाणाऱ्या लिफ्टर्स आणि फावड्यांवर 'बीएमसी(एसडब्ल्यूएम.)' असे वर्ष आणि उत्पादकाच्या नावासह कोरीव काम असणे बंधनकारक केले आहे. तसेच कंत्राटदाराने दिलेले नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासले जाणार असल्याने सार्वजनिक पैशांचा योग्य विनिमय आणि दर्जेदार साहित्याची हमी मिळणार आहे.(Mumbai Monsoon Preparation)