मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) धर्म, जात, प्रदेश किंवा भाषा यांच्या आधारे संघ कोणालाही परका मानत नाही. संघाची दृष्टी सर्वांना एकात्मतेने पाहणारी आहे. ‘हिंदुत्व’ ही भारताची जिवंत परंपरा आहे आणि त्या अर्थाने आपण सर्व हिंदू आहोत. कोणत्याही धर्मावर किंवा ईश्वराच्या कोणत्याही स्वरूपावर श्रद्धा ठेवणारे लोकही या सांस्कृतिक अर्थाने हिंदूच आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. त्रिशूर, केरळम् येथे आयोजित “संघाची १०० वर्षे” या विषयावरील विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
उपस्थितांना सोबंधित करताना ते म्हणाले, हिंदुत्व ही केवळ धार्मिक संकल्पना नसून भारताची सजीव सांस्कृतिक-सभ्यतागत परंपरा आहे. हिंदवी ख्रिस्ती आणि हिंदवी मुसलमान हेही या परंपरेचे अविभाज्य घटक आहेत. संघ अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक असा भेद करत नाही; तो सर्वांना एकाच दृष्टीने पाहतो. आपली संस्कृती राज्यकेंद्रित नसून समाजकेंद्रित आहे. जो कोणी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि सर्वांच्या कल्याणासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करतो, तो स्वयंसेवक आहे. संघात कोणतीही औपचारिक सदस्यत्व व्यवस्था नाही.
पुढे ते म्हणाले की, संघ कोणत्याही राजकीय सत्तेसाठी किंवा कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा धर्माच्या विरोधात कार्य करत नाही. गेल्या शंभर वर्षांपासून संघ केवळ भारताच्या कल्याणासाठी आणि त्याद्वारे संपूर्ण जगाच्या हितासाठी कार्यरत आहे. विविधता हा मानवी जीवनाचा स्वाभाविक भाग आहे; परंतु या विविधतेत लोकांना एकत्र बांधून ठेवणारे तत्त्व म्हणजे धर्म. हिंदू धर्म हा मानवतेच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांचा संच आहे. हीच मूल्ये भारताच्या सामर्थ्याची आणि एकतेची खरी आधारशिला आहेत.
“सत्य, करुणा, पावित्र्य आणि तपस्या ही धर्माची मूलभूत तत्त्वे आहेत. धर्माचा कोणत्याही विशिष्ट उपासना पद्धतीशी संबंध नाही. समाजात अशा मूल्यांनी युक्त व्यक्ती निर्माण झाल्या तर सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडते. प्रत्येक गावात अशा व्यक्तिमत्त्वांची निर्मिती करणे हेच संघकार्याचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.(Dr. Mohanji Bhagwat)
सरसंघचालकांनी पुढे स्पष्ट केले की, संघाचे मुख्य कार्य म्हणजे दैनंदिन शाखा चालवणे. शाखांमधून घडलेले स्वयंसेवक विविध क्षेत्रांत जाऊन सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करतात. विविध क्षेत्रांतील उपक्रम स्वतंत्र आणि पारदर्शक पद्धतीने चालवले जातात. संघ त्यांच्यावर नियंत्रण ठेवत नाही. सेवा भारती यांसारख्या संस्था देखील स्वतंत्रपणे कार्य करतात. संघाकडून वैचारिक प्रेरणा मिळते; मात्र विविध संस्थांवर अन्य कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही.
समारोप करताना त्यांनी सांगितले की, संघाला दूर राहून टीका करून समजून घेता येणार नाही. कोणालाही संघात येऊन त्याचे कार्य पाहण्याची आणि समजून घेण्याची पूर्ण मोकळीक आहे. त्यासाठी कोणताही अडथळा नाही. संघाला त्याच्या कार्यातून आणि स्वयंसेवकांच्या जीवनातून समजून घेतले पाहिजे.(Dr. Mohanji Bhagwat)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक