चिरंतनाचे प्रवासी : मारूती चितमपल्ली

    15-Jun-2026
Total Views |

Sage Of Nature Literature
 
मराठी निसर्गसाहित्यातील एक अजरामर पर्व म्हणजे ‘पद्मश्री’ मारुती चितमपल्ली. वनाधिकारी, पक्षी-अभ्यासक, अनुवादक आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांनी जंगल, पशु-पक्षी, वनस्पती आणि आदिवासी जीवन यांचे अद्वितीय विश्व शब्दबद्ध केले. त्यांच्या लेखनातून वाचकांना केवळ निसर्गाची ओळख होत नाही, तर पर्यावरणाशी नाते जोडण्याची दृष्टीही मिळते. प्रथम स्मृतिदिनानिमित्त या ‘वनोपनिषदाच्या ऋषी’च्या साहित्य, विचार आणि निसर्गसंवर्धनातील चिरंतन योगदानाचा हा कृतज्ञ स्मरणप्रवास.
 
वनस्पती कुळातील माणूस ‘पद्मश्री’ मारुती चितमपल्ली यांचा दि. १८ जून रोजी प्रथम स्मृतिदिन आहे. वनांविषयी ते म्हणतात, "अरण्य हा अलिखित ग्रंथ आहे. तो वाचता आला पाहिजे.” खरे पाहता, मारुती चितमपल्ली यांनी अरण्यवाचन अत्यंत सूक्ष्म, तरल पातळीवर केले आहे. किलबिलणार्‍या पक्ष्यांचे जग लहानांपासून मोठ्यांनाही आकर्षित करीत आहे. पक्षीनिरीक्षणाविषयी त्यांनी अन्मोल असे मार्गदर्शन केले आहे. या मार्गदर्शनाचा फायदा नवपक्षीनिरीक्षकास निश्चितच होईल. जंगलभ्रमंती करीत असताना जो स्वानुभव आला, त्याचे इत्थंभूत वर्णन त्यांच्या साहित्यात आढळते. त्यांच्या साहित्यात ललित लेखनाबरोबरच पर्यावरणीय जाणदेखील वाचकांना जाणवते. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. मात्र, त्यांनी साहित्यसंपदा मराठीतून लिहिली आहे. मराठी निसर्गसाहित्य समृद्ध केले आहे. या प्रवासात त्यांनी मराठी भाषेत एक लाखाहून जास्त शब्दांची भर घातली आहे. पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्या विस्तृत अभ्यासासाठी त्यांनी संस्कृत, आदिवासी बोलीभाषेबरोबरच भारतीय व परदेशी भाषांचाही अभ्यास केला. एकूण १८ भाषांचे त्यांना ज्ञान होते. त्यांचे आत्मचरित्र ’चकवाचांदण : एक वनोपनिषद’ त्यांचे समृद्ध जीवनविशेष सांगते. ‘चकवाचांदण’मध्ये त्यांच्या जीवनाला आदर्शवत घडवणारे अनेक शिल्पकार, गुरुवर्य, जिवाभावाचे मित्र, कुटुंबीय, नातलग, आदिवासी सहचर निसर्गाइतकेच बहुरंगी आणि बहुढंगी येतात. ‘चांगली माणसं जशी आयुष्यात यावी लागतात, तसे चांगले ग्रंथ वाचायलाही भाग्य लागतं,’ या विधानातून आपल्या आयुष्यात येणार्‍या चांगल्या व्यक्ती व चांगल्या ग्रंथांचं ते महत्त्व अधोरेखित करतात. आजची पिढी वाचनापासून दुरावत आहे. येथे वाचन संस्काराचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यात येणार्‍या चांगल्या मित्रांचे आपले आयुष्य घडवण्यात महत्त्वाचे योगदान असते. त्यासाठी साथसंगतही योग्य असावी, हे मारुती चितमपल्ली आवर्जून सांगतात.
 
जैन मुनि हंसदेव यांच्या ‘मृगपक्षिशास्त्र’चा संस्कृत- मराठी अनुवाद, ‘आपल्या भारतातील साप’ याचा इंग्रजी- मराठी अनुवाद, आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी), चित्रग्रीव (कबुतराच्या जीवनावरील कादंबरी) इंग्रजी-मराठी अनुवाद केले आहेत. हे सर्व अनुवाद मराठी साहित्यातील उत्कृष्ट भावानुवाद आहेत. ‘पक्षिकोश’ हे त्यांचे आयुष्यभराचे संचित आहे. नवेगावबांध परिसरामध्ये आढळणार्‍या दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदी त्यांनी स्वतः केलेल्या आहेत. स्वतः ‘पक्षिकोश’निर्मितीसाठी जवळजवळ ३० वर्षे २७ जिल्ह्यांतून पक्षांची माहिती संकलित केली. पक्षीवैभवाचा ठेवा जतन व्हावा, तरुण पक्षीनिरीक्षकांना हा ‘पक्षिकोश’ मार्गदर्शक ठरावा, हा दृष्टिकोन ‘पक्षिकोश’निर्मितीमागचा आहे. पक्षी आपला व्यवहार दिवसा करतात. प्राणी त्यांचा व्यवहार रात्री करतात. त्यामुळे पक्षीनिरीक्षण करणे सोपे जाते. रात्र असल्यामुळे प्राण्यांचे निरीक्षण करणे कठीण आहे, परंतु अशय नाही. मनानं मुक्त असाल, तरच पक्षीनिरीक्षणातील आनंद घेता येतो, असे ते सांगत.
 
मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये अनेक सांगता येतील. आठवणी, अनुभव, प्रवासवर्णन, संवादात्मक निवेदन शैली इत्यादींमुळे ललित लेखन समृद्ध झाले आहे. प्राचीन मराठी साहित्यातील ऋग्वेद, यजुर्वेद, वृक्षायुर्वेद, मृगपक्षिशास्त्र, गाथासप्तशती, बृहत्संहिता, मानसोल्हास, मेघदूत, दृष्टांत पाठ, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, कबीरांचे दोहे इत्यादींतील अवतरणे, निसर्गविषयक विविध दाखले, ललितलेखन विषयाशी निगडित असलेली समर्पक माहिती दिलेली आहे. पाश्चात्य साहित्यिक थोरो, वाल्डन, रिस्टॉटल, जॉय डॅमसन, जॉर्ज शेल्लर, चिनी, जपानी लेखकांच्या साहित्याचा संदर्भही देतात. आदिवासी समाजातील लोककथा, दंतकथा, पुराणकथा इ. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून दिसून येतात. दंतकथातील सत्य शोधून त्यांना शास्त्रीय ज्ञानाची जोड त्यांनी दिली आहे. त्यांनी निसर्गालाच नायकत्व प्रदान केले आहे. वृक्ष, पशु-पक्षी, प्राणी, कीटक, समुद्री जीव हे ते नायक होत. मराठीतील बोलीभाषा, वाप्रचार, म्हणी, ओव्या, लोकगीतांच्या सौंदर्याची झलक चितमपल्लींच्या साहित्यात दिसून येतेच.
 
त्यांच्या साहित्याला ‘महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार’, ‘महाराष्ट्र फाऊंडेशन गौरव पुरस्कार’, ‘सारथी’ संस्था उत्कृष्ट निसर्गसाहित्य निर्मितीबद्दल ‘स्क्रोल ऑफ ऑनर’ सन्मान, ‘पर्यावरणरत्न पुरस्कार’ असे विविध संस्थांचे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. भारत सरकारने त्यांना २०२५ ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. सोलापूर येथील ७९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (२००६), नाशिक येथील पहिले पक्षिमित्र संमेलन (१९८७)चे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
 
वनाधिकारी म्हणून कामानिमित्त नागझिरा, नवेगावबांध येथे भटकंती करावी लागायची. त्यावेळी स्वानुभवातून मिळालेले ज्ञान ते वाचकांसमोर लेखनाच्या माध्यमातून प्रकट करतात. या मिळालेल्या वनविद्येतील ज्ञानाचा उपयोग भावी पिढीला, पशु-पक्षीप्रेमींना नक्कीच होईल. पक्ष्यांचे अनोखे व विलक्षण जग, त्यांच्या जीवनातील विविधता, स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांच्या जीवनाचे विविध पैलू, जीवन-मरणाचं रहस्य, त्यांच्या नात्यातील घट्ट वीण हे त्यांच्या साहित्यातून भरून आलेलं आहे. वृक्षांचे विश्व, त्यांची उत्पत्ती, स्थिती, लय अवस्था यांचे लालित्यपूर्ण वर्णन केले आहे. प्राणीसृष्टीतील विविध रहस्यमयी गोष्टी, या वन्यप्राण्यांच्या कान, डोळे, नाक यांच्या तीक्ष्ण संवेदना साहित्यात चित्रित केल्या आहेत. निसर्गविषयक असलेले अगाध ज्ञान, प्राणी, पशु-पक्षी यांचे विश्व जिज्ञासू वृत्तीने जाणून घ्यावयाचे असेल, तर त्यांचे समग्र साहित्य मिळवून त्याचे वाचन करणे नक्कीच आनंददायी असणार आहे.
 
पक्षिवेड्या मारुती चितमपल्ली यांनी जंगलातील वनानुभव वाचक, पक्षीनिरीक्षक, अभ्यासक यांच्या भेटीसाठी ललित साहित्यातून शब्दबद्ध करून दिले. त्यांचे लेखन हे दीपस्तंभाप्रमाणे आहे. आज अनेक पक्षीनिरीक्षक मारुती चितमपल्ली यांनी तयार केलेल्या रानवाटांवर पावले टाकत आहेत. आपण ‘पद्मश्री’ मारुती चितमपल्ली यांनी निसर्गप्रेमाच्या अविरत केलेल्या कार्याबद्दल उतराई होऊ शकत नाही. असे हे ‘निसर्गसाहित्यातील देवदूत’ दि. १८ जून २०२५ अनंतात विलीन झाले. ते आज आपल्यात नसले, तरी साहित्यरूपाने चिरंतन स्मरणात राहणार आहेत. त्यांचे साहित्यातील ‘हिरवे जग’ आपल्याला वनांचा प्रवास वाचनमार्गाने चिरंतन घडवून आणत आहे. आपल्या भावी पिढीसाठी आपल्याला पाखरमाया असलेल्या हरितसृष्टीवर प्रेम करायला शिकायचे आहे. आज जरी ते हयात नसले, तरी त्यांचे समग्र निसर्गसाहित्य वनातील जिवंत, रसरशीत, अनुभवांची चैतन्यमयी अनुभूती देत राहील.
 
प्राचीन काळातील मानव अरण्ये आणि वन्यप्राणी यांच्याबरोबर जगायला शिकत होता. परंतु, आता विज्ञानयुगात मानवाने प्रथम वन्यप्राणी नष्ट केले. त्यानंतर जंगलाचा नाश केला. या सृष्टीवर तुमचे प्रेम नसेल, तर तुम्ही कोणावरही प्रेम करू शकणार नाही. -‘पद्मश्री’ मारुती चितमपल्ली
 
साहित्याचा गौरव
 
‘पद्मश्री’ मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी निसर्गातील जंगल, पशु-पक्षी, प्राणी यांचे विश्व संवेदनक्षम पर्यावरणीय जाणिवेतून अभ्यास करत आहेत. भावी पिढीमध्ये पर्यावरणविषयक सजगता येण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर त्यांचे निवडक साहित्य अभ्यासासाठी निवडले आहे. त्यात ‘एसएससी’च्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘नवेगावबांध रोजनिशीतील दिवस’ हा पाठ, नागपूर विद्यापीठ ‘बीए’ क्रमिक पुस्तकात ‘हिरवे हात’ ही कथा, लेख, ‘महाराष्ट्र राज्य बालभारती’ने इयत्ता सातवीसाठी ‘कोळीण’ सोळावा धडा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनीही ‘बीए’ भाग एकमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात २०२४-२५ पासून ‘जंगलाचं देणं’ हा ललित लेख समाविष्ट केला आहे.
 
गौरी कुंभार
(लेखिका सातार्‍यातील खटाव तालुयातील निसर्ग अभ्यासक आहेत.)
९८८१७१७४३९