मुंबई : (Trinamool Congress) पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार जहांगीर खान यांना अटक केल्यानंतर निकरमध्ये त्यांच्या परिसरात पोलिसांनी अक्षरशः रस्त्यावरून धिंड काढल्याचे निदर्शनास आले. स्वतःला पुष्पा म्हणवणाऱ्या जहांगीर खानची पुष्पागिरी पार उतरवल्यचे दिसून आले. डायमंड हार्बर पोलिसांनी त्याच्याविरोधातील आणखी एक जुने प्रकरण पुन्हा उघडकीस आणले, हे प्रकरण २०२० मध्ये डायमंड हार्बर येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याशी संबंधित आहे.
अशी माहिती आहे की, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असता जहांगीर खान यांचे नावही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील पोलीस तपासात त्यांना आरोपांतून मुक्त करण्यात आले होते आणि प्रकरण बंद करण्यात आले होते. आता पोलिसांनी हे प्रकरण पुन्हा सुरू करून नव्याने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जहांगीर खान यांना २०२१ च्या विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणाच्या तपासासाठी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फलता परिसरातील विविध ठिकाणी नेले. पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांच्या ताफ्यासह त्यांना सहारारहाट आणि आसपासच्या भागात फिरवण्यात आले. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत त्यांची धिंड काढण्यात आली. याप्रसंगी जहांगीर खान अनेकदा हात जोडून नागरिकांसमोर माफी मागताना दिसले. काहीवेळा त्यांनी कान धरले, तर काहीवेळा हात जोडून उभे राहिले.
नेपाळ सीमेजवळून अटक
जहांगीर खानला उत्तर बंगालमधील पाणीटंकी परिसरात भारत-नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. ते तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. नुकत्याच झालेल्या फलता विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ते चौथ्या क्रमांकावर राहिले होते. २१ मे रोजी झालेल्या या निवडणुकीपूर्वी काही दिवस त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. (Trinamool Congress)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक