गजबजले योगाचे माहेरघर...

    15-Jun-2026
Total Views |

 India Leads Global Yoga
 
भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या. त्यापैकी एक म्हणजे योग! अलीकडे या योगाचा प्रसार आणि प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला असून, भारताची त्यामागील भुमिकाही दीपस्तंभाचीच आहे. याच योगाच्या पहिल्यावहिल्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजनही भारताने केले होते. त्यात भारताला जेतेपदही मिळाले. या स्पर्धेचा आढावा घेणारा हा लेख...
 
एका द्रोणाचार्याला श्रद्धांजली : ‘क्रीडाविश्व’त मागच्या महिन्यातच आपण ‘नेमबाजी’ क्रीडाप्रकारातील ज्येष्ठ नेमबाज राजा रणधीर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. यावेळी दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ यावी, हे दुःखदायकच.
 
सर्वसाधारणपणे वयाच्या चाळीशी-पन्नाशीत निधन झालेल्या क्रीडापटूविषयी, क्रीडाप्रेमींना हळहळ वाटणे स्वाभाविकच. जर्मनीतील म्युनिक येथे दि. २४ मे ते ३१ मे या कालावधीत ‘आयएसएसएफ’ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ आयोजित रायफल/पिस्तुल विश्वचषक नेमबाजी स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये जगभरातील ८५ देशांतील ७०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून पॅरिस ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर, तसेच स्वप्नील कुसाळे यांच्यासह ३५ सदस्यांनीही यात भाग घेतला होता. भारताने या स्पर्धेत चमकदार प्रदर्शन करत, दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण चार पदकेही पटकावली. या स्पर्धेतून परतत असताना विमानातच, जसपाल राणा यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यामुळे दिल्लीत दाखल झाल्यावर, तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्यांच्यावर ’एन्जिओप्लास्टी’ही करण्यात आली. मात्र, उपचारादरम्यानच गुंतागुंत झाल्याने त्यांचे शुक्रवार, दि. १२ जून रोजी निधन झाले.
 
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे जन्मलेल्या जसपाल यांचे वडील नारायण सिंह राणा, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात माजी अधिकारी होते. त्यांनीच जसपाल यांना नेमबाजीचे बाळकडू पाजले. आपल्या हयातीत लेकाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ यावी, हे अधिकच दुःखद. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके मिळवणारी मनू भाकर हिच्या मते, जसपाल राणा हे केवळ तिचे प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकच नव्हते, तर ते एक चांगले मित्रही होते. जसपाल यांच्या निधनाने मनू भाकरला मोठाच धक्का बसला. तिने जसपाल यांच्या निवासस्थानी जाऊन, त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले. यावेळी दु:ख़ावेगाने तिला अश्रु अनावर झाले होते.
 
परदेशातून आयात होणार्‍या, विशेषतः नेमबमहागड्या साहित्यावरील २८ टक्के एवढ्या उच्च जीएसटीचा मध्यमवर्गीय खेळाडूंना फटका बसत होता. यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाच्या प्रगतीला अडथळा येत असल्याचे सांगत, जसपाल यांनी हा कर कमी करण्यासाठी आवाज उठवला. जसपाल यांच्या प्रयत्नांमुळेच, सरकारने आयात क्रीडा साहित्यावर करसवलत जाहीर केली. यानंतर ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही खेळाडूंना दिलासा देणार्‍या या निर्णयाचे व जसपाल यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले होते. स्पर्धात्मक नेमबाजीतून निवृत्ती घेण्यापर्यंत ठीकच होते रे, पण प्रशिक्षक पदावरून अशी एझिट! अजून काही मनू घडवायच्या होत्या तुला; भारतातलं ऑलिम्पिक पाहायचंय अजून... देवानं जसपालला न्यायला बहुधा घाईच केली, असं वाटतंय. असो! तर जसपाल राणाला ‘क्रीडाविश्व’तर्फे श्रद्धांजली अर्पण करून, आपण आपल्या यावेळच्या लेखातील पुढच्या विषयाकडे वळू.
 
भारत - योगाचे माहेरघर : ‘युनो’ अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला ‘आंतरराष्ट्रीय खेल दिवस’ गुरुवार, दि. ११ जून रोजी साजरा झाला. हसत खेळत जगायला शिकवणारा ‘खेळ’ हा प्रकार, माणसांना एकत्र येऊन जगण्याचेही शिक्षण देतो.
 
शरीरशास्त्रज्ञांच्या मते, मानवी शरीरात अनेक प्रकारची संप्रेरके असतात. त्या संप्रेरकांत महत्त्वाचे असते ते, शरीरात उत्साही भावना निर्माण करणारं ‘हॅपी हार्मोन्स.’ आपल्याला आनंदी ठेवणारे असे हे संप्रेरक, खेळाडूच्या शरीरात बाकीच्यांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त असते. जेव्हा आपण एखादे ध्येय पूर्ण करतो किंवा एखादी आवडती गोष्ट मिळवतो, तेव्हा मेंदूमध्ये आनंद निर्माण करणारे हार्मोन्स म्हणजे ‘डोपामाईन’ अर्थात ‘फील-गुड हार्मोन.’ दुसरे ‘सेरोटोनिन’ हे हार्मोन्स मानवाच्या मनाचा कल, झोप आणि पचन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याची सुमारे ९०टक्के निर्मिती आतड्यांमध्ये होते. तिसरे संप्रेरक ‘ऑसीटोसिन’ असून, ते नातेसंबंधांमध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी वाढवण्याचे काम करते. या संप्रेरकांमधील चौथे ‘एण्डोर्फिन’ हे शरीरातील नैसर्गिक वेदनाक्षामक असून, ताणतणाव किंवा वेदनेच्या वेळी आपले शरीर ते स्रवत. ‘एण्डोर्फिन’मुळे आपल्याला बरे आराम मिळतो. आपण जेव्हा मनमोकळेपणाने हसणे, चालणे, ध्यानधारणा आणि योगासने करणे अशा क्रिया करतो, त्यावेळी ‘एण्डोर्फिन’ हे संप्रेरक विशेष प्रभावी ठरते. ‘एण्डोर्फिन’ संप्रेरक ज्या ध्यानधारणा, योगासने इत्यादी अष्टांग योगाच्या प्रमुख अंगांना मोलाचे ठरते, त्यातील ‘योग’ ही एक प्राचीन भारतीय प्रथा आहे. यामध्ये शारीरिक आसने, श्वासोच्छ्वास-तंत्र आणि ध्यानाचा समावेश असतो. गेल्या काही वर्षांत, या शिस्तीचे एका जागतिक चळवळीत आणि ‘योगासन’ नावाच्या स्पर्धात्मक खेळातही रूपांतर झाले आहे. ’योग’ शब्द संस्कृतमधील ‘युज’ (एकत्र करणे) आणि ‘आसन’ (शरीराच्या मुद्रा) यावरून आला आहे.
 
भारतात शतकानुशतके ध्यानधारणा, योगविद्या, योगासने याचे महत्त्व जोपासणारे कित्येक तपस्वी होऊन गेले, अन् आजही आहेत. हे तपस्वीजन योगविद्येचे महत्त्व सार्‍या जगला पटवून देण्यासाठी आजही झटतात. ते संयुक्त राष्ट्रसंघामार्फत जागतिक योग दिन साजरा करण्यातही सहभागी होतात. आपला देश हे योगविद्येचे माहेरघर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर, दरवर्षी दि. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून उत्साहात साजरा होतो. त्याच पंतप्रधानांच्या पाठिंब्याने जागतिक योगासन अजिंयपद स्पर्धाही, भारतात दि. ४ जून ते दि. ८ जून या कालावधीत खेळल्या गेल्या.
 
योगासनाला खेळाचे स्वरूप देणे, हे योगाच्या प्रवासातील एक नवीन पर्व असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. योगासने ही मानवतेला भारताची काळाच्या पलीकडची देणगी असून, यामुळे खेळाडूंना निरोगी जीवनशैलीसह जागतिक व्यासपीठ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. सध्या भारत २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याच्या तयारीत आहे. त्याआधी जागतिक स्तरावर योगासनाचा एक क्रीडा प्रकार म्हणून प्रसार करणे आणि ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश करणे, हे पंतप्रधान मोदींचे महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे.
 
अशा या जागतिक योगासन अजिंयपद स्पर्धेत, यजमान भारताने आपले वर्चस्व प्रस्थापित करून दाखवले आहे. पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत, भारताने तब्बल १०२ सुवर्ण, नऊ रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण ११४ पदके पटकावत जागतिक जेतेपदाला गवसणी घातली. अहमदाबाद येथील कांकरियामधील ‘एका एरिना ट्रान्सस्टेडिया’ येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धांमध्ये, ७९ देशांतील ५२२ खेळाडू सहभागी झाले होते. एकूण ३१ देशांनी किमान एक पदक जिंकले, तर दहा देशांनी किमान एक सुवर्णपदक पटकावले.
 
विदेशातील स्पर्धकांसाठी भारतात या स्पर्धेत सहभागी होता आल्याबद्दल, दुहेरी आनंद व्यक्त केला. आपले योगासनाचे कसब प्रदर्शित करण्याबरोबरच, आपल्या घरच्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये सांगितलेली भारतातील ती गावं बघण्याचा योगही या स्पर्धांमुळे साधता आला. देशातील विविध राज्यांमधील या खेळाडूंच्या पूर्वजांच्या गावांची, त्यातील काहींची नावे पिढ्यान्पिढ्यांच्या ओघात पुसली गेली असून, कौटुंबिक नोंदीही हरवल्या आहेत. आता उरले आहेत, ते एका अशा प्रवासाचे काही अंश. जो प्रवास एका शतकाहून अधिक काळापूर्वी सुरू झाला होता. या खेळाडूंच्या पूर्वजांनी एका नवीन आयुष्याच्या शोधात, हिंदी महासागर ओलांडला होता.
 
त्यांच्यापैकी काहींच्या पूर्वजांचे एकेकाळी ‘घर’ असलेल्या या देशात पाऊल ठेवण्याची, या खेळाडूंची पहिलीच संधी होती. त्यामुळेच विदेशी ‘जेन झी’ स्पर्धक या प्राचीन भारतीय योगविद्येला मनापासून धन्यवाद देत होते. आजी-आजोबा आणि कुटुंबातील मोठ्या सदस्यांकडून भारताविषयीच्या गोष्टी ऐकत लहानाचे मोठे झालेल्या या काही ‘जेन-झी’ योगस्पर्धकांसाठी, आजवर भारत ही काहीशी इतिहास आणि काहीशी कौटुंबिक दंतकथेचा भाग होती.
 
आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धांमध्ये पारंपरिक योगासन, कलात्मक एकल, कलात्मक जोडी, कलात्मक गट आणि लयबद्ध जोडी या प्रकारांतील स्पर्धांचा समावेश होता. खेळाडूंनी पुढे वाकणे, मागे वाकणे, शरीर पिळवटणे, हातावर तोल सांभाळणे, पायावर तोल सांभाळणे आणि पाठीवर झोपून आसने अशा विशेष प्रकारांचाही अंतर्भाव होता.
 
या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्याने, इतर सहभागी देशांपेक्षा भारत या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू उतरवू शकला होता. भारतातले अनुभवी योगगुरू पुढील पिढ्या घडवत असून, भारताच्या दृष्टिकोनातून तो एक मोठाच फायदा होता. या स्पर्धेसाठी, भारताने १२२ खेळाडूंचा बलाढ्य संघ मैदानात उतरवला होता. सब-ज्युनिअर (१०-१४ वर्षे) ते सिनिअर-सी (४५-५५ वर्षे) अशा एकूण सहा वयोगटांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. जागतिक योगासन स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, ‘डी. डी.स्पोर्ट्स’ने केले होते. या स्पर्धेची अधिकृत अचूक प्रेक्षकसंख्या जाहीर झालेली नसली, तरी अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून देशभरातील लाखो क्रीडाप्रेमी आणि योगसाधकांनी थेट प्रक्षेपण पाहिले असणार, हे नक्की. जागतिक योगासन स्पर्धेचे असेच वर्षानुवर्षे आयोजन होत राहो आणि त्याला असाच उदंड प्रतिसाद मिळत राहो!
 
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४