रायगड : (Devendra Fadnavis) एकेकाळी जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की, मोडकळीस आलेली किंवा पुरेशा व्यवस्था नसलेली शाळा पाहायला मिळायची. पण आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा त्याहीपेक्षा चांगल्या पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण हे ९० टक्के खासगी शाळांपेक्षा चांगले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जि.प. शाळांचे कौतूक केले.
पी.एम.श्री. रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, वहाळ, पनवेल येथे आयोजित 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी शाळा प्रवेशाच्या महोत्सव आयोजित करतो ही आनंदाची बाब आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, मंत्री, नेते हा प्रवेश साजरा करत आहेत. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. याठिकाणी आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण देण्यासाठी उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक डिजिटल लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध असून शिक्षकांना अधिक प्रभावीपणे अध्यापन आणि विद्यार्थ्यांना अध्ययन करता येईल. तसेच ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेमुळे शिक्षण प्रक्रियेला अधिक गती आणि गुणवत्ता प्राप्त होणार आहे. आजच्या डिजिटल युगातील डिजिटल विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचे हे उत्तम साधन आहे. राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये अशा प्रकारची लॅब आपण तयार करतो आहोत."
शाळांमध्ये चांगला भावी नागरिक तयार व्हावा हाच प्रयत्न
ते पुढे म्हणाले की, "आता जिल्हा परिषद शाळांमध्ये मूल्यशिक्षणसुद्धा सुरु केले आहे. मुलांना संवैधानिक मूल्य माहिती असावीत, हक्क आणि कर्तव्यांची जाणीव असावी, स्वच्छता, पर्यावरणाची जाणीव असावी आणि या शाळांमध्ये एक चांगला भावी नागरिक तयार व्हावा, हा आपला प्रयत्न आहे. या सगळ्या प्रयत्नांमध्ये गावकरी आणि पालकांची भूमिका महत्वाची आहे. ज्या ज्या शाळांच्या परिसरातील पालक जागृत आहे, जिथे पालकांची समिती चांगले काम करते त्या शाळा उत्तम आहेत. केवळ मुलांना शाळेत पाठवून देणे इथेच पालकांचे कर्तव्य संपत नाही, तर पालकांना या संपूर्ण प्रवासात शाळेचे शिक्षक, कर्मचारी यांचे सोबती म्हणून त्यांच्यावर लक्षही ठेवले पाहिजे आणि त्यांना सहकार्य केले पाहिजे."
खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा कल जि.प. शाळांकडे
"शिक्षण विभागाने चांगल्या पद्धतीने शाळांचे परिवर्तन सुरु केले आहे. मधल्या काळात जिल्हा परिषद शाळांना लागलेली थोडी गळती आता संपलेली आहे. उलट आता अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी शाळांमधून जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे येण्याचे प्रमाण वाढले आहे," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.(Devendra Fadnavis)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....