ढाका : (Hindu Temple) बांगलादेशातील गैबांधा जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या ८२ फूट उंचीच्या राममूर्ती प्रकल्पाचे काम कट्टरपंथीय संघटनांच्या वाढत्या विरोधानंतर स्थगित करण्यात आले आहे. श्री राधा गोविंद आणि काली मंदिर परिसरात ही भव्य मूर्ती उभारली जात होती. मंदिर व्यवस्थापनाने हा निर्णय सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी तात्पुरता असल्याचे म्हटले असले, तरी स्थानिक पातळीवर वाढलेल्या दबावामुळेच प्रकल्प थांबवावा लागल्याची चर्चा आहे.
हा प्रकल्प २०२५च्या सुरुवातीला खासगी निधीतून सुरू करण्यात आला होता. प्रस्तावित राममूर्तीला ‘आशियातील सर्वांत उंच राममूर्ती’ म्हणून ओळख मिळणार होती. या प्रकल्पासाठी सुमारे १७ कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित होता. मंदिर परिसरात यापूर्वीच १०० हून अधिक देवी-देवतांच्या मूर्ती असून त्यामध्ये ३० फूट उंचीची शिवमूर्ती आणि ५३ फूट उंचीची कृष्णमूर्तीही आहे. राममूर्ती प्रकल्पाला विरोध करणार्या काही कट्टरपंथी संघटनांनी केवळ काम थांबविण्यावर समाधान व्यक्त न करता, उभारण्यात आलेली अपूर्ण रचना पाडण्याची मागणी केली आहे.
‘इमाम-उलेमा परिषद’ आणि इतर संघटनांनी हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. विरोधकांनी प्रकल्पाच्या निधीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्ट्ररपंथियांकडून होणारा विरोध धार्मिक असहिष्णुतेचे लक्षण आहे, असे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. हा विरोध केवळ प्रकल्पाविरोधात नसून हिंदू धार्मिक प्रतीकांविरोधातील मानसिकता दर्शवित असल्याचं हिंदुत्ववादी कार्यकर्ते सांगतायेत. यानिमित्ताने बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू धर्मियांवरील अत्याचाराचा मुद्दाही चर्चेत आला आहे.(Hindu Temple)
गेल्या दोन वर्षांत बांगलादेशात हिंदू धार्मिक प्रकल्पांना विरोध झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. २०२५ मध्ये ढाक्यातील एका दुर्गा मंदिराशी संबंधित बांधकामावर विरोध झाल्यानंतर ते हटविण्यात आले होते. तसेच २०२४ मध्ये ढाक्याच्या उत्तर भागात दुर्गेची मूर्ती उभारण्यास विरोध झाल्याने आयोजकांना स्थान बदलावे लागले होते.(Hindu Temple)