बालकांमध्ये आनंद तर पालकांच्या डोळ्यात दिसली कृतज्ञतेची भावना

    15-Jun-2026   
Total Views |
Arya Natekar
 
डोंबिवली : (Arya Natekar) शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे नव्हे तर कौतुकाची थाप देत भाजपाच्या नगरसेविका आर्या नाटेकर यांनी पाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. एवढेच नव्हे तर मुलांना शालेय बॅग आणि वह्या असे शैक्षणिक साहित्य देऊन लहानग्या पंखांना बळ देण्याचे काम केले आहे. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्य़ातील कृतज्ञता सुखावणारी होती.
 
भाजपाच्या प्रभाग क्रमांक 29 च्या नगरसेविका आर्या नाटेकर आणि भाजपा कल्याण जिल्हा सचिव ओमनाथ नाटेकर यांच्या वतीने प्रभागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वाटप केले. सध्याच्या महागाईच्या युगात सर्व पालकांना आपल्या पाल्याला शालेय साहित्य पुरविणे आवाक्यात नसते.
 
त्यामुळे शाळेकडे संपर्क साधून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या हाती शालेय साहित्य दिले आहे. त्यामुळे विद्याथ्र्याच्या चेहऱ्यावर ही एक वेगळाच आनंद दिसत होता. डोंबिवली पूर्वेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदीर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
नाटेकर यांनी स्वामी विवेकानंद विद्यामंदीर, दत्तनगर येथे शालेय बॅग, सरस्वती विद्यालय आयरेगाव येथे वहया वाटप, महापालिकेची लालबहादूर विद्यालय, डीएनसी विद्यालय, जिल्हा परिषद शाळा सागाव, पीअॅड टी कॉलनी येथे विद्याथ्र्याना वहया आणि कंपास पेटी या साहित्याचे वाटप केले. तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता प्रभागातील पाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व देखील स्वीकारून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.(Arya Natekar)
 
ओमनाथ नाटेकर म्हणाले,आमच्या प्रभागातील पाच शाळांमधील विद्यार्थ्याना शालेय साहित्य देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवित आहोत. खरे म्हणजे याला उपक्रम म्हणू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून काम करत आहोत. ही एक जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाजाला काहीतरी देणो लागतो आणि ते आपण केले पाहिजे. आम्ही स्वामी विवेकानंद शाळेत प्रथम आलो आहे अशा पध्दतीने प्रभागातील पाच शाळांमधील 1465 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणार आहे.
 
आर्या नाटेकर यांनी सांगितले, अनेक पालकांना शालेय साहित्याची खरेदी करता येत नाही. आम्ही शाळेशी संपर्क करून काही गरजू आणि होतकरू विद्यार्थी निवडले. तसेच शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता पाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व आम्ही घेतले आहे. आयरे गाव येथील सरस्वती विद्यालय येथील वह्यवाटप कार्यक्रमास भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब आणि मनिषा राणे या उपस्थित होत्या. त्यांनी आर्या नाटेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.(Arya Natekar)