तहानलेलं पाणी...

    15-Jun-2026   
Total Views |
AI
 
पाण्या-पावसाशिवाय आपलं जग अधुरं आहे. आताच्या घडीला भारतासह जगभरातच विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘जागतिक हवामान संघटने’च्या ताज्या अहवालानुसार, ‘एल निनो’मुळे हवामानबदलाची गती वाढली असून, काही देशांत भीषण पूर, तर काही भागांत तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. भारतात दि. ४ जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. सध्या मान्सून कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत पुढे सरकला असून, सुरुवातीच्या टप्प्यात देशभरात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसर्‍या बाजूला दक्षिण चीनमधील अनेक प्रांतांत, पावसामुळे भीषण पूर आला आहे. एका बाजूला या असमतोल वातावरणाशी झुंज देतानाच, दुसर्‍या बाजूला आपल्यासमोर मानववनिर्मित आव्हान येऊन ठेपलं आहे. हे आव्हान आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवाह सुरळीत सुरू राहाण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचं!
 
आपण जेव्हा इंटरनेटवर काहीही शोधतो किंवा ‘एआय’ वापरतो, तेव्हा ती सर्व माहिती कुठेतरी साठवली जाऊन, त्यावर प्रक्रिया होते. ही प्रक्रिया ज्या हजारो कॉम्प्युटर्स (सर्व्हर्स)द्वारे केली जाते, त्यांना ‘डेटा सेंटर्स’ म्हणतात. हे सर्व्हर्स २४ तास सुरू असल्याने तापतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आणि विजेची गरज असते. जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’ने पहिल्यांदाच जाहीर केले की, त्यांच्या जगभरातील डेटा सेंटर्सनी २०२५ या वर्षात तब्बल नऊ अब्ज लिटर्सपेक्षा जास्त पाण्याचा वापर केला. पाण्याचा हा आकडा खूपच मोठा वाटत असला तरी ‘अ‍ॅमेझॉन’चे म्हणणे आहे की, त्यांचे डेटा सेंटर्स त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा (उदा. ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गुगल’ आणि ‘मेटा’) खूप जास्त कार्यक्षम आहे. ‘अ‍ॅमेझॉन’च्या आकडेवारीनुसार, त्यांनी २०२५ मध्ये किलोवॅट प्रतितास विजेमागे फक्त ०.१२ लिटर पाण्याचा वापर केला, जो इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. त्यांचा डेटा सेंटर्सचा विस्तार होतानाही, थेट त्यांच्या मालकीच्या सेंटर्समधील पाण्याचा वापर २०२४च्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाला. ‘अ‍ॅमेझॉन’ ९० टक्के वेळा सर्व्हर्स थंड ठेवण्यासाठी बाहेरील नैसर्गिक हवेचाच वापर करते. फक्त खूप उष्णता असेल, तेव्हाच पाण्याचा वापर करण्यात येतो. ‘अ‍ॅमेझॉन’चा हा दावा असला तरी तज्ज्ञांच्या मते, या आकड्यात नवीन डेटा सेंटर्स बांधण्यासाठी लागणारे पाणी आणि त्यांना वीज पुरवणार्‍या पॉवर प्लांट्सना लागणार्‍या पाण्याचा समावेश केलेला नाही.
 
पर्यावरणासंबंधित प्रश्नांमुळेच अमेरिकेत डेटा सेंटर्सच्या उभारणीला आणि वाढत्या पाणीवापराला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. ‘अ‍ॅमेझॉन’च्या कर्मचार्‍यांनीही यावर चिंता व्यक्त केली होती, ज्यामुळे सिटलमध्ये नवीन डेटा सेंटर्स उभारणीवर एक वर्षाची बंदी आली आहे. यासंदर्भात जगभरातील डेटा सेंटर्सच्या पाणीवापराबाबत पारदर्शकता आणण्यासाठी कायदे असावे, यासाठी अनेक संस्था विचाराधीन आहेत.
 
‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी’च्या एका अहवालानुसार, २०३० पर्यंत जगभरातील डेटा सेंटर्सचा एकूण ‘वॉटर फूटप्रिंट’ (पाण्याचा वापर) ९.३ ट्रिलियन (९ लाख, ३० हजार कोटी) लिटर्स एवढा प्रचंड असेल. ‘अ‍ॅमेझॉन’ने म्हटले आहे की, २०३० पर्यंत ते ‘वॉटर पॉझिटिव्ह’ होती. म्हणजेच, ते आपल्या व्यवसायासाठी जितके पाणी वापरतील, त्यापेक्षा जास्त पाणी ते वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून (उदा. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरणे) समाजाला परत करतील. ‘अ‍ॅमेझॉन’च्या या दाव्यामध्ये जरी तथ्य असले, तरी येणार्‍या काळामध्ये ‘एआय’च्या वाढत्या वापरामुळे जन्माला येणार्‍या कंपन्या अशा पद्धतीचं अनुकरण करतीलच का? हा प्रश्नच आहे. वाढत्या डिजिटल आणि ‘एआय’ युगात, डेटा सेंटर्स ही जगाची गरज असली, तरी त्यासाठी होणारा पाण्याचा प्रचंड वापर पर्यावरणावर मोठाच ताण निर्माण करेल. ‘अ‍ॅमेझॉन’ने आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असला, तरी भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता, हा दावा आश्वस्त करणारा आहे का? हा प्रश्नही पडताचे. एका बाजूला इंटरनेटशिवाय जग काही काळ चालू शकते; पण पाण्याशिवाय मानवी अस्तित्वाची कल्पनाच अशक्य आहे. त्यामुळे येणार्‍या काळात या समस्यांवर तोडगा काढण्याशिवाय आपल्याकडे तरणोपाय नाही, हे नक्की!




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.