चंद्र नसता तर?

    14-Jun-2026
Total Views |
 
What If Moon Absent
 
रात्रीच्या आकाशातील चंद्र हा मानवाचा सर्वांत जुना सहप्रवासी. प्राचीन संस्कृतींपासून आधुनिक विज्ञानापर्यंत, चंद्राने मानवाच्या कल्पनाशक्तीला सतत प्रेरणा दिली. परंतु, चंद्र केवळ आकाशातील एक सुंदर खगोलीय वस्तू नाही. पृथ्वीच्या इतिहासात आणि जीवनाच्या उत्क्रांतीत त्याची भूमिका इतकी खोलवर गुंतलेली आहे की, जर चंद्रच अस्तित्वात नसता; तर आजची पृथ्वी पूर्णपणे वेगळीच दिसली असती. कदाचित, पृथ्वीवर जीवन निर्माण झाले असते पण, ते आजच्या स्वरूपात निश्चितच नसते. काही संशोधक असेही मानतात की, जटिल सजीवांचा विकासच कदाचित झाला नसता.
 
आजपासून सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी नुकतीच तयार होत होती. त्याकाळात सौरमालेत सतत धडका होत. पृथ्वीच्या निर्मितीनंतर काही कोटी वर्षांनी, मंगळा एवढ्या आकाराची एक खगोलीय वस्तू पृथ्वीला धडकली. यामुळे पृथ्वीच्या बाह्य भागातील पदार्थ अवकाशात फेकला गेला आणि पुढे याच पदार्थापासून चंद्राची निर्मिती झाली. या सिद्धांताला ‘जायंट इम्पॅट हायपोथिसिस’ असे म्हणतात. आज उपलब्ध असलेल्या खडकांच्या नमुन्यांमधील रासायनिक साम्यामुळे, या सिद्धांताला आधारही मिळाला. या घटनेनंतर पृथ्वीभोवती चंद्राची निर्मिती झाली आणि त्यानंतर पृथ्वीच्या इतिहासाला एक वेगळेच वळण मिळाले. आपण सहसा चंद्राचा विचार भरती-ओहोटी किंवा पौर्णिमा-अमावस्येपुरता करतो. परंतु, पृथ्वीच्या स्थैर्यामागे चंद्राचा हात आहे, हेच अनेकांना ठाऊक नसते.
 
पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती सुमारे २३.५ अंशांच्या कोनात फिरते. यामुळे ऋतू निर्माण होतात. परंतु, हा कल स्थिर ठेवण्यात, चंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या अक्षातील विचलन नियंत्रित राहते. जर चंद्र नसता, तर पृथ्वीचा कल सतत बदलत राहिला असता. काहीकाळ तो १० अंशांपर्यंत खाली आला असता, तर काहीवेळा ६० किंवा ७० अंशांपर्यंत वाढला असता. अशा परिस्थितीत, पृथ्वीवरील हवामान अत्यंत अस्थिर झाले असते. काही लाख वर्षांनी एकदा संपूर्ण हवामान व्यवस्थाच बदलली असती. एखाद्या काळात ध्रुव प्रदेश विषुववृत्ताइतके उष्ण झाले असते, तर विषुववृत्तीय प्रदेश बर्फाने झाकले गेले असते. अशा तीव्र बदलांमध्ये, जटिल जीवसृष्टीचा विकास अत्यंत कठीण झाला असता.
 
चंद्राचा दुसरा महत्त्वाचा परिणाम भरती-ओहोटीवर दिसतो. पृथ्वीवरील भरती-ओहोटीचे मुख्य कारण, चंद्राचे गुरुत्वाकर्षण आहे. जर चंद्र नसता, तर भरती-ओहोटी निर्माण झाली नसती असे नाही; सूर्यामुळे काही प्रमाणात ती झालीही असती. मात्र, तिची तीव्रता आजच्या तुलनेत खूपच कमी असती. जीवनाच्या सुरुवातीच्या काळात भरती-ओहोटीचे महत्त्व प्रचंड होते, असे अनेक संशोधक मानतात. समुद्रकिनार्‍यावरील उथळ पाण्याच्या भागात सेंद्रिय रेणू वारंवार एकत्र येणे, कोरडे पडणे आणि पुन्हा पाण्यात मिसळणे या प्रक्रियांमुळे जीवनाच्या प्रारंभिक रासायनिक प्रतिक्रिया घडून आल्या असाव्यात. भरती-ओहोटी नसती, तर या प्रक्रिया खूपच कमी प्रमाणात घडल्या असत्या. त्यामुळे जीवनाचा उदय उशिरा झाला असता किंवा तो वेगळ्या मार्गाने झाला असता.
 
पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगावरही चंद्राचा प्रभाव आहे. आज पृथ्वीला स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण करण्यास २४ तास लागतात. पण, पृथ्वीच्या निर्मितीच्या काळात एक दिवस केवळ पाच ते सहा तासांचा असावा, असा अंदाज आहे. चंद्राच्या गुरुत्वीय परिणामामुळे, पृथ्वीची गती मंदावली. जर चंद्र नसता, तर पृथ्वी आजही अधिक वेगाने फिरत असती. अशा परिस्थितीत दिवस कदाचित आठ ते दहा तासांचाच असता. यामुळे वातावरणातील वारे अधिक तीव्र झाले असते, हवामानाचे स्वरूप वेगळे असते आणि महासागरातील प्रवाहही पूर्णपणे बदलले असते. याचा परिणामही जीवसृष्टीवर झाला असता.
 
चंद्राच्या अस्तित्वामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भूगर्भीय प्रक्रियांवरही अप्रत्यक्ष परिणाम झाल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे. चंद्र पृथ्वीच्या तुलनेत मोठा उपग्रह असल्यामुळे, त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम पृथ्वीच्या घन कवचावरही होतो. प्रारंभीच्या पृथ्वीवर चंद्र आजच्या तुलनेत खूप जवळ होता. त्यामुळे त्याचा गुरुत्वीय प्रभाव अधिक तीव्र होता. काही भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते, यामुळेच पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेचे वितरण आणि खंडांच्या प्रारंभिक घडणीत काही प्रमाणात हातभार लागला असावा. जरी हा विषय अद्याप संशोधनाधीन असला; तरी पृथ्वीवरील खंड, महासागर आणि दीर्घकालीन भूगर्भीय चक्रांच्या इतिहासात चंद्राची भूमिका आपण पूर्वी समजत होतो, त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची असू शकते. यामुळे पृथ्वी ही केवळ सूर्य आणि स्वतःच्या अंतर्गत प्रक्रियांमुळे घडलेली नसून, तिच्या चंद्राशी असलेल्या अब्जावधी वर्षांच्या परस्परसंबंधांतूनही आकाराला आलेली एक गतिमान प्रणाली असल्याचे अधोरेखित होते.
 
चंद्राचा परिणाम केवळ पृथ्वीवरच नाही, तर सजीवांच्या उत्क्रांतीवरही दिसतो. पृथ्वीवरील अनेक सजीवांची जैविक घड्याळे चंद्रचक्राशी संबंधित आहेत. काही समुद्री प्राणी विशिष्ट चंद्रकलांमध्ये अंडी घालतात, प्रवाळांचे सामूहिक प्रजनन पौर्णिमेशी जोडलेले असते,अनेक सजीवांच्या वर्तनावर चंद्रप्रकाशाचा परिणाम दिसतो. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत, या चक्रांचा जीवसृष्टीवर खोल प्रभाव पडला आहे. मानवी-संस्कृतीवरही चंद्राचा परिणाम अनन्यसाधारणच आहे. कालगणना, पंचांग, सण-उत्सव, शेतीचे नियोजन, नौकानयन आणि समुद्रीप्रवास यांमध्ये चंद्राची भुमिका महत्त्वाची आहे. जर चंद्र नसता, तर मानवी-संस्कृतीचाही विकासही वेगळ्या मार्गाने झाला असता.
 
आधुनिक संशोधनातून समोर आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, चंद्राविना असलेल्या पृथ्वीवर हवामानातील गोंधळ अधिक तीव्र असेल. पृथ्वीचा अक्षीय अक्षाचा कल सतत बदलल्यामुळे, दीर्घकालीन हिमयुगे आणि उष्ण कालखंड अधिक वारंवार आले असते. अशा परिस्थितीत मोठ्या आणि गुंतागुंतीच्या परिसंस्था टिकून राहणेच अवघड झाले असते. यामुळेच बाह्य-ग्रहांचा अभ्यास करताना वैज्ञानिक आता केवळ ग्रह शोधत नाहीत, तर त्या ग्रहांना मोठे उपग्रह आहेत का? याचाही अभ्यास करतात. एखादा ग्रह निवासयोग्य क्षेत्रात असला, तरी त्याला चंद्रासारखा मोठा उपग्रह नसेल; तर तेथील हवामान दीर्घकाळ स्थिर राहीलच असे नाही. त्यामुळे काही संशोधकांच्या मते, जीवनासाठी योग्य ग्रह शोधताना मोठ्या उपग्रहांचे अस्तित्वदेखील महत्त्वाचा घटक असू शकतो.
 
अलीकडे बाह्य-ग्रहांच्या शोधामुळे बहिर्चंद्र म्हणजेच, इतर ग्रहांभोवती फिरणारे उपग्रह शोधण्याचेही प्रयत्न वाढले आहेत. आजपर्यंत हजारो बाह्य-ग्रह सापडले, तरी त्यांच्या उपग्रहांचा शोध घेणे अत्यंत कठीण आहे. कारण, उपग्रह आकाराने लहान असल्यामुळे, त्यांचे संकेत अतिशय क्षीण असतात. तरीही, काही संभाव्य बहिर्चंद्रांचे संकेत संशोधकांना आढळले आहेत. जर भविष्यात पृथ्वीएवढ्या ग्रहाभोवती चंद्राएवढा मोठा उपग्रह आढळला, तर तो खगोलशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. अशा प्रणालींमध्ये हवामानाची दीर्घकालीन स्थिरता, महासागरांची हालचाल आणि जीवनाच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक परिस्थितीचा अभ्यास करता येईल. विशेष म्हणजे, काही संशोधकांच्या मते, मोठे बहिर्चंद्र स्वतःही जीवनासाठी योग्य जग असू शकतात. म्हणजेच, भविष्यात दुसरी पृथ्वी शोधण्याच्या शर्यतीत केवळ ग्रहच नव्हे, तर त्यांच्या उपग्रहांचाही समावेश होऊ शकतो. त्यामुळे चंद्राचा अभ्यास संपूर्ण विश्वातील जीवनाच्या शोधाशी जोडला जातो.
 
सर्वच संशोधक या मताशी सहमत नाहीत. काहींच्या मते, जीवनाला चंद्राची आवश्यकता नाही. पृथ्वीवरील जीवन ज्या मार्गाने विकसित झाले, तो एक मार्ग आहे. परंतु, इतर ग्रहांवर जीवन वेगळ्या परिस्थितीतही विकसित होऊ शकते. त्यामुळे चंद्र हा जीवनासाठी आवश्यक घटक नसला, तरी जटिल आणि दीर्घकाळ टिकणार्‍या जीवसृष्टीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरला असावा, असे म्हणणेच अधिक योग्य ठरेल.
 
आपण चंद्राकडे अनेकदा केवळ रात्रीच्या सौंदर्याचा भाग म्हणून पाहतो. पण, प्रत्यक्षात तो पृथ्वीच्या इतिहासाचा सहनिर्माता आहे. पृथ्वीचे स्थिर हवामान, नियमित ऋतू, महासागरांची भरती-ओहोटी आणि कदाचित, जटिल जीवनाची उत्क्रांती या सर्वांमध्ये चंद्राचा वाटा आहे. जर तो नसता, तर पृथ्वी आजही एक ग्रह राहिलीच असती. पण, ती आज आपल्याला ज्ञात असलेला, निळा आणि जीवसृष्टीने बहरलेला ग्रह नक्कीच नसती. म्हणूनच, चंद्राचा अभ्यास म्हणजे केवळ एका उपग्रहाचा अभ्यास नाही, तो पृथ्वीच्या स्वतःच्या इतिहासाचा शोध आहे. जेव्हा आपण रात्रीच्या आकाशात त्या शांत चंद्राकडे पाहतो, तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या अस्तित्वाच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे पाहत असतो.
 
- सुजाता बाबर