कलियुगात भगवंतप्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग कोणता, असा प्रश्न विचारला तर संत, ऋषी आणि शास्त्रे एकमुखाने ‘भक्ती’ हेच उत्तर देतात. श्रीमद्भागवत हा त्या भक्तिमार्गाचा साक्षात् प्राण आहे. वेदांचे सार, पुराणांचा मुकुटमणी आणि भगवान श्रीकृष्णांचे वाङ्मयीन स्वरूप म्हणून गौरविल्या गेलेल्या या ग्रंथात जीवाच्या आत्मोद्धाराचा मार्ग दडलेला आहे. भगवंतांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांच्या चिंतनातून अंतःकरण शुद्ध होत जाते, अहंकार क्षीण होतो आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची आस जागृत होते. भगवंतांच्या अविट लीलांचा आनंद प.पू. ब्र.भू. डोंगरे महाराजांच्या प्रवचनाचे संकलन असलेल्या ‘श्रीमद्भागवतरहस्य’पुस्तकातून मिळतो. हे पुस्तक म्हणजे, साधकाला आत्मबोधाच्या दिशेने घेऊन जाणारा एक आध्यात्मिक प्रवास आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास अर्थात, ‘पुरुषोत्तम मास’ हा आध्यात्मिक उन्नती, व्रत-वैकल्ये आणि दानासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या तेराव्या महिन्यात भगवंताची आराधना, नामस्मरण आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्यास अनंत पटीने पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. याच धारेत यावेळी ‘श्रीमद्भागवतरहस्य’ वाचनात आले. प. पू. ब्र. भू.
डोंगरे महाराजांची प्रवचने वाचण्याचा योग यानिमित्ताने आला. आपली वाणी ज्यांनी श्रीहरिगुणानुवादासाठी आणि सच्चरित्कथनासाठी झिजवली, ‘श्रीमद्भागवत’ या महापुराणाचा आमरण प्रचार केला, अध्यात्म-भक्तिशास्त्र सोपे करून सांगितले, स्वत:च्या आदर्श चरित्राने समाजाला सत्प्रवृत्ती व नीतीची कास धरावी, असा आग्रह केला, ज्यांना २०व्या शतकातील ‘शुकाचार्य’ म्हणूनच वंदन करावे; असे श्री डोंगरे महाराज यांच्या ‘श्रीमद्भागवत’ - प्रवचनरूपी ज्ञानगंगौघातून वाहून आणलेली ही कावड मराठी भाषेसाठीचा आज समृद्ध ठेवा आहे.
‘श्रीमद्भागवत’ म्हणजे भगवंतांच्या गुणांचे संकीर्तन, भगवंतांच्या कर्माचे अर्थातच, लीलांचे संकीर्तन आणि भगवंतांच्या नामाचे संकीर्तन. या सर्वांच्या विचाराचे प्रयोजन हेच की, ‘श्रीमद्भागवत’ हे भगवंतांचे गुण, कर्म आणि नाम यांचे संकीर्तन आहे. श्रीभगवंतांच्या अनेक अवतारांतून, श्रीभगवंतांच्या अनेकानेक गुणांचे ज्ञान होते. एक श्रीकृष्णावताराचेच जर चिंतन केले, तर श्रीभगवंतांच्या गुणचिंतनाने साधक वेडा होऊन जाईल, प्रेमाने भारावून जाईल. सामान्य साधकाची ही अवस्था होईल, तर यात नवल नाहीच. कारण, श्रीशुकदेवांसारख्या महात्म्यांचीही हीच अवस्था झाली आहे. श्रीभगवंतांच्या गुणांचे असे माहात्म्य, वैशिष्ट्य आहे की, मोठमोठे महात्मे-अधिकारीसुद्धा त्याच्यावर मोहित होऊन जातात. श्रीशुकदेवांसारखे महात्मे जे मननशील आहेत, आत्मचिंतनात संलग्न आहेत, ज्यांच्या जीवनात कोणतीच गाठ अवशिष्ट नाही असे निर्ग्रन्थ महात्मेसुद्धा, भगवद्भक्तीत प्रवृत्त होतात. कशासाठी? भगवंताचे गुणच असे आहेत की, त्यावर सर्वच मोहित होतात. बौद्ध आणि जैनसुद्धा जेव्हा भगवद्गुणानुवादाचे श्रवण करतात, तेव्हा त्यांचेही हृदय द्रवित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच, महाभाव वैराग्य शिरोमणी श्रीशुकदेवांनी भगवंताच्या गुणानुवादाने मोहित होऊन, ‘श्रीमद्भागवता’च्या महान आख्यानाचे अध्ययन केले. हे राजा परीक्षिताला स्वतः श्रीशुकाचार्यांनी सांगितले आहे. या युगात भगवद्भक्तीची पताका जगभर डौलाने फडकते आहे. वर्षभर रोज कुठे ना कुठे ‘श्रीमद्भागवत’ श्रवण ज्ञानयज्ञ सुरूच असतो आणि हेच या महापुराणाचे वेगळेपण आहे.
श्रीभगवंतांच्या लीलांचे संकीर्तनही फल देणारे आहे. भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम यांच्या लीलांनी हजारो वर्षांपासून भूतलावर सर्वांना भावविभोर केले. आमच्या संतांनी अनेकानेक लीला वर्णिल्या आहेत, अनेक चरित्रे गायिली आहेत; परंतु प्रत्येक संताने बालक्रीडेच्या रूपाने भगवान श्रीकृष्णांचे चरित्रही गायिलेच आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी तर ‘विरहिणी’च्या रूपाने अप्रतिम असा कृष्णप्रेमाचा अविष्कार केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ‘विरहिणी’ भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीशिवाय अन्य कशाचीच अपेक्षा करीत नाही, हीच ‘श्रीमद्भागवता’ची विशेषतः जनमानसावर प्रभाव पाडणारी आहे.
‘श्रीमद्भागवता’तील प्रत्येक कथा तत्त्वबोधक आहे. या कथा केवळ मनोरंजनासाठी नाहीत. यातील ध्रुव-प्रल्हादाच्या कथेतून, ‘लहान वयापासूनच भगवद्भक्तीस प्रारंभ कसा करावा’ हे तत्त्व कळते. कितीही संकटे आली तरी भक्ती सोडता कामा नये, हेही या चरित्रांतून कळते. भगवान श्रीकृष्ण, श्रीराम आदींनी गुरुसेवा केली, तेव्हा सामान्यांनी तर ती करावीच. गुरुसेवेशिवाय जीवनास पूर्णता नाही, या तत्त्वाचा बोध आपणास यातून होतो. कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली, तरीही आपल्या पतीच्या व्रतात पत्नीने अवश्य सहभागी व्हावे, हे तत्त्व भक्तवर्य सुदामाच्या चरित्रातील सुदामाच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेतून अवगत होते. राजा रतिदेव, अंबरीष, आर्तभक्त गजेंद्र, आत्मनिवेदन भक्तीचे आदर्श बली, कृष्णभक्त सुदामा आदी अनेक कथा आपल्याला, जीवनातील विविध प्रसंगांत उत्कृष्ट मार्गदर्शन करणार्या आहेत. ‘श्रीमद्भागवत’ म्हणजेच ‘भक्ताच्या भक्तीच्या कथा’ असाही एक अर्थ स्पर्श करणारा होतो.
‘श्रीमद्भागवता’त अनेकानेक स्तुती विद्यमान आहेत. या सर्व स्तुती भगवद्भक्तांनी केलेल्या असून, ते भक्त शेवटी परमात्म्याची पराभक्ती इच्छिणारे आहेत. ‘श्रीमद्भागवता’तील या स्तुतिसूक्तांचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते यासाठीच की, श्रेष्ठ लोकांद्वारे केल्या गेलेल्या स्तुतीमध्ये ज्याप्रमाणे परमात्म्याच्या अलौकिक अथवा अदृश्य स्वरूपाचे वर्णन उपलब्ध होते; त्याचप्रमाणे केवळ कथेमध्ये आढळत नाही. कथेमध्ये भगवंतांच्या अद्भुत स्वरूपाचे त्यावेळी जे दिसले, आढळले, त्याचेच वर्णन प्राप्त होईल. परंतु, सृष्टीच्या प्रारंभी अथवा गोलोक, वैकुंठ आदी श्वेतदीपांत प्रभू ज्या स्वरूपात राहतात, त्याचे वर्णन फक्त स्तुतीमध्येच सापडेल. याबरोबरच स्तुतीमध्ये अनेक दार्शनिक सिद्धांत उपलब्ध होतात. प्रत्येक स्तुती ही वैदिक स्तोत्रासारखी असल्यामुळे, स्तुतीचे स्वतंत्र फळ देणारी आहे. ‘श्रीमद्भागवता’त तसा स्पष्ट निर्देशही आहे. ‘प्रल्हादकृत नृसिंहस्तुती’, ‘गजेंद्रकृत स्तुती’, ‘मत्स्यावतार स्तुती’ या स्तुतीमध्ये भगवंतांच्या अलौकिक गुणांचा जेवढा अनुवाद मिळतो, तेवढा अन्यत्र मिळत नाही. परमात्म्याच्या गुणानुवादानेच अंतःकरणाची शुद्धी, परमेश्वराची भक्ती, वैराग्य व यानंतर ज्ञानाची प्राप्ती होते. परमात्म्याच्या गुणानुवादानेच अंतःकरणात शुद्ध भक्ती उत्पन्न होते आणि हेच ‘श्रीमद्भागवता’चे थोरपण आहे.
‘श्रीमद्भागवत’ सर्व ‘वेदान्ता’चे सार आहे. ‘भागवतामृत’ रसपानाने तृप्त झालेल्या भाग्यवान जीवास, अन्यत्र कुठल्याच रसात आनंद येत नाही. साक्षात भगवंतांचे नामस्वरूप म्हणजे ‘श्रीमद्भागवत’. भगवान श्रीकृष्णांच्या अपार सौंदर्याचे, तेजाचे प्रत्यक्ष रूप म्हणजे ‘श्रीमद्भागवत’. मानवाच्या सुखी जीवनासाठी आणि मुक्तीसाठी दिव्य आदर्श अन् एकमेव मार्गदर्शक म्हणजे ‘श्रीमद्भागवतशास्त्र’. म्हणूनच, त्याला ‘पाचवा वेद’ म्हटले जाते, श्रीकृष्णांचे ते साररूपच आहे. अशा अद्वितीय, अमोल ग्रंथावरील प्रवचने अर्थात, संपूर्ण ‘भागवत’ यात आहे. ही अधिकारी वक्ता प. पू. ब्र. भू. डोंगरे महाराजांच्या रसाळ आणि गोड वाणीतून आलेली ही प्रवचने असून, त्याचा प्रा. डॉ. म. दा. अभ्यंकर व मिलिंद बोरकर या द्वय भावानुवादकांनी वाचनीय अनुवाद केला आहे.
‘श्रीमद्भागवत’ हे भगवंतांचे साक्षात् वाङ्मयीन स्वरूप आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण निजधामास गमन करू लागले, तेव्हा उद्धवाने त्यांच्या मुखकमलातून ‘एकादश स्कंधा’चे ज्ञान श्रवण केल्यानंतर प्रभूंना म्हटले "भगवन्, तुम्ही तर आपल्या लीला आवरून घेता आहात. परंतु, माझ्या मनात आता चिंता उत्पन्न होते आहे की, कलियुग येत आहे. लोक उग्र होतील, पृथ्वीचा भार वाढेल.
आपल्याशिवाय दुसरे कुणी रक्षण करणारे नाही. यासाठी हे भक्तवत्सल, जर आपण सोडून जाल; तर आपल्या भक्तांना अत्यंत दुःख होईल. सर्व भक्त कसे राहतील?” उद्धवाचे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्णांनाही चिंता उत्पन्न झाली की, भक्तांसाठी मला काही करायला हवे. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपले संपूर्ण तेज ‘श्रीमद्भागवता’त स्थापित केले. ‘श्रीमद्भागवत’ हे ‘भागवत’ नसून, भगवान श्रीकृष्णांच्या तेजाचा आधार आहे. ज्याप्रमाणे पीठाशिवाय, आसनाशिवाय उपासना होऊ शकत नाही. जेव्हा कुणाची पूजा करावयाची असते, तेव्हा त्यांना बसण्यासाठी आसन हवे ना? त्यालाच आधारशक्ती म्हणतात. श्रीभगवंतांना बसण्यासाठी शुद्ध आसन कोणते आहे, तर ते आहे ‘श्रीमद्भागवत’.
प. पू. ब्र. भू. डोंगरे महाराजांची ही ‘भागवता’वरील प्रवचने, हिंदी आणि गुजराती भाषेत ग्रंथरूपाने उपलब्ध होती. परंतु, मराठी भाषकांना हे उपलब्ध व्हावे, यासाठी पुण्यातील ‘नरेंद्र प्रकाशन’ने या सुंदर ग्रंथाची निर्मिती केली. भारताच्या सांस्कृतिक जीवनावर ‘श्रीमद्भागवता’चा फार मोठा प्रभाव आहे. भागवतधर्म आणि भक्तिसंप्रदाय यांच्या दृष्टीने, ‘श्रीमद्भागवत’ हा एक प्रमाणग्रंथच आहे. काव्याच्या दृष्टीनेही त्यातील वर्णने भावपूर्ण व रसात्मक आहेत. प्रत्येक ‘स्कंधा’वर स्वतंत्र लेखन होईल, इतका विपुल विचार या ग्रंथात आलेला आहे. दहाव्या ‘स्कंधा’तील वेणुगीत, गोपीगीत, युगलगीत ही गीते प्रसिद्ध असून, अनेकांना ती मुखोद्गतही आहेत. त्याच ‘स्कंधा’तील ‘रासपंचाध्यायी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाच अध्यायांत, रासलीलेचे भावोत्कट वर्णन आहे. त्याच ‘स्कंधा’तील भ्रमरगीताचा इतका प्रभाव होता की, त्याच्या अनुकरणाने हिंदी, मराठी, संस्कृत भाषांतून असंख्य भ्रमरगीते लिहिली गेली, अशी अवीट गोडी या ग्रंथाने जनमानसात निर्माण केली आहे.
प्रचंड वाङ्मय लिहूनही मन:शांती न लाभलेल्या व्यासांना, ‘श्रीमद्भागवता’च्या लेखनामुळे मनःशांती लाभल्याचे म्हटले जाते. ‘श्रीमद्भागवत’ ही व्यासांची समाधिभाषा आहे; ‘श्रीमद्भागवत’ हे ‘वेदान्ता’चे सार आहे. ‘श्रीमद्भागवत’ ही विद्येची परमावधी वा अंतिम मर्यादा आहे; शब्दप्रधान ‘वेद’, अर्थप्रधान ‘पुराण’ व रसप्रधान काव्य या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता ‘श्रीमद्भागवता’त आहे. म्हणूनच, ‘श्रीमद्भागवत’ ज्ञानयज्ञ कुठेही सुरू असला, तरी त्याचे श्रवण करण्यासाठी मानवी मन धाव घेणारे आहे. श्रीभगवंताचे हे वाङ्मयीन रूप प्रत्येक जीवाला हवेहवेसे वाटणारे आहे. वाचनीय आणि संग्रही ‘श्रीमद्भागवतरहस्य’ भेट देण्यासाठीही उत्तम आहे. श्रीभगवंताची कृपा नित्य राहो, हीच प्रार्थना. जय श्रीकृष्ण!