मुंबई : (Child Development Services) अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
महिला व बालविकास विभागांतर्गत केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत देशभरात सुमारे २६ लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. सध्या अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारकडून ४,५०० रुपये, तर मदतनीसांना २,२५० रुपये मानधन दिले जाते. या मानधनात केंद्र सरकारचा २,७०० रुपये आणि राज्य सरकारचा १,५०० रुपयांचा सहभाग आहे.(Child Development Services)
ऑक्टोबर २०१८ नंतर केंद्र सरकारकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिल्ली येथे निदर्शने करण्यात आली होती. तसेच सेविकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची मागणी समितीने केंद्रीय महिला व बालविकास विभागाकडे केली होती.
या मागण्यांच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मानधनवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.(Child Development Services)