मुंबई : (Veermata Jijabai Bhosale Udyan) भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारकातील नाट्यगृहाचे १ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात यावे तसेच स्मारकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापित करण्यात यावा, या मागणीसंदर्भात माजी मंत्री विजयभाई गिरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची भेट घेतली.
प्रभाकर शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारकाच्या लोकार्पणाबाबत तसेच स्मारक परिसरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने नाट्यगृहाचे लोकार्पण १ ऑगस्ट रोजी करण्यात यावे आणि पुतळा स्थापनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली. (Veermata Jijabai Bhosale Udyan)
यावर स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना पुतळा स्थापनेसंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याबरोबरच स्मारकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम निश्चित करण्याबाबत आवश्यक निर्देश दिले.
विजयभाई गिरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मयूर देवळेकर, गणेश क्षीरसागर, सत्यवान नर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Veermata Jijabai Bhosale Udyan)